१ चातुर्मास्य व्रते :
आषाढ शु. एकादशी दिवसापासून चातुर्मास्याला प्रारंभ होतो.
२ लक्षप्रदक्षिणा व्रत :
आषाढ शु. एकादशी, द्वादशी, किंवा पौर्णिमा या दिवशी या व्रताचा आरंभ करतात. अग्नी, गाय, ब्राह्मण, औदुंबर, गुरुचरित्र, अश्वत्थ, तुळस किंवा मारूती यांना वेगवेगळ्या कारणासाठी लक्ष प्रदक्षिणा घालण्याची पद्धत आहे. व्रताचा संकल्प करून गुरूला व गणपतीला नमस्कार केल्यावर प्रथम अग्नीला प्रदक्षिणा घालाव्या. तो लक्ष पुरा झाल्यावर , गोलक्ष-प्रदक्षिणा पुर्या कराव्या. तदनंतर ब्राह्मण व मग हनुमंत यांच्या प्रत्येकी लक्ष प्रदक्षिणा पुर्या कराव्या. नंतर चारही प्रदक्षिणांचे उद्यापन एकदम करावे. उद्यापनाच्या वेळी चौघांच्याही सोन्याच्या प्रतिमा करून लिंगतोभद्रमंडलावर कलश ठेवून त्यावरील पूर्ण पात्रात त्यांची स्थापना करावी. नंतर पायसान्नाचे हवन करावे. प्रतिमा दान करुन यथाशक्ती ब्राह्मणभोजन घालून व्रताची समाप्ती करावी. पिंपळ वड, इ. वृक्षांनाही अशाच प्रकारे लक्ष प्रदक्षिणा करण्याची प्रथा आहे.
विष्णूलाही एक लक्ष प्रदक्षिंणा घालतात. या व्रताला आषाढ शु. एकादशीला प्रारंभ करुन कार्तिक शु. एकादशीला त्याची समाप्ती करतात. नित्य
'कृष्णाय वासुदेवाय हर्ये परमांत्मने '
किंवा
'केशवाय नमः'
या मंत्राचा उच्चार करीत प्रदक्षिणा घालायच्या असतात. ब्राह्मणभोजन घालून व्रताचे उद्यापन करतात. फल- पापनाश व सुखप्राप्ती.
३ शुक्लैकादशी :
या आषाढ शु. एकादशीचे नाव 'देवशयनी' या दिवशी उपवास करावा. सुवर्ण, चांदी, तांबे, पितळ यांच्या मूर्ती करून त्यांची यथाविधी पूजा करुन त्यास पीतांबर नेसवावा आणि शुभ्र वस्त्राने आच्छादित गादी आदींनी सुशोभित पलंगावर झोपवावे. त्या दिवसापासून चार महिनेपर्यंत आपल्या आवडीच्या पदार्थाचा त्याग करावा. उदा. मधुरस्वरासाठी 'गूळ' पुत्रपौत्रादी सुखासाठी 'तेल' शत्रुनाशासाठी 'कडू तेल' सौभाग्यवर्धनासाठी ' गोड तेल', वंशवृद्धीसाठी 'दूध' व सर्वपापाक्षयार्थ 'एकभुक्त, नक्त , अयाचित' व्रत किंवा उपवास करावा. जर या चार महिन्यांत दुसर्यांनी दिलेले पदार्थ भक्षण करण्याचा त्याग केला आणि वरीलपैकी एखादे जरी व्रत केले तरी महाफल मिळते. यास 'गोविंदशयन' व्रत असे म्हणतात.
याच एकादशीचे नाव 'पद्मा' असे आहे. व्रतविधी वरीलप्रमाणेच आहे.
४ स्वापमहोत्सव :
आषाढ शु. एकादशी दिवशी हा महोत्सव करतात. या दिवशी भगवान महाविष्णू क्षीरसागरात शेषाच्या शय्येवर शयन करतात. तो उत्सव साजरा करण्यासाठी म्हणून सर्व क्षणांनी युक्त अशी देवाची सुवर्णमुर्ती करावी, अगर यथाशक्ती चांदी, तांबे, पितळ याची करावी. अगर कागदावर चित्र काढावे. गायन वादन आदी समांरभपूर्वक त्याची यथाविधी पूजा करुन रात्रीच्या वेळी
'सुप्ते त्वयि जगन्नाथे'-
अशी प्रार्थना करुन सुखयुक्त आसनावर त्याला झोपवावे. देवांची झोप रात्री, कूस बदलणे संध्याकाळी आणि जागृती दिवसा असते. याउलट असणे बरे नाही, म्हणून शयन हे अनुराधा नक्षत्राच्या आद्य तृतीयांशात, कूस बदलणे हे श्रवण नक्षत्राच्या मध्य तृतीयांशात व जागे राहणे ही रेवती नक्षत्राच्या अन्त्य तृतीयांशात होत असते. यासाठीच आषाढ, भाद्रपद व कार्तिक एकादशीचे पारणे आषाढात अनुराधा नक्षत्राच्या आद्य तृतीयांशात, भाद्रपदात श्रवण नक्षत्राच्या मध्य तृतीयांशात व कार्तिकात रेवतीच्या अंत्य तृतीयांशात करतात. (एक नक्षत्र सुमारे ६० घटिकांचे असते म्हणून त्याच्या २० घटिकांचा तृतीयांश करुन पहिला, दुसरा व तिसरा हे अंश धरतात.) चातुर्मास्य व्रतांत पलंगावर झोपणे, भार्यासंग, खोटे भाषण, मद्य, मांस, परान्न, तसेच मूग, वांगी इ. पदार्थांचे सेवन करु नये.
रामचंद्रिका ग्रंथात मूर्तीला रथातून वाजत-गाजत नेऊन जलाशयात झोपवण्याची प्रथा सांगितली आहे.
५ पंढरीवारी व्रत :
पंढरीची वारी हे एक कलियुगातील मोक्षदायक व्रत आहे. हे व्रत आषाढ शु. एकादशीपासून करतात. पण मुख्य वारीव्रत म्हणून आषाढ , कार्तिक, माघ व चैत्र या महिन्यांतील शु. एकादशीस करतात., आणि पंढरपूर हे वारकर्यांच्या भागवतधर्माचे अधिष्ठान व आद्य पीठ आहे. त्यामुळे आत्मोद्धार, लोकोद्धार, ज्ञान, भक्ती, प्रपंच आणि परमार्थ इ. गोष्टी या धर्मात एकत्र नांदतात. या भक्तिधर्मात जातिधर्माचा, स्पृश्यास्पृश्य भेद मानला जात नाही व पांडुरंगाचे दर्शन पादस्पर्शाने होते. म्हणून हा वैष्णव संप्रदायांपैकी एक प्रमुख संप्रदाय आहे. पंढरपूरचा विठोबा त्यांचे उपास्य दैवत आहे. पुंडलिकाचे भेटीसाठी पंढरीत परब्रह्म उभे आहे व चरणी भीमानदी पतितांची पापे नाश करण्यास, त्यांचा उद्धार करण्यास सदैव सिद्ध आहे.
पंढरीचे अनादित्व -
'जेव्हा नव्हतें चराचर । तेव्हां होतें पंढरपूर ।
जेव्हां नव्हती गोदागंगा । तेव्हां होती चंद्रभागा ।'
पुंडलीकाची मातृपितृभक्ती पाहून भीमेच्या काठी लोहखंडक्षेत्री (पंढरपुरात रुक्मिणीसह श्रीकृष्ण आले, याचा उल्लेख 'पद्मपुराणा'त आढळतो तो असा-
'ततो निवृत्त आयातः पश्यन् भीमरथीतटे ।
द्विभुजं विठ्ठलं विष्णुं भक्तिमुक्तिप्रदायकम् ।'
स्कंदपुराणात -
'श्रीगुरुं विठ्ठलानंदं परात्परजगत्प्रभुम् ।'
श्रीरामचंद्र पंढरपुरात आले होते असे वर्णन असून;
'पांडुरंग नमस्कृत्य चंद्रभागां विगाह्य च।'
त्यांनी पांडुरंगाचे दर्शन घेऊन चंद्रभागेत स्नान केले असा 'आनंदरामायणा'त निर्देश आहे.
'तत्र श्रीविठ्ठलं देवं प्रियाभ्यां सहशोभितम् ।'
असे 'करवीर महात्म्या'त स्पष्ट म्हटले आहे. म्हणून पंढरपुरास भूलोकीचे वैकुंठ व दक्षिणेची काशी असे म्हणतात. तेव्हा पंढरीच्या विठ्ठलाच्या दर्शनास वारीच्या रूपाने जाणे कलियुगातील महातेजस्वी, प्रभावी व मोक्षदायक आहे. यासाठी पंढरीची वारी करतात. फल-मोक्षप्राप्ती.
पंढरीची वारी वार्षिक, सहामाही, दरमहिन्याची, पंधरवड्याची, दररोजची, जशी वारकरी संप्रदायाची दीक्षा घेतली असेल तशी, करतात. ही वारी पायीच केली पाहिजे. त्यामुळे शाररिक तप घडते, अशी समजूत असल्याने पायी वारीस अधिक महत्व आहे.
वारीची प्रथा - दर महिन्याच्या वारीस येणार्यांचे नित्यनेम कार्यक्रम :
दर महिन्याच्या शु. दशमीस चंद्रभागेचे स्नान, नगरप्रदक्षिणा, पांडुरंगाचे दर्शन, फडावरील परंपरेप्रमाणे कीर्तन, दिंडी, भजन वगैरे . एकादशीस जागर, द्वादशीस पर्वकाळ कीर्तन, कीर्तनानंतर खिरापतीचा प्रसाद घेऊन वारकरी आपापल्या गावी परतात. मात्र आषाढी, कार्तिकीच्या वारीस गोपाळपुराला काल्याचे कीर्तन ऐकून' कालाप्रसाद ' घेऊन मग परततात. वारीच्या गर्दीत कित्येक वारकरी कळसाचे दर्शन घेतात. पांडुरंग मंदिराच्या कळसावर उभा राहून आपल्या भक्तांना दर्शन देतो, अशी त्यांची भावना असते.
निष्ठावंत वारकर्यांमध्ये पायी वारीचे फार महत्व मानले जाते. पायी जरी वारी करीत असले तरी बरोबर भागवतधर्माची जागृतीची खूण म्हणून खांद्यावर पताका, देवपूजेचे साहित्य, नित्यनेमाचा गाथा, विष्णुसहस्त्रनाम, भगवद्गीता, काहींच्याबरोबर तुळशीवृंदावन ही असतात.
'फुटो हे मस्तक, तुटो हे शरीर । नामाचा गजर सोडू नये ।' असे वारकर्याचे ब्रीद आहे.
'रामकृष्ण हरि ' हा संप्रदाय-मंत्र आहे. राम म्हणजे हृदयात रमविणारा, कृष्ण म्हणजे आकर्षण करणारा, हरी म्हणजे ऐक्यरूप असणारा विठ्ठलरुप परमात्मा होय. या मंत्राला सोवळे-ओवळे, स्थळ-काळ, जाति-वित्त-कुळ यांचा प्रतिबंध नाही. गळ्यात तुळशीच्या मण्यांची माळ, कपाळी गोपीचंदनाच्या मुद्रा व बुक्का आणि खांद्यावर पताका ही वारकर्यांची बोधचिन्हे होत. वारी करणार्यांना गुरु करुन घेऊन त्याकडून माळ घ्यावी लागते. गुरू माळ देताना शिष्याकडून काही नियम पाळ्ण्याची शपथ घेववतात. ते नियम :-
(१) खरे बोलणे,
(२) परस्त्री मातेसमान मानणे,
(३) काही अपघात घडला असता भगवंताने क्षमा करावी, म्हणून त्याची कळकळीने प्रार्थना करणे,
(४) मद्यमांसाहार आदी सेवन न करता सात्विक आहार घेणे,
(५) दर पंधरवड्यांच्या एकादशीचे व्रत करणे,
(६) वर्षातून निदान एकदा तरी पंढरीची वारी करणे,
(७) नित्यनेम म्हणून दररोज 'रामकृष्णहरी' या मंत्राचा १०८ वेळा माळ ओढून जप करणे,
(८) नित्यनेमाने 'हरिपाठा'चे अंभंग म्हणणे व ज्ञानेश्वरीच्या काही ओव्या नियमित वाचणे आणि
(९) प्रपंचात वाट्यास आलेली नित्यकर्मे श्रीविठ्ठलस्मरणार्थ प्रामाणिकपणाने पार पाडणे.
कोणत्याही वेळी केव्हाही गळ्यातून तुळशीची माळ काढीत नाहीत. माळ तुटलीच तर दुसरी माळ घालीपर्यंत निष्ठावंत वारकरी थुंकीदेखील गिळत नाही. असे केले नाही, तर ब्रह्महत्येचे पातक समजतात.
६ या महिन्यातील एकादशीला शयनी एकादशी असे म्हणतात.
कथा -
युधिष्ठिराने विचारले, केशवा, आषाढ शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय? त्या दिवशी कोणत्या देवाची पूजा करावी व त्या व्रताचा विधी कसा आहे ते मला सांगा.'
श्रीकृष्ण म्हणाले, 'हे पृथ्वीचे पालन करणार्या राजा, जी कथा पूर्वी ब्रह्मदेवाने नारदाला सांगितली, तीच आश्चर्यकारककथा मी तुला सांगतो.'
नारदाने विचारले, 'पित्या ब्रह्मदेवा, आषाढाच्या शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय आहे? व तिचे माहात्म्य काय ते मला सांगा कारण मला विष्णूची आराधना करायची आहे?'
ब्रह्मदेव म्हणाले, 'कलियुग आवडणार्या मुनीश्रेष्ठा, तू चांगले विचारलेस. तू खरोखरच वैष्णव आहेस. त्रैलोक्यामध्ये एकादशीसारखे दुसरे पवित्र व्रत नाही. हे व्रत पुण्यकारक असून ते पापांचा नाश करते, व सर्व इच्छा पूर्ण करते. ज्या मनुष्यांनी जन्माला येऊन हे व्रत केले नाही, त्यांना खरोखरच नरकाची इच्छा आहे असे समजावे. आषाढ महिन्यातील शुक्ल एकादशी पद्मा किंवा शयनी या नावाने प्रसिद्ध आहे. ह्रषीकेशाच्या प्रीतीकरता या एकादशीचे उत्तम व्रत जरूर करावे.
आता मी तुला या एकादशीची पुराणातील कथा सांगतो. ही कथा ऐकल्यानेही महापापाचा नाश होतो.
पूर्वी सूर्यवंशामध्ये मांधाता नावाचा राजा होता. तो चक्रवर्ती, सत्यप्रतिज्ञ व प्रतापी होता. तो आपल्या प्रजेचे पालन धर्माने व स्वतःच्या औरसपुत्राप्रमाणे करीत असे. त्याच्या राज्यात कधीहे दुष्काळ पडत नसे व कोणालाही कसल्याच आधीव्याधी नव्हत्या. त्या राजाच्या कोषागारात अन्यायाने मिळवलेले धन थोडेसुद्धा नव्हते. तो अशाप्रकारे राज्य करीत असताना पुष्कळ वर्षे लोटली.
एकदा राजाच्या पूर्वजन्माच्या पापामुळे त्याच्या राज्यात तीन वर्षे पाऊस पडला नाही. त्यामुळे सर्व प्रजाजन वैतागले. व भुकेने आर्त झाले. राज्यात धान्य अजिबात नसल्यामुळे देवयज्ञ, पितृयज्ञ, अग्निहोत्रे व वेदाध्ययन हे सर्व बंद पडले.
तेव्हा सर्व प्रजाजन राजाकडे आले आणि म्हणाले, 'राजा, प्रजेला हिताचे ठरेल असे आमचे बोलणे ऐक. पुराणामध्ये पंडितांनी पाण्याला 'नारा' असे म्हटले आहे. तेथे पाण्यातच राहण्याचे भगवंतांचे घर-आयन-आहे म्हणून तर भगवंतांना नारायण असे म्हणतात. नारायण सर्वांच्या ह्रदयात राहतो. हा भगवान विष्णू पर्जन्यरूपच आहे. पर्जन्याची वृष्टी तोच करतो. त्यातूनच अन्न निर्माण होते व अन्नातूनच प्रजा निर्माण होते.
'हे राजा, असा हा पर्जन्य नसेल तर प्रजेचा नाश होतो. तेव्हा नृपश्रेष्ठा, ज्यामुळे पाऊस पडेल व आमचा योगक्षेम चालेल असे काहीतरी कर.'
राजा म्हणाला, 'प्रजाजनांनो, तुम्ही सांगितलेत ते अगदी खरे आहे. अन्न हे ब्रह्मस्वरूपच आहे. सर्व चराचर जग अन्नामुळेच स्थिर आहे. सर्व भूतमात्र-प्राणीमात्र अन्नातूनच निर्माण होतात. जगाचे जीवन अन्नावरच चालते. पुराणात व लोकांच्या तोंडून मी असे ऐकले आहे की, राजांच्या अनाचराम्ळेच प्रजाजनांचे दुःख भोगावे लागते. मी सूक्ष्म बुद्धीने विचार करीत आहे. मी काही पाप केल्याचे मला आढळले नाही. तरीही प्रजाजनांचे हित व्हावे म्हणून मी सर्व प्रयत्न करीन.'
राजाने असा विचार केला आणि विधात्याला नमस्कार करून व बरोबर मोठे सैन्य घेऊन तो गहन वनात गेला. तेथे तप करणार्या श्रेष्ठ मुनींच्या आश्रमांना त्याने भेटी दिल्या. त्यावेळी त्याला ब्रह्मदेवाचा मानसपुत्र असलेला अंगिराऋषी दिसला. त्याच्या तेजाने दाही दिशा उजळल्या होत्या. तो जणू दुसरा ब्रह्मदेवच आहे काय, असे वाटत होते.
त्या ऋषीला पाहून मांधाता राजाला आनंद झाला व तो रथातून उतरून त्याच्यापुढे हात जोडून एखाद्या सेवकाप्रमाणे उभा राहिला.
त्या ऋषीने राजाला आशीर्वाद देऊन त्याचे अभिनंदन केले व राज्यातील राजा, प्रधान, मित्र, भांडार, देश, किल्ले व सेना या राज्याच्या सात अंगाविषयी कुशल विचारले.
राजाने स्वतःचे कुशल निवेदन करून ऋषीचे कुशल विचारले. नंतर ऋषीने राजाला इकडे वनात येण्याचे कारण विचारले.
मुनीला ते कारण सांगताना राजा म्हणाला, 'मुनि श्रेष्ठा, मी स्वधर्माप्रमाणे पृथ्वीचे पालन करीत होतो. तरीही माझ्या राज्यात अनावृष्टी का व्हावी, याचे कारण मला समजत नाही. माझा संशय नाहीसा व्हावा म्हणून मी आपया पायांपाशी आलो आहे. तरी प्रजाजनांचा योगक्षेम चालेल व त्यांचे समाधान होईल असा उपाय सुचवावा.
अंगिरा ऋषी म्हणाला, 'राजा, हे कृतयुग सर्व युगात उत्तम आहे असे म्हणतात. या युगात ब्राह्मणधर्म प्रधान आहे आणि धर्माचे चारी चरण संपूर्ण आहेत. या युगात तप करण्याचा धर्म फक्त ब्राह्मणांचा आहे. असे असता, राजा, तुझ्या राज्यात एक शूद्र तप करीत आहे. करू नये असे काम त्याने केल्यामुळे तुझ्या राज्यात मेघ वर्षत नाहीत. तू त्या शूद्राचा वध करण्याचा प्रयत्न कर म्हणजे दोष दूर होईल.'
राजा म्हणाला, 'तपश्चर्या करणार्या त्या शूद्राने माझा काहीच अपराध केलेला नाही. तो निरपराध असताना मी त्याला मारणार नाही. तरी दुष्काळ नाहीसा होण्यासाठी मला एखादा धार्मिक उपाय सांगा.
ऋषी म्हणाला, 'राजा, असे असेल तर तू आषाढ शुक्ल पक्षातील पद्मा नावाच्या एकादशीचे व्रत कर. या व्रताच्या प्रभावाने तुझ्या राज्यात निश्चितपणे उत्तम वृष्टी होईल. ही एकादशी सर्व सिद्धी देणारी आहे व सर्व उपद्रवांचा नाश करणारी आहे. राजा, तू आपल्या परिवारासह व प्रजाजनांसह या एकादशीचे व्रत कर.'
मुनीचे हे म्हणणे ऐकून राजा घरी परतला. आषाढ महिना आल्यावर त्याने पद्मा (म्हणजेच शयनी) एकादशीचे व्रत केले. ब्राह्मण, वैश्य, शूद्र या चारी वर्णांच्या प्रजाजनांनीही हे व्रत केले.
राजा, त्या सर्वांनी असे व्रत करताच मेघांनी वर्षा सुरू केली. सर्व पृथ्वी जलाने भरून गेली. व थोड्या दिवसातच शेते पिकांनी शोभू लागली. ह्रषीकेशाच्या प्रसादाने सर्व लोकांना सौख्य लाभले.
याकरिता पद्मा एकादशीचे हे उत्तम व्रत अवश्य करावे. हे व्रत ऐश्वर्य व मुक्ती देणारे व सर्वांना सुखदायक आहे. या एकादशीचे माहात्म्य वाचल्याने किंवा ऐकल्याने मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो.
॥याप्रमाणे ब्रह्मांडपुराणातील पद्मा एकादशीचे माहात्म्य संपूर्ण झाले॥
॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥