अथ मूर्तिरहस्यम्
ऋषिरुवाच
ॐ नन्दा भगवती नाम या भविष्यति नन्दजा ।
स्तुता सा पूजिता भक्त्या वशीकुर्याज्जगत्त्रयम् ॥ १ ॥
कनकोत्तमकान्तिः सा सुकान्तिकनकाम्बरा ।
देवी कनकवर्णाभा कनकोत्तमभूषणा ॥ २ ॥
कमलाङ्कुशपाशाब्जैरलंकृत चतुर्भुजा ।
इन्दिरा कमला लक्ष्मीः सा श्री रुक्माम्बुजासना ॥ ३ ॥
या रक्तदन्तिका नाम देवी प्रोक्ता मयानघ ।
तस्याः स्वरुपं वक्ष्यामि श्रृणु सर्वभयापहम् ॥ ४ ॥
रक्ताम्बरा रक्तवर्णा रक्तसर्वाङ्गभूषणा ।
रक्तायुधा रक्तनेत्रा रक्त्केशातिभीषणा ॥ ५ ॥
रक्ततीक्ष्णनखा रक्तदशना रक्तदन्तिका ।
पतिं नारीवानुरक्ता देवी भक्तं भजेज्जनम् ॥ ६ ॥
वसुधेव विशाला सा सुमेरुयुगलस्तनी ।
दिर्घौ लम्बावतिस्थूलौ तावतीव मनोहरै ॥ ७ ॥
कर्कशावतिकान्तौ तौ सर्वनन्दपयोनिधी ।
भक्तान् सम्पाययेद्देवी सर्वकामधौ स्तनौ ॥ ८ ॥
खड्गं पात्रं च मुसलं लाङ्गलं च बिभर्ति सा ।
आख्याता रक्तचामुण्डा देवी योगेश्वरीति च ॥ ९ ॥
अनया व्याप्तमखिलं जगत्स्थावरजङ्गमम् ।
इमां यः पूजयेद्भक्त्या स व्याप्नोति चराचरम् ॥ १० ॥
(भुक्त्वा भोगान् यथाकामं देवीसायुज्यमाप्नुयात् ।)
अधीते य इमं नित्यं रक्तदन्त्या वपुःस्तवम् ।
तं सा परिचरेद्देवी पतिं प्रियमिवाड्गंना ॥ ११ ॥
शाकम्भरी नीलवर्णा नीलोत्पलविलोचना ।
गम्भीरनाभिस्त्रिवलीविभूषिततनूदरी ॥ १२ ॥
सुकर्कशसमोत्तुङ्गवृत्तपीनघनस्तनी ।
मुष्टिं शिलीमुखापूर्णं कमलं कमलालया ॥ १३ ॥
पुष्पल्लवमूलादिफलाढ्यं शाकसच्चयम् ।
काम्यानन्तरसैर्युक्तं क्षुत्तृण्मृत्युभयापहम् ॥ १४ ॥
कार्मुकं च स्फुरत्कान्ति बिभ्रती परमेश्वरी ।
शाकम्भरी शताक्षी सा सैव दुर्गा प्रकीर्तिता ॥ १५ ॥
विशोका दुष्टदमनी शमनी दुरितापदाम् ।
उमा गौरी सती चण्डी कालिका सा च पार्वती ॥ १६ ॥
शाकम्भरीं स्तुवन् ध्यायज्जपन् सम्पूजयन्नमन् ।
अक्षय्यमश्नुते शीघ्रमन्नपानामृतं फलम् ॥ १७ ॥
भीमापि नीलवर्णा सा दंष्ट्रादशनभासुरा ।
विशाललोचना नारी वृत्तपीनपयोधरा ॥ १८ ॥
चन्द्रहासं च डमरुं शिरः पात्रं च बिभ्रती ।
एकवीरा कालरात्रिः सैवोक्ता कामदा स्तुता ॥ १९ ॥
तेजोमण्डलदुर्धर्षा भ्रामरी चित्रकान्तिभृत् ।
चित्रानुलेपना देवी चित्राभरणभूषिता ॥ २० ॥
चित्रभ्रमरपाणिः सा महामारीति गीयते ।
इत्येता मूर्तयो देव्या याः ख्याता वसुधाधिप ॥ २१ ॥
जगन्मातुश्चण्डिकायाः कीर्तिताः कामधेनवः ।
इदं रहस्यं परमं न वाच्यं कस्यचित्त्वया ॥ २२ ॥
व्याख्यानं दिव्यमूर्तीनामभीष्टफलदायकम् ।
तस्मात् सर वप्रयत्नेन देवीं जप निरन्तरम् ॥ २३ ॥
सप्तजन्मार्जितैर्घोरैर्ब्रह्महत्यासमैरपि ।
पाठमात्रेण मन्त्राणां मुच्यते सर्वकिल्बिषैः ॥ २४ ॥
देव्या ध्यानं मया ख्यातं गुह्याद् गुह्यतरं महत् ।
तस्मात् सर्वप्रयत्नेन सर्वकामफलप्रदम् ॥ २५ ॥
(एतस्यास्त्वं प्रसादेन सर्वमान्यो भविष्यसि ।
सर्वरुपमयी देवी सर्वं देवीमयं जगत् ।
अतोऽहं विश्र्वरुपां तां नमामि परमेश्र्वरीम् ।)
इति मूर्तिरहस्यं सम्पूर्णम्
ॐ ऋषि म्हणाले, "नंदा नावाची देवी जी नंदापासून उत्पन्न होईल तिची भक्तिपूर्वक पूजा, स्तवन, गान केल्यास ती भक्तांना त्रैलोक्यात सन्मान व कीर्ती मिळवून देते. ॥ १ ॥
तिच्या शरीराची कान्ती कनकाप्रमाणे, सोन्याप्रमाणे आहे. तिच्या तेजाचा प्रभाव प्रसाददायी आहे. ही देवीसुद्धा शुद्ध सुवर्णकांतीच्या रंगाची असून तिने सुवर्णालंकार घातलेले आहेत. ॥ २ ॥
या देवीच्या चारही भुजा कमल, अंकुश, पाश, आणि शंख यांनी शोभित आहेत. ती इंदिरा, कमला,लक्ष्मी, श्री रुक्मांबु आणि जासना या नावांनी ओळखली जाते. ॥ ३ ॥
प्रथम मी रक्तदन्तिका नावाच्या ज्या देवीचा परिचय करून दिला आहे त्या स्वरूपाचे मी आता वर्णन करतो ते ऐक . ही देवी सर्व भक्तांचे भय दूर करणारी आहे. ॥ ४ ॥
ती रक्त रंगाची वस्त्रे धारण करते. तिच्या देहाचा रंग रक्ताप्रमाणे आहे. तिने सर्व लाल रंगाची आभूषणे सर्वांगावर घातलेली आहेत. तिची शस्त्रे रक्तवर्णीय, तिन्ही डोळे रक्तवर्णीय आणि केशसंभारही रक्ताप्रमाणे लाल असून ती भीषण भासते. ॥ ५ ॥
या रक्तदन्तिकेची तीक्ष्ण, लाल नखे,लाल दात व विक्राळ दाढा आहेत. परन्तु या भीषणतेत सुद्धा ती आपल्या प्रिय भक्तांवर पत्नीने पतीवर अनुरक्त होऊन प्रेम करावे अशी ती प्रेमळ आहे. ॥ ६ ॥
देवी रक्तदन्तिकेचा आकार पृथ्वीप्रमाणे विशाल आहे. सुमेरु पर्वताच्या जोडीप्रमाणे अति सुंदर मातृस्तन आहेत. ते पुष्ट, भरगच्च व दीर्घ असून भक्त बालकांच्या क्षुधा-आकांक्षाअ पूर्ण करणारे आहेत. ॥ ७ ॥
या रक्तदन्तिका देवीचे दीर्घ मातृस्तन अतिशय कठीण व कांतिमान असून ती स्तनयुग्मांनि सर्व इच्छा पूर्ण करणार्या कामधेनूप्रमाणे आपल्या भक्तांना बालकाप्रमाणे पाजते. ॥ ८ ॥।
या देवीच्या हाती तलवार, मद्याचा चषक, मुसळ, लंगर(नांगर) आहेत. ही देवी रक्तचामुंडा किंवा योगेश्वरी या नावांनीच प्रसिद्ध आहे. ॥ ९ ॥
या देवीने सर्व जगाला, चराचराला व्यापून टाकलेले आहे. ती सर्वसंचारी आहे. जे भक्त भक्तिभावाने तिची आराधना, पूजा करतात थी या भगवतीच्या कृपेने या जगात सर्वत्र प्रसिध्द होतात. ॥ १० ॥
जो भक्त रक्तदन्तिकेच्या या स्वरूपाचे पूजन करतो त्याला ही देवी, पत्नी ज्या प्रमाने उत्कट प्रेम व सेवा करील तसे प्रेम करते. सारांश या देवीची भक्तांवर इतकी उत्कट प्रीती असते की पत्नी ज्याप्रमाणे सुखात, दुःखात संकटात, काया वाचा मनाने पतीशी संपूर्ण सहकार्य करते त्याप्रमाणे देवी भक्तनिष्ठ आहे. ॥ ११ ॥
शाकंभरी देवीचा रंग निळा सावळा असून तिचे नीलपद्म रंगाचे विस्तीर्ण डोळे आहेत. तिची नाभी खोल असून तिचे पोट तीन वळ्यांनी युक्त व कृश आहे. ते तिला शोभून दिसते. ॥ १२ ॥।
अत्यंत कठीण व सारख्या उंचीचे पुष्ट व गोल स्तन एकमेकांना चिकटलेले असे आहेत. ती कमलपुष्पावर बसलेली असून तिच्या हातात अनेक बाणांचा जुडगा आहे. ॥ १३ ॥
हाती पाने, फुले, फळे घेऊन ती भक्तांची क्षुधा व तहान या हिरव्या शाकपानांनी, रसरशीत फळांनी व सुगंधित फुलांनी जरा आणि मृत्यूला जिंकण्यास ती भक्तांना प्रेरणारुपी मदत करते. ॥ १४ ॥
शाकंभरीची इतर नावे शताक्षी किंवा तीच दुर्गा या नावाने विख्यात आहे. जे भक्त तिची पूजा, पाठ करतात त्यांच्यावर प्रसन्न होऊन ती प्रेरणा देते. ॥ १५ ॥
ती स्वतः शोकरहीत आहेच पण भक्तांची पीडा, दुरवस्था शमन करते. (संपवून टाकते) याच देवीला उमा,गौरी, सती, चंडी, कालिका किंवा पार्वती या नावांनी ओळखले जाते. ॥ १६ ॥
जे भक्त शाकंभरी देवीची पूजा व जपध्यान करतात, देवीची स्तोत्रे गातात, आराधना नित्यनियमाने करतात त्यांचा योगक्षेम भगवती शाकंभरी त्यांच्या अखंड आयुष्यभर चालविते व अंती त्यांना अमृतस्वरूप मोक्षाचे द्वार खुले होते. ॥ १७ ॥
भीमा देवीचा वर्ण निळा आहे. तिच्या दाढा आणि दात तेजाने चमकतात. तिचे डोळे मोठमोठे आणि गोल असून मातृस्तन चिकटलेले आणि पुष्ट आहेत. ॥ १८ ॥
भीमेने आपल्या हाती चंद्रहास नावाची तलवार, डमरू, नरुदंड (शत्रूचे कापलेले मस्तक) आणि सुरापात्र धारण केलेले असून तिला एकवीरा, कालरात्री, कामदा या नावांनी ओळखतात व त्यांची स्तुती,पूजा-पाठ केला जातो. ॥ १९ ॥
भ्रामरी देवीची कांती बहुरंगी व चित्रविचित्र आहे. ती प्रखर प्रकाशाप्रमाणे असह्य तेजोमयी असली तरी तिचे साज, अलंकार, दागदागिने दैदीप्यमान आहेत. ॥ २० ॥
अनेक चित्रविचित्र रंगाचे भुंगे तिच्या हाती असून ही भ्रामरी मूर्तिस्वरूपात महामारी या नावने विख्यात आहे, हे राजा, तू हे ध्यानी घे. ॥ २१ ॥
अखिल विश्वाची जननी म्हणून प्रसिद्ध असलेली देवी चंडिका कामधेनूप्रमाणे भक्तांना त्यांचे इच्छेनुसार फल देणारी आहे. हे अत्यंत गुप्त असे रहस्य असून त्याचा उच्चार तू, हे राजा, कधीही,कोठही करू नकोस. ॥ २२ ॥
या दिव्य मूर्तींचे हे वर्णन मनोवांछित फळे देणारे असल्याने हर प्रयत्नाने मनःपूर्वक जप-साधनेने तू देवीची सेवा करवीस हे योग्य आहे. ॥ २३ ॥
सप्त-शती-मंत्रोच्चारांनी मानवाच्या साती जन्मांची पापे नष्ट होतात व ब्रह्महत्त्येसारख्या पापातून व सर्व किल्बिषांतून सुटका होते, शापमुक्ती होते. ॥ २४ ॥
देवींच्या ध्यानधारणे संबंधातून अत्यंत महत्वाची व अतिशय गुप्त माहिती तुला सांगितलेली असून तू,हे राजा ! हरप्रयत्नांनी देवीची सर्व मनोवांछित इच्छा पुरी करणारी जप-साधना पूजा, अर्चा, स्मरण,ध्यान नित्यशः अखंडपणे करीत जा. ॥ २५ ॥
या देवीच्या प्रसादाने तू (हे राजा !) जगमान्य होऊन सम्राट होशील कारण देवी सर्वमयी असली तरी हे अवघे विश्व देवीमय आहे.त्या विश्वस्वरूप ईश्वरी देवीला आमचे वारंवार नमस्कार. त्रिवार नमस्कार.