* अश्वपूजा
ज्यांच्या घरी घोडे असतील, त्यांनी आश्विन शु. प्रतिपदेपासून नवमीपर्यंत रोज अश्वपूजा करावी, असे सांगितले आहे. त्याचे विधान असे - शांती व स्वस्त्यन करणे; धणे, बिब्बे, कोष्टकोळींजन, वेखंड व मोहर्या यांची पुरचुंडी करून घोड्याच्या गळ्यात बांधणे; वायू, वरुण, सूर्य, विष्णू, विश्वेदेव व अग्नी यांच्या मंत्रांनी हवन करणे;
* अशोक व्रत किंवा अशोका प्रतिपदा
हे व्रत स्त्रियांसाठी आहे. आश्विन शु. प्रतिपदेला नव्याने पल्लवित झालेल्या ( नव्याने पालवी फुटलेल्या ) अशोकवृक्षापाशी सप्तधान्ये, गव्हाच्या लोंब्या, मोदक, डाळिंबादी ऋतुकालोद्भव फलपुष्प ठेवून ( अर्पण करून ) यथाविधी पूजन करावे, आणि 'अशोक शमनोभव सर्वत्र न-कुले' असे म्हणून अर्घ्य द्यावे. बुंध्याशी उत्तम वस्त्रे गुंडाळावीत, पताका लावाव्या. असे केले असता व्रत करणार्या स्त्रिच्या सर्व दु:खांचे निवारण होते. जनककन्या सीता हिने लंकेमध्ये असता अशोकवाटिकेमध्ये हे व्रत केले होते आणि त्यामुळे तिचे शोकनिवारण झाले होते.
* नवरात्र व्रत
हे व्रत आश्विन शु. प्रतिपदेपासून नवमीपर्यंत करतात. व्रताला आरंभ करण्यास अमायुक्त प्रतिपदा वर्ज्य समजावी. द्वितियायुक्त प्रतिपदा शुभ समजावी. व्रताच्या नऊ रात्री पूर्ण होतील तेव्हा व्रत पूर्ण झाले असे जाणावे. तिथीच्या क्षयवृद्धीने दिवससंख्येत न्यूनाधिक्य होत नाही. आरंभदिवशी चित्रा नक्षत्र आणि वैधृती योग असेल तर दोन्ही संपल्यावर व्रतारंभ करावा. परंतु देवीचे आवाहन, स्थापन आणि विसर्जन या तिन्ही गोष्टी प्रात:काळी करतात. म्हणून चित्रादी वर्ज्य गोष्टी अधिक काल राहात असतील तर त्याच दिवशी अभिजित् मुहूर्तावर आरंभ करावा. तसे पाहिले तर, वासंतिक नवरात्रामध्ये शक्तीची उपासना प्रधान गणली जाते. परंतु या दोन्ही उपासना व्यापक असल्यामुळे दोन्ही नवरात्रांत दोन्ही करतात. याबाबतीत वर्णभेद, विधानभिन्नता अगर देवतादी भेद नाही. सर्व वर्णाचे लोक आपापल्या अभिष्ट देवतेची उपासना करतात. जर संपूर्ण नवरात्रभर व्रत करणे अशक्य असेल तर
* प्रतिपदेपासून सप्तमीपर्यंत सप्त-रात्रिक व्रत करावे.
* पंचमीला एकभुक्त राहून, षष्ठीला नक्तव्रत करून (तारकादर्शनोपरान्त भोजन करून), सप्तमीस अयाचित सेवन करून, अष्टमीला व नवमीला पारणे करून पंचरात्रिक व्रत करावे;
* सप्तमी, अष्टमी व नवमीला एकभुक्त राहून त्रिरात्रिक व्रत करावे;
* आरंभदिनी व समाप्तिदिनी द्विरात्रिक व्रत करावे किंवा
* आरंभदिनी अगर समाप्तिदिनी एकरात्रिक व्रत करावे. व्रत कोणत्याही प्रकारे केले तरी अभिष्ट-सिद्धी होते. सुरुवातीस मृत्तिका पसरून एक वेदी (चौक) तयार करावी. त्यासाठी पवित्र स्थान निवडावे. त्या वेदीवर जव, गहू आदी धान्ये पेरावीत. त्यावर शक्तिनुसार सुवर्णादीचा कलश स्थापित करावा. कलशावर सोने, चांदी, तांबे, मृत्तिका, पाषाण याची मूर्ती किंवा चित्र याची स्थापना करावी. जर मूर्ती मातीची, कागदाची (चित्ररूपिणी ) किंवा शेंदुरादिकाची असेल व स्नानादी विधींनी ती विद्रूप होण्याची वा विरून जाण्याची शक्यता असेल तर तिच्यावर काच बसवावी आणि खड्गादी आयुधे आतीला बाजूस ठेवावी. मूर्ती उपलब्ध होण्यासारखी नसेल तर कलशाच्या मागील बाजूस (भिंतीवर) स्वस्तिक व त्याच्यामागे दोन्ही बाजूंस त्रिशूळ काढावे आणि दुर्गाचे चित्र, पुस्तक किंवा शाळिग्राम वगैरे ठेवून विष्णुचे पूजन करावे. पूजेचे सात्त्विकी, राजसी आणि तामसी असे तीन प्रकार आहेत. यांपैकी सात्त्विकी पूजा अधिक प्रचलित आहे. नवरात्र-व्रताचा आरंभ करताना सर्वप्रथम गणपती, मातृका, लोकपाल, नवग्रह आणि वरुण यांचे पूजन, स्वस्तिवाचन आणि मधुपर्क- ग्रहण करून मुख्य मूर्तीची वेदविधीनुसार, पद्धतिक्रमानुसार किंवा आपल्या सांप्रदायिक पद्धतीनुसार पूजा करावी. ही मुख्य मूर्ती राम-कृष्ण, लक्ष्मीनारायण किंवा शक्ती, भगवती, देवी इ. कोणत्याही अभिष्ट देवतेचॊ असावी. देवीच्या नवरात्रात महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वतीची पूजा अणि सप्तशतीचा पाठ या गोष्टींना प्राधान्य आहे. पाठ करायचा असेल तर पाठ्यपुस्तक देवतातुल्य मानून त्याचे पूजन करावे. १, ३, ५ अशा विषम संख्यात्मक सप्तशतीची पारायणे करावी. पाठासाठी विशेष ब्राह्मण निमंत्रित करणे असतील तर त्यांची संख्याही १, ३, ५ अशी विषम असावी. सप्तशतीचे पाठ (पारायणसंख्या) आपल्या उद्दिष्टाच्या स्वरूपानुसार पुढीलप्रमाणे करावे.
* फलसिद्धी १,
* उपद्रव-शांतीसाठी ३,
* सामान्यत: सर्व प्रकाराच्या शांतीसाठी ५,
* भयमुक्तीसाठी ७,
* यज्ञ-फलाच्या प्राप्तीसाठी ९,
राज्यप्राप्तीसाठी ११,
* कार्यसिद्धीसाठी १२,
* एखाद्याला वश करण्यासाठी १४,
* सुखसंपत्तीच्या प्राप्तीसाठी १५,
* धनपुत्रप्राप्तीसाठी १६,
* शत्रू, रोग आणि राजा यापासूनच्या भयनिवारणासाठी १७,
* प्रियप्राप्तीसाठी १८,
* अनिष्ट ग्रहांच्या दोष निवारणासाठी २०,
* बंधमुक्तीसाठी २५,
आणि मृत्युभय, व्यापक उपद्रव, तसेच देशविनाश इत्यादीपासून बचाव व्हावा आणि असाध्य गोष्टीच्या सिद्धीस्तव, तसेच लोकोत्तर लाभास्तव, आवश्यकतेनुसार १००; १०००; दहाहजार, व एक लाखपर्यंत सप्तशतीपाठ करावे. देवीव्रतांमध्ये 'कुमारीपूजन' परमावश्यक मानले गेले आहे. शक्य तर नवरात्र संपेपर्यंत, नाही तर समाप्तीच्या दिवशी कुमारीचे पाय धुऊन तिची गंधपुष्पादींनी पूजा करावी. तिला मिष्टान्न भोजन वाढावे.
* एका कुमारिकेचे पूजन केले असता ऎश्वर्यप्राप्ती होते;
* दोघींचे पूजन केले असता भोग व मोक्षप्राप्ती होते;
* तिघींचे पूजन केल्याने धर्म-अर्थ-काम यांची प्राप्ती होते;
* चौघींच्या पूजनाने राज्यपदप्राप्ती;
* पाच जणींचे पूजन केल्याने विद्याप्राप्ती;
* सहांच्या पूजनाने षट्कर्मसिद्धी;
* सातांच्या पूजनाने राज्यप्राप्ती;
* आठजणींच्या पूजेने संपत्ती आणि
* नऊ कुमारींची पूजा केली असता पृथ्वीचे राज्य मिळते.
दोन वर्षांची मुलगी कुमारी, तीन वर्षांची त्रिमूर्तिनी, चार वर्षांची कल्याणी, पाच वर्षांची रोहिणी, सहा वर्षांची काली, सात वर्षांची चण्डिका, आठ वर्षांची शांभवी, नऊ वर्षांची दुर्गा आणि दहा वर्षांची सुभद्रा-स्वरूपिणी संबोधिली जाते. कुमारीपूजनासाठी याहून मोठी मुलगी अग्राह्य होय. दूर्गापूजेमध्ये प्रतिपदेला केसांना लावण्याची द्रव्ये-आवळा, सुगंधी तेल, इ. वहावीत, द्वितीयेला केस बांधण्यासाठी रेशमी दोरा वहावा, तृतीयेला सिंदूर व आरसा अर्पण करावा, चतुर्थीला मधुपर्क, तिलक आणि नेत्रांजन, पंचमीला उटणे, चंदनादी अंगराग व अलंकार आणि षष्ठीला फुले अर्पण करावीत. सप्तमीला गृहमध्यपूजा, अष्टमीला उपवासपूर्वक पूजन, नवमीला महापूजा व कुमारीपूजन आणि दशमीला आरती आणि विसर्जन करावे. याचप्रमाणे रामकृष्णादींच्या नवरात्रमहोत्सवात स्तोत्रपाठ किंवा लीलाप्रदर्शनाचा कार्यक्रम करावा. हा सर्व उल्लेख केवळ दिग्दर्शनात्मक आहे. तरी विशेष गोष्टींची माहिती अन्य ग्रंथांमधून अवगत करून घ्यावी. याप्रमाणे नऊ दिवसपर्यंत नवरात्रव्रत करून दहाव्या दिवशी दशांश हवन, ब्राह्मणभोजन आणि व्रतोद्यापन ( विसर्जन ) करावे.