गोकुळ अष्टमी नवरात्र :
कित्येक देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण-समाजात हे नवरात्र असते. श्रावण व. प्रतिपदेला सुरू होऊन ते नवमीला पारणे झाल्यावर संपते. या नवरात्रात भागवत सप्ताहाचे विशेष महत्त्व आहे. या अवधीत संपूर्ण भागवत वाचणे, न जमल्यास निदान त्याचा दशम स्कंध तरी वाचतात किंवा श्रवण करतात. याशिवाय अखंड नामसप्ताह, कीर्तन व भंडारा हे कार्यक्रम या दिवसांत असतात. लक्ष्मीनारायण, गोपालकृष्ण, मुरलीधर, विठ्ठल इ. देवांच्या मंदिरात हे नवरात्र साजरे होते. शेवटी गोपालकाला होतो.
धनावाप्ती व्रत
एक काम्य व्रत. श्रावण वद्य प्रतिपदेला या व्रताचा प्रारंभ करतात. व्रतावधी एक महिना. विष्णू व संकर्षण यांची निळ्या कमळांनी पूजा करणे, व भाद्रपद पौर्णिमेपूर्वी तीन दिवस उपवास करणे असा याच विधी आहे. उद्यापनाच्या वेळी गोप्रदान करतात.
चैत्र शुद्ध प्रतिपदेला व्रतारंभ करणे, हा याचा दुसरा पर्याय आहे. या पर्यायात विष्णू, पृथ्वी, आकाश व ब्रह्मा यांची अनुक्रमे प्रतिपदा ते चतुर्थी पर्यंत पूजा करतात. व्रतावधी एक वर्ष -
फल - धन, सौंदर्य व सुख यांची प्राप्ती.