* आश्विनी
आश्विन पौर्णिमेस तिन्हीसांजा आई आपल्या सर्वांत मोठ्या मुलाला (मुलगा किंवा मुलगी) ओवाळून त्याचे औक्षण करते व त्याला दूध प्यायला देते. विशेषत: महाराष्ट्रात हा प्रघात आहे. याला मुलांची आश्विनी करणे, असे म्हणतात.
कोजगरव्रत
आश्विन पौर्णिमेला (निशीथव्यापिनी ) ऎरावतावर आरूढ झालेल्या इंद्राची आणि महालक्ष्मीची पूजा करावी. उपवास करावा. गंधपुष्पादींनी पूजिलेले व तुपाचे एक लक्ष, पन्नास हजार, दहा हजार, एक हजार किंवा केवळ शंभर दीप लावून देवमंदिर, बाग- उद्याने, तुलसीवृंदावन अश्वत्थवृक्ष, वस्तीतील रस्ते, चौक, गल्ल्या, घराची छते इ. ठिकाणी ठेवावे. उजाडल्यावर स्नान वगैरे करून पूजा करावी. ब्राह्मणांना घृतशर्करामिश्रित खीर वाढावी. वस्त्रे, दक्षिणा देऊन सुवर्णाचे दीप दान करावे. असे केल्याने अनंतफलाची प्राप्ती होते. या दिवशी रात्री इंद्र आणि लक्ष्मी विचारीत असतात, 'कोण जागे आहे?' उत्तरादाखल त्यांचे पूजन आणि दीपप्रज्वलन पाहिले म्हणजे त्या देवता प्रसन्न होतात आणि हे व्रत करणारास लक्ष्मी आणि प्रभुत्व प्राप्त होते.
* कौमुदी महोत्सव
आश्विन पौर्णिमेस होणारा प्राचीन लोकोत्सव. वात्स्यायनाने याला कौमुदीजागर व वामन पुराणाने याला दीपदानजागर म्हटले आहे. बौद्धकालात हा उत्सव साजरा होत असे.
या दिवशी नगरात उत्साहाचे वातावरण पसरे. लोक गावातले रस्ते स्वच्छ करीत. घरावर ध्वज लावीत. घरेदारे पुष्पमालांनी शृंगारीत. रात्रौ दीपाराधना करीत. स्त्री-पुरुष रात्रीच्या वेळी वस्त्राभूषणांनी नटून शहरात हिंडत. जागोजाग नृत्याच्या मैफली चालत. लोक रात्रभर जागरण करीत व जुगारही खेळत. या दिवशी बलिराजाची पूजा करावी, असे वामन पुराणात सांगितले आहे.
* शरत्पूर्णिमा
या व्रतासाठी प्रदोषव्यापिनी व निशीथव्यापिनी पौर्णिमा घ्यावी. अशी पौर्णिमा पहिल्या दिवशी निशीथव्यापिनी व दुसर्या दिवशी प्रदोषव्यापिनी असेल तर पहिल्या दिवशी व्रत करावे.
या दिवशी काश्याच्या भांड्यात तूप घालून ते सुवर्णसहित ब्राह्मणास दान दिले असता ओज प्राप्त होते.
अपराह् ण काळी हत्तीची आरती केली असता उत्तम फळ मिळते. आणि अन्य प्रकारचे अनुष्ठान केले असता सफल सिद्धी होते. याखेरीज निशीथव्यापिनी आश्विन पौर्णिमेला सकाळच्या वेळी आराध्य देवतेला चांगल्या शुभ्र वस्त्रभूषणांनी सुशोभित करून तिची षोडशोपचार पूजा करावी आणि रात्रीच्या वेळी गाईच्या दुधाची उत्तम खीर बनवून त्यात तूप व खडीसाखर घालावी व मध्यरात्रीच्या वेळी देवतेला अर्पण करावी. तसेच पूर्णचंद्र मध्याकाशात आल्यावर त्याची पूजा करावी आणि वर सांगितलेल्या खिरीचा नैवेद्य दाखवावा व दुसर्या दिवशी ती स्वत: सेवन करावी.