* गोत्रव्रत
श्रावण व. चतुर्थीला स्त्रिया हे व्रत करतात. या चतुर्थीला 'बेल चौथ' असेही म्हणतात. व्रताचा विधी असा - एकवर्णी सवत्स धेनूची पूजा. 'तुझे सत्य माझी भक्ती' असे वाक्य गाईच्या कानात उच्चारणे. कथाश्रवण व नंतर भोजन. या दिवशी गोरसाचा कोणताही पदार्थ खात नाहीत. त्याचप्रमाणे सुरीने किंवा कात्रीने कापलेले कोणतेही पदार्थ खात नाहीत.
फल - पुत्रप्राप्ती व सौभाग्यवृद्धी.
* संकष्टी
हि विनायकाची चतुर्थी आहे. या दिवशी दिवसभर उपवास करावा. सायंकाळी गणेशाचे यथाविधी पूजन करून करुणा भाकावी व त्यास लाडवांचा नैवेद्य दाखवून लाडवांचेच दान करावे. यायोगे संकटांचा नाश होऊन धनधान्यादी रूपाने संपत्ती प्राप्त होते. सर्व दु:खे नाश पावतात. या व्रताच्या प्रभावाने युधिष्ठिरास राज्य व पुनर्वैभव प्राप्त झाले. तसेच, महापापी कारूस अनायासे हे चतुर्थीचे व्रत घडल्याने देवलोक प्राप्त झाला.