|
पु. १ आवाज ; उच्चार ; कोणत्याहि प्रकारचा ध्वनि ; श्रोत्रेंद्रियाचा विषय . २ एखाद्या वस्तूचा , कल्पनेचा , दर्शक किंवा व्यंजक , जो अक्षरसमूह तो . ३ ( व्या . ) प्रथमादि विभक्ति ज्यावरून होतात अशी वर्णानुपूर्वी ( नाम , सर्वनाम इ० ). तळमळ हा संस्कृत शब्द चालतो तरी कसा ? . - नारुकु ३ . ४ . ४ बोल ; वाईटपणा ; ठपका . ( क्रि० लागणें ; येणें ; ठेवणें ; लावणें ; आणणें ). तें केलें धार्तराष्ट्री विफळ सकळहि , आणिला शब्द सामीं । - मोकृष्ण ६८ . ३३ . ५ आज्ञा ; हुकूम . ६ प्रतिज्ञा ; वचन ; वाचा . एकवेळ गेले शब्द । - संग्रामगीतें १२० . ७ वेद . त्यासि शब्दपर निष्णातू । - एभा १० . ३४९ . ८ शास्त्र . शब्दाचिया आसकडी । भेद नदीची दोही थडी । आरडते विरह वेडी । बुध्दिबोध । - माज्ञा १६ . ५ . [ सं . शब्द = नाद करणें ] ( वाप्र . ) ०खाणें लिहितांना किंवा बोलतांना शब्द गाळणें , न लिहिणें किंवा न उच्चारणें . ०खालीं पडणें - दुसर्याच्या सांगण्याप्रमाणें करणें ; शब्दाला किंमत देणें ; शब्द मानणें . न पडणें - दुसर्याच्या सांगण्याप्रमाणें करणें ; शब्दाला किंमत देणें ; शब्द मानणें . ०खालीं न देणें - उत्तरास प्रत्युत्तर देणें ; वादविवादांत किंवा भांडणांत माघार न घेणें . पडू न देणें - उत्तरास प्रत्युत्तर देणें ; वादविवादांत किंवा भांडणांत माघार न घेणें . ०झेलणें ज्याची सेवा , चाकरी शुश्रूषा , खुशामत वगैरे करावयाची असेल , त्याच्या तोंडून आज्ञा निघतांच तिच्याप्रमाणें करणें . राजकारस्थानी पुरुष आणि सेनापति यांचे शब्द त्यांच्या अमदानींत सगळे लोक झेलीत असतात - ओक . ०टाकणें १ मागणी , विनंति करणें ; एखादी गोष्ट सांगून बघणें . २ शिफारस करणें . ०ठेवणें लावणें लागणें - दोष देणें ; ठपका ठेवणें ; दूषण लावणें . माझेनि दोषें पावलों खेद । हा तुज कासया ठेवणें शब्द । - मुक्तेश्वर . त्वत्सम साधु न लागों देती स्वयशासो शब्द ते राजे - मोवन २ . ३६ ; - मोउद्योग ८ . १९ . ०लागूं , लागू , लावू - दोष पत्करणें . सत्यप्रतिज्ञ पांडव लागूं देती न आपणा शब्द । - मोविराट ४ . ६३ . सामाशब्द - देणें , लागू , लावू - दोष पत्करणें . सत्यप्रतिज्ञ पांडव लागूं देती न आपणा शब्द । - मोविराट ४ . ६३ . सामाशब्द - ०काठिन्य न. ( अलंकार ) शब्दाचा कठोरपणा , कर्कशपणा . [ सं . ] ०कार्पण्य न. अल्पभाषा ; कमी बोलणें ; मितभाषण . शब्दकार्पण्य पंडितास दोष स्त्रीला महाभूषण । [ सं . ] ०कोश कोष - पु . १ शब्दसंग्रह ; शब्दसमुच्चय ; शब्दांचा साठा - खजिना ; शब्दांचा अर्थासह संग्रह . २ शब्दाचे अर्थ , व्युत्पत्ति , व्याकरण वगैरे सांगणारा ग्रंथ . [ सं . ] ०कौशल्य न. शब्दरचना - चातुर्य ; भाषाचातुर्य . [ सं . ] ०खंडन न. शब्द , विधान इ० खोडून काढणें ; शब्दावरील टिका . ०गुण पु. शब्दांचे गुण , लक्षण . हे एकंदर चोवीस आहेत . ते पुढील प्रमाणें ; श्लेष , प्रसाद , समता , माधुर्य , सुकुमारता , अर्थव्यक्ति , उदारत्व , कांति , उदात्तता , ओज , सुशब्दता , और्जित्य , विस्तर , समाधि , सौक्षम्य , गांभीर्य , प्रेम , सन्मितत्व , प्रौढी , रीति , उक्ति , गति , भावुक , संक्षेप . इ ००चातुर्य न. शब्दरचनाकौशल्य ; वाक्चातुर्य ; शब्दपटुता ; भाषाशैली ; भाषाप्रभुत्व . [ सं . ] ०चित्र न. १ शब्दांनीं केलेलें वर्णन , काढलेलें चित्र . २ ( साहित्य ) चित्रकाव्याचा एक प्रकार ; शब्दचमत्कृति . उदा० मागे जी लुगडी , सकाप बुगडी इ० . [ सं . ] ०चोर पु. दुसर्याचा लेख चोरून तो आपलाच म्हणून दडपून देणारा ; दुसर्याचे शब्द चोरणारा ; उष्टा बोल वापरणारा . ०जाल जाळ - न . १ शब्दांचें जाळें ; अनंत शब्दांचा नुसता समूह ; शब्दावडंबर ; शब्दभारूड . २ वायफळ भाषण ; बडबड . म्हणती शब्दजाळ टाकून । निश्चल एकाग्र ऐसिजे मनें । [ सं . ] ०तः क्रिवि . शब्दानें . शब्दतः अर्थतः अगाध खोली । - एभा २१ . ३६७ . [ सं . ] ०ताडन न. एखाद्यास लागेल असें भाषण ; शब्दांचा मार ; टोचून बोलणें . सूज्ञास शब्द ताडन मूर्खास प्रत्यक्ष ताडन . [ सं . ] ०तात्पर्य न. भाषणाचा सारांश ; शब्दार्थ ; मतलब . [ सं . ] ०दोष पु. १ शब्दांतील व्यंग , उणेपणा ; शब्दापराध ; शब्दवैगुण्य . काव्यप्रकाशांत एकंदर शब्ददोष १३ सांगितले आहेत . ते पुढीलप्रमाणें ; श्रुतिकटु च्युतसंस्कृति , अप्रयुक्त , असमर्थ , निहतार्थ , अनुचितार्थ , निरर्थक , अवाचक , अश्लील ( जुगुप्सा , अमंगल , व्रीडा - युक्त ), संदिग्ध , अप्रतीत , ग्राम्य , नेयार्थ . प्रताप रुद्रांत पुढील सतरा शब्ददोष सांगितले आहेत :- अप्रयुक्त , अपुष्ट - अपुष्टार्थ , असमर्थ , निरर्थक , नेयार्थ , च्युतसंस्कार - च्युतसंस्कृति , संदिग्ध , अप्रयोजक , क्लिष्ट , गूढ - गूढार्थ , ग्राम्य , अन्यार्थ , अप्रतीतिक , अविसृष्टविधेयांश , विरुध्दमतिकृत , अश्लील ( जुगुप्सा , व्रीडा , अमंगलयुक्त ), परुष - श्रुतिकटु . २ दोषारोप ; बोल ; ठपका ; आळ . ( क्रि० ठेवणें ; घालणें ; लावणें ; आणणें ; येणें ; लागणें ). ३ शब्दामुळें , नांवामुळें लागलेला बट्टा ; कलंक . उदा० प्रतिव्रतेस व्यभिचारिणी म्हटली शब्ददोष तर येतो . ०ध्वनि पु. आवाज ; स्वर ; बोलणें . तिचा हा शब्दध्वनि । म्यांही श्रवणीं ऐकिला । [ सं . ] ०परीक्षा स्त्री. ( वैद्यक ) शब्दाच्या स्पष्टास्पष्टतेवरून किंवा जड हलकेपणावरून व्याधिनिदान करणें . [ सं . ] ०पांडित्य न. १ वक्तृत्व ; भाषापांडित्य . २ कृती न करतां उगीच कोरडें व डौलाचें वाक्पाटव करणें ; वृथा बडबड ; प्रौढी . [ सं . ] ०पारुष्य न. कठोर भाषण ; कटु भाषण . [ सं . ] ०पाल्हाळ पु. शब्दावडंबर ; शब्दभारूड . शब्दजाल पहा . ( क्रि० लावणें ; मांडणें ; करणें ). ०प्रमाण न. शब्दांनीं दिलेला पुरावा ; साक्ष ( तोंडी ). [ सं . ] ०प्रहार पु. वाक्ताडन ; मनाला लागतील , दुःख देतील असे शब्द बोलणें ; रागें भरणें . [ सं . ] ०बोध न. शब्दज्ञान . शब्दबोधें सदोदित । - एभा २ . १६७ . ०ब्रह्म न. वेद . हें शब्दब्रह्म अशेष । - ज्ञा १ . ३ ; - एभा ११ . ४९८ . [ सं . ] ०भेद पु. १ शाब्दिक फरक . २ प्रतिशब्द ; दुसरे शब्द . [ सं . ] ०भेदी वेधी - वि . १ आवाजावरून बाण मारण्यांत पटाईत , निष्णात , तरबेज . २ वस्तूचा नुसता नाद ऐकून त्यावर बिनचूक जाणारा , वेध करणारा ( अस्त्र , शक्ति , मंतरलेला बाण इ० ). ३ ( ल . ) थोडक्या शब्दांवरून एखाद्याचें अंतरंग , मतलब , बेत जाणणारा ; चांगला तर्कबाज . ४ दशरथ , अर्जुन यांचें विशेषण , अभिधान . [ सं . ] ५ मंत्रानें दुसर्याचा नाश करणारा ; केवळ मंत्रोच्चारामुळें शत्रूचा नाश करणारा . ०माधुर्य न. शब्दांतील गोडी ; मधुर भाषण . [ लं . ] ०योगी वि. ( व्या . ) व्याकरणांत नामें आणि नामाप्रमाणें योजलेले इतर शब्द यांना जोडून येणारें ( अव्यय ). उदा० वर , खालीं , पुढें , मागें इ० . हीं ज्यांना जोडलीं जातात त्यांचें सामान्यरूप होतें . ०योजना स्त्री. १ शब्दांची निवड , योग , जुळणी . २ शब्दरचना ; वाक्यरचना . [ सं . ] ०योनि स्त्री. धातु ; शब्दाचें मूळ . [ सं . ] ०रचना स्त्री. शब्दांची रचना , मांडणी ; वाक्यरचना ; शब्दयोजना . [ सं . ] ०राशि पु. वेद . - मनको . ०ललित्य न. शब्दसौंदर्य ; शब्दांची मनोवेधक योजना . लालित्य पहा . [ सं . ] ०वाहक न. विजेच्या सहाय्यानें दूर अंतरावरून बोलण्याचें यंत्र . ( इं . ) टेलेफोन . सौ . महाराणीसाहेबास वारा घालण्यास एक स्त्री कामगार पाठविण्यास शब्दवाहकद्वारें ... हुकूम द्यावा - ऐरापुप्र ४ . २२४ . यंत्र न. विजेच्या सहाय्यानें दूर अंतरावरून बोलण्याचें यंत्र . ( इं . ) टेलेफोन . सौ . महाराणीसाहेबास वारा घालण्यास एक स्त्री कामगार पाठविण्यास शब्दवाहकद्वारें ... हुकूम द्यावा - ऐरापुप्र ४ . २२४ . ०विचार पु. १ शब्दसाधनविचार ; प्रत्यय प्रकरण . ( इं . ) इटिमॉलॉजी . २ ( व्या . ) वाक्यांतील निरनिराळया शब्दांचा परस्परांशीं असणार्या संबंधाचा विचार . ०विता पु. परमात्मा . - मनको . ०वेध पु. १ वेदांतील गूढ स्थळें ; शब्दांचें कूट ; शब्दांचें जाळें ; आडंबर . कंठीं शब्दवेधांचें साखळें . - शिशु १११ . २ आवाजास अनुसरून बाण , गोळी वगैरे मारणें . ०वेधी वि. शब्दभेदी पहा . ०वैपरीत्य न. ( बोलणाराच्या हेतूशीं ) विरुध्द , विपरीत शब्दयोजना ; भलतीच शब्दयोजना ; चुकीची पदयोजना . कुंभकर्ण बोलला निद्रापद , कुंभकर्णाच्या मनांत होतें इंद्रपद , तस्मात् - शब्दवैपरीत्य झालें . [ सं . ] ०शक्ति स्त्री. १ शब्दाचा जोर ; शब्दाचा वास्तविक , अगदीं बरोबर असा अर्थ . शब्दाचा यौगिक अर्थ . २ ( साहित्य ) अभिधा , लझणा , व्यंजना इ० शब्दार्थ बोधकवृत्ति . [ सं . ] ०शक्तिगम्य वि. शब्दश ; मूळ अर्थाप्रमाणें . ०शासन न. शब्दांचा अर्थ , त्यांची योजना वगैरे संबंधी ; व्याकरणशास्त्र , शब्दविचार , इ० नियम . [ सं . ] ०शास्त्र न. शब्दनिज्ञान ; शब्दांचें संपूर्ण विवरण करणारें शास्त्र ; व्युत्पत्तिशास्त्र . २ व्याकरणशास्त्र . [ सं . ] ०शुध्दि स्त्री. १ व्याकरणनियमाप्रमाणें निर्दोष अशी शब्दयोजना ; अचूक मांडणी . २ शब्दांतील दोष काढून टाकणें ; शब्दांची तपासणी ; दुरस्ती . ३ परकीय शब्द न वापरणें ; भाषाशुध्दि . ०शूर पु. केवळ बोलण्यांत शूर , पटाईत . - धनुर्भग पृ . ७३ . ०श्री स्त्री. शब्दांची शोभा . एथूनि शब्दश्री सच्छास्त्रिक । - ज्ञा १ . ३४ . ०संग्रह पु. शब्दसमूह ; शब्दसमुच्चय ; शब्दकोश - ष . [ सं . ] ०संचय पु. शब्दांचा सांठा , समूह ; शब्दांची समृध्दि , वैपुल्य . ०संदर्भ पु. वाक्य रचनेंतील शब्दांचा एकमेकांशीं असलेला संबंध - अन्वय . [ सं . ] ०सादृश्य न. ( अर्थानें अगदीं निराळे असणार्या ) शब्दांतील साम्य , सारखेपणा . [ सं . ] ०साधनिका स्त्री. १ शब्दविचार ; शब्दांची बनावट ; व्युत्पत्ति . २ शब्दांची फोड , उकल ; व्याकरण चालविणें . [ सं . ] ०साधित न. शब्दापासून , नामापासून साधलेला शब्द . - वि . ( व्या . ) नामापासून बनलेलें . याच्याउलट धातुसाधित . [ सं . ] ०साम्य न. शब्दांचा सारखेपणा ; सादृश्य . [ सं . ] ०सूची स्त्री. शब्दांची सूची . याच्या उलट पदसूची वगैरे . [ सं . ] ०सृष्टि स्त्री. १ शब्दांचा संग्रह ; शब्दांची रचना . २ ( ल . ) काव्य ; ग्रंथ ; प्रबंध . आतां वंदूं कवेश्वर । शब्दसृष्टीचे ईश्वर । - दा १ . ७ . [ सं . ] ०स्फुरण न. ( शब्दांचें फुरफुरणें , थरथरणें ) ज्यांत जोडाक्षरें व ट वर्गांतील अक्षरें एकसारखीं पुष्कळ येतात अशा कठोर , कर्णकटु प्रबंधाबद्दल म्हणतात [ सं . ] ०स्वारस्य न. शब्दांतील गोडी , लज्जत ; शब्दमाधुर्य . [ सं . ] शब्दविणें - क्रि . वोलविणें . मीचि शब्दातें शब्दबिता । - एभा १३ . ३४४ . शब्दाचा मार - पु . वाक्ताडन ; शब्दप्रहार ; कानउघाडणी ; निर्भर्त्सना . वेडयास टोणप्याचा मार , शहाण्यास शब्दाचा . शब्दाची कसरत - स्त्री . शंब्दांची कसरतीप्रमाणें बळेनें केलेली अस्वाभाविक रचना . भाषा आणि तपश्चर्या , वचनाचें कष्ट , शब्दांची कसरत , या गोष्टींची जरूर असते . - नाकु ३ . ४ . शब्दाडंबर - न . शब्दजाल ; केवळ शब्दांचें वैपुल्य ; अर्थहीन शब्दरचना ; पोकळ वक्तृत्व . [ सं . शब्द + आडंबर ] शब्दातीत - वि . शब्दांच्या किंवा बोलण्याच्या शक्तीबाहेरचें ; वर्णन करितां येत नाहीं असें ; शब्दांनीं वर्णन करण्यास अशक्य ; अनिर्वाच्य . [ सं . शब्द + अतीत ] शब्दानुप्रास - पु . ( साहित्य ) शब्दाचा अनुप्रास ; एक यमकरचना ; ज्यांत त्याच त्या शब्दाची पुनःपुनः आवृत्ति होतें असा अलंकार . याच्या उलट वर्णानुप्रास . [ शब्द अनुप्रास ] शब्दानुशासन - न . शब्दशासन ; शब्दांच्या लिंग , रूपांबद्दल , अर्थाबद्दल वगैरे नियम . [ सं . ] शब्दानशब्द - क्रिवि . प्रत्येक शब्द . या एकंदर बोलण्यांतील शब्दान् शब्द शांतपणानें शिष्याच्या मुखांतून निघत होता . - उषःकाल . [ शब्द + न् = आणि + शब्द ] शब्दामृत - न . ( काव्य ) शब्दमाधुर्य ; वाङ्माधुर्य ; अमृताप्रमाणें गोड शब्द . [ शब्द + अमृत ] शब्दार्थ - पु . १ शब्दाचा अर्थ , आशय . २ शब्दाचा मूळ , शब्दशः अर्थ ; यौगिकार्थ . [ सं . ] शब्दालंकार - पु . ( साहित्य ) शब्दाच्या रूपावरून साधलेला अलंकार ; काव्यांतील अनुप्रास ; यमकादि अलंकार ; याच्या उलट अर्थालंकार . या अलंकारांचें पुढील पांच प्रकार आहेतः - वक्रोक्ति , अनुप्रास , यमक , श्लेष , पुनरुक्तवदाभास . ह्यांत पुन्हां प्रत्येकीचे जे निरनिराळे भेद आहेत ते सर्व प्रतापरुद्रग्रंथांत व काव्यप्रकाशांत सांगितले आहेत . [ सं . ] शब्दाशब्द - पु . १ चांगले - वाईट शब्द ; अविचाराचे व उध्दटपणाचें भाषण ; वेळ प्रसंग न पहातां असभ्यपणाचें बोलणें . चौघांमध्यें शब्दाशब्द बोलूं नये , चांगले बोलावें २ अप्रत्यक्ष व आक्षेप न घेतां बोलणें ; चांगलें किंवा वाईट ( यांपैकीं कोणतेंच नाहीं असें ) भाषण . मी त्याला शब्दाशब्द कांहीं बोललों नाहीं . [ सं . शब्द + अशब्द ] शब्दित - न . भाषण ; आवाज ; बोलण्याचा स्वर ; ध्वनि . - वि . १ उच्चारलेलें ; बोललेलें ; वदलेलें ; घोषित केलेलें . २ शब्दानें युक्त केला जो वाद्यादि तो ; वाजविलेलें ; निनादित . [ सं . ] शाब्द , शाब्दिक - वि . शब्दासंबंधीं , वाग्युक्त ; वाणीयुक्त ; वाचिक . तरी तप जें कां सम्यक् । तेंही त्रिविध आइक । शारीर मानसिक । शाब्द गा । - ज्ञा १७ . २०० . २ स्वरासंबंधीं ; आवाजासंबंधीं . ३ ( व्या . ) नामासंबंधीं ; नामवाचक ( प्रत्यय वगैरे ). ४ अनुभवाशिवाय बडबड करणारे ; केवळ शब्द जाणणारे ; शब्दज्ञानी . वृथा शाब्दिकांचें शब्दज्ञान । तेंहीं व्याख्यान दाविलें । - एभा ११ . ६४८ . - पु . शब्दांचे अर्थ जाणण्यांत व रूपें समजण्यांत , करण्यांत निष्णात , हुषार ; तरबेज ; वैयाकरण . [ सं . ] शाब्दबोध - पु . शाब्दिक बोध ; अक्षरशः होणारा अर्थ ; यौगिक अर्थ . [ सं . ] शाब्दिकसृष्टि - स्त्री . अलंकारिक , कुशल शब्दरचना ; काव्यप्रबंधांतील शब्दरचनाचातुर्य . [ सं . ] शाब्दी - स्त्री . शब्दप्रवृत्ति . तेवींचि हा अनादि । ऐसी आथी शाब्दी । - ज्ञा १५ . १३० .
|