१ द्वितीयाव्रत :
आषाढ शु. द्वितीयेस हे व्रत करतात. ही चंद्राची द्वितीय कला क्रियारूप असते. ही अश्विनीकुमारांची जन्मतिथी मानलेली आहे. ही द्वितीया 'रथद्वितीया' म्हणून ओळखली जाते. त्या दिवशी पुरीच्या जगन्नाथाची रथातून मिरवणूक काढतात. द्वितीयेचे रूपध्यान असे-
'द्वितीया हंसगा शुभ्रा पात्रपुस्तकधारिणी ।'
२ रथयात्रा महोत्सव :
आषाढ शु. द्वितीये दिवशी पुष्यनक्षत्र येईल तर सुभद्रेसह भगवानाला रथातून फिरवून आणावे व यथास्थान स्थापना करावी. या दिवशी जगन्नाथपुरीला श्रीजगदीशाला सपरिवार (बलराम, रुक्मिणी, सुभद्रा व श्रीकृष्ण ) विशाल रथात बसवून फिरवून आणतात. तो सोहळा अद्वितीय असतो. सर्व देशभर प्रांतातून अनेक लोक या यात्रेसाठी एकत्र आलेले असतात. त्याच दिवशी जयपूर वगैरे ठिकाणी भगवान रामचंद्रांना रथातून मिरवत नेतात व वाल्मीकी रामायणातील युद्धकांडाचा भाग वाचतात आणि त्याचवेळी धनधान्य पेरुन वार्षिक शेतीकार्यास सुरुवात करतात. त्या वेळी भगवंताच्या भक्तांच्या घरी व्रतउपवास असतो व महोत्सवही करतात. या व्रताच्या आचरणाने सर्व पापांतून मुक्ती मिळते व वैकुंठलोक प्राप्त होतो. त्या व्रतामुळे सर्पभय दूर होते. कारण भक्तांचे रक्षण स्वतः शेषनारायण करीत असतात.