|
वि. तीन प्रकारचा ; तीन स्वरुपाचा . ( समासांत ) त्रिविध - दान - पापपुण्य - स्नान इ० . = तीन प्रकारचे , स्वरुपाचे म्हणजे कायिक , वाचिक व मानसिक दान , पुण्य , पाप इ० शिवाय सात्विक , राजस , तामस आणि आध्यात्मिक , आधिदैविक , आधिभौतिक इ० दुसरे तीन प्रकारांचे गट आहेत . ते त्या त्या शब्दांच्या अर्थामध्ये पहावे . तेचि ज्ञानत्रयवशे । त्रिविध कर्म जे असे । - ज्ञा १८ . ५८५ . [ सं . त्रि + विधा = प्रकार , जाति ] ०अवस्था स्त्री. जीवाच्या तीन अवस्था ; जागृति ; स्वप्न व सुषुप्ति . ०आहार पु. सात्विक , राजस व तामस अशा तीन प्रकारचे कर्म . ०तप न. कायिक , वाचिक व मानसिक अशा तीन स्वरुपाचे तप . ०ताप पु. आध्यात्मिक , आधिभौतिक व आधिदैविक असे तीन प्रकारचे दुःख , पीडा ; तापत्रय . आध्यात्मिक ताप म्हणजे देह , इंद्रिये व प्राण यांच्यापासून होणारा ताप किंवा स्थूल व सूक्ष्म शरीरामध्ये होणारा आधिव्याधिरुप ताप होय . देवापासून तो आधिदैविक । मानस ताप तो आध्यात्मिक । भूतापासून तो भौतिक । या नांव देख त्रिविधताप । - एभा २२ . ३०९ . आधिभौतिक ताप म्हणजे स्वशरीराहून भिन्न अशा दृष्टिगोचर प्राण्यांपासून होणारा त्रास . आधिदैविक ताप म्हणजे दैवी प्रेरणेने , दैवी क्षोभापासून होणारा ताप . उदा० अतिवृष्टि , अनावृष्टि , भूकंप , शीतोष्णादिकांचा अतिरेक इ० . तुका म्हणे त्रिविधताप करि भग्न वपु विरहाग्नि तुझा जाळी । - देप १० . [ सं . त्रिविध + ताप = दुःख , पीडा ०देह पु. स्थूल , सूक्ष्म व कारण असा तीन प्रकारचा देह . ०दाने नअव . सात्विक , राजस व तामस अशी तीन प्रकारची दाने . ०नायिका स्त्रीअव . वयाच्या मानाने केलेले स्त्रियांचे तीन वर्ग , प्रकार :- मुग्धा , मध्या व प्रौढा . ०परिच्छेदरहित वि. देश , काल आणि वस्तु या तीन परिच्छेदांनी रहित ; देश , काल व वस्तु या तीन परिच्छेदापलीकडे गेलेला ; दिक्कालाद्यनवच्छिन्न . [ सं . त्रिविध + परिच्छेद + रहित ] ०परीक्षा स्त्री. ( वैद्यक ) दर्शन (= चर्या पाहणे ), स्पर्शन (= नाडी पाहणे ) व प्रश्न (= चौकशी करणे ) या तीन प्रकारांनी वैद्याने करावयाची रोग्याची परीक्षा . ०प्रारब्ध न. तीन प्रकारचे प्रारब्ध ; अनिच्छा प्रारब्ध , स्वेच्छा प्रारब्ध व परेच्छाप्रारब्ध ; दैव . [ त्रिविध + प्रारब्ध = दैव ] ०मंगल न. अंगीकृत कार्य निर्विघ्न पार पडावे म्हणून त्या कार्याच्या आरंभी केलेला आशीर्वादात्मक (= आशीर्वाद मिळावा म्हणून देवांची प्रार्थना करणे ), वस्तुनिर्देशनात्मक (= एखाद्या पूज्य पुरुषाचे , कृत्याचे ध्यान करणे ), आणि नमस्कारात्मक (= कुलदेवता , गुरु इ० कांना नमस्कार करणे ) असा तीन प्रकारचा विधि . ०लक्षणा स्त्री. जहत , अजहत व जहदजहत अशी तीन प्रकारची लक्षणा . जहल्लक्षणा ; अजहलक्षणा व जहदजहलक्षणा हे शब्द पहा . [ सं . त्रिविध + लक्षणा ] ०संबंध पु. अभिधान संबंध , लक्षणसंबंध आणि व्यंजनासंबंध असा तीन प्रकारात्मक संबंध . अभिधानसंबंध म्हणजे वाच्यावाचक संबंध किंवा शब्द शब्दार्थ संबंध (= शब्द व त्यांचा अर्थ यांमधील संबंध ). या संबंधांवरुन एखाद्या वाक्याचा केवळ शब्दशः अर्थ प्रतीत होतो . लक्षणासंबंध म्हणजे लक्ष्यलक्ष्यकसंबंध (= शब्दांनी पर्यायाने सुचविलेला अर्थ व शब्दाचा वाच्यार्थ या परस्परांतील संबंध ) याने लाक्षणिक किंवा अलंकारिक अर्थ प्रतीत होतो . उदा० सारागांव = गांवांतील लोक . व्यंजनासंबंध म्हणजे जो अर्थ सांगावयाचा त्या अर्थाच्या पदाचा वाक्यांत उपयोग न करता प्रकारांतराने त्या अर्थाचा बोध करावयाचा . जसे :- ग्राहवती नदी येथे नदीत मगर आहेत या अर्थाने नदीस स्नानास जाऊ नको असा अर्थ घ्यावयाचा असतो . ०प्रतीति स्त्री. गुरुपासून मिळालेले असे तीन प्रकारचे ज्ञान , अनुभव . [ सं . त्रिविध + प्रतीति = ज्ञान , अनुभव ] त्रिविधाहंकार पु . सात्विक , राजस व तामस अशा तीन प्रकारची स्वतःची जाणीव ; परमेश्वरापासून अथवा बाह्य विश्वाहून आपण वेगळे आहोत ही भावना ; अहंकारत्रय ; अहंकार पहा . [ सं . त्रिविध + अहंकार - मीपणा ]
|