आश्‍विन शु. दशमी

Ashvina shudha Dashmi


* अपराजिता-पूजा

आश्‍विन शु. दशमीला प्रस्थान काढण्यापूर्वी अपराजितादेवीचे पूजन करतात. त्यासाठी अक्षतादिकांचे अष्टदल काढून त्यावर मृत्तिकेची मूर्ती स्थापन करतात.

'ॐ अपराजितायै नम:'

असे म्हणून तिची स्थापना, नंतर

'ॐ क्रियाशक्‍तये नम:'

असे म्हणून तिच्या उजव्या बाजूस 'जया' देवीची स्थापना आणि

'ॐ उमायै नम:'

असे म्हणून डाव्या बाजूस 'विजया' देवीची स्थापना करून आवाहनादी पूजा करावी, आणि

'चारुणा मुखपद्मेन विचित्रकनकोज्ज्वला ।

जयादेवी भवे भक्‍ता सर्वकामान् ददातु मे ॥

कांचनेन विचित्रेन केयूरेण विभूषिता ।

जयप्रदा महामाया शिवभावितमानसा ।

विजया च महाभागा ददातु विजयं मम ।

हरेण सुविचित्रेण भास्वत् कनकमेखला ।

अपराजिता रुद्ररता करोतु विजयं मम ।'

अशा मंत्रांनी जया, विजया आणि अपराजित यांची प्रार्थना करावी. हळदीने रंगविलेल्या वस्त्रात दूर्वा व तीळ बांधून दोर बनवावा. नंतर तो दोर

'सदा पराजिते यस्मात्त्वं लतसत्तमास्मृता ।

सर्वकामार्थसिद्ध्यर्थं तस्मात्त्वां धारयाम्यहम् ॥'

अशा मंत्राने अभिमंत्रित करावा आणि

'जयदे वरदे देवि दशम्यामपराजिते ।

धारयामि भुजे दक्षे जयलाभाभिवृद्धये ॥'

असे म्हणून तो दोरा उजव्या हातात धारण करावा.

 

 

* कूष्मांड दशमी

आश्‍विन शु. दशमीचे नाव. हिच्या व्रताचा विधी पुढीलप्रमाणे - शिव, दशरथ व लक्ष्मी यांची कोहळ्याच्या फुलांनी पूज व चंद्राला अर्घ्य. व्रतावधी दशमीपासून त्याच महिन्याच्या व. चतुर्थीपर्यंत.

 

 

* नवरात्रिसमाप्ती

आश्‍विन शु. दशमीला भगवतीचे यथाविधी पूजन करून आरती करावी.

'यज्ञेन यज्ञमयजन्त देवा:'

आदी मंत्रपुश्प करावा.

'मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं यदर्चितम् । पूर्णं भवतु तत्सर्वं त्वत्प्रसादान्महेश्‍वरि ॥'

अशी प्रार्थना करावी.

'ॐ दुर्गायै नम: ।'

म्हणून एक फूल ईशान्य दिशेस सोडावे आणि

'गच्छ गच्छ परं स्थानं स्वस्थानं देवि चंडिके ।

व्रतस्रोतो जलं वृद्धयै तिष्ठ गेहे च भूतये ॥'

अशा मंत्राने कलशस्थ देवमूर्ती वगैरे उठवून यथास्थान स्थापित करावी. जर मूर्ती मृत्तिकेची असेल आणि भात-गहूचे 'रुजवण' आले असेल तर दोन्ही वाजत-गाजत नजीकच्या जलाशयावर न्यावी आणि त्यांचे जलात विसर्जन करावे. पुढीलप्रमाणे विसर्जनाचा मंत्र म्हणावा -

'दुर्गे देवी जगन्मात: स्वस्थानं गच्छ पूजिते ।

षण्मासेषु व्यतीतेषु पुनरागमनाय वै ।

इमां पूजां मया देवि यथाशक्त्योपपादिताम् ।

रक्षार्थं त्वं समादाय व्रज स्वस्थानमुत्तमम् ॥

याविषयी 'मत्स्यसूक्‍ता' चा असा आदेश आहे की,

'देवे दत्वा तु दानानि देवे दद्याच्च दक्षिणाम् ।

तत्सर्वं ब्राह्मणे दद्यादन्यथा विफलं भवेत ॥'

नवरात्रादी व्रताच्या वेळी स्थापित देवतेला फल-पुष्प-नैवेद्य अथवा उपाहारादी जे जे अर्पण केले असेल ते ते ब्राह्मणाला द्यावे. नाहीपेक्षा व्रत निष्फल होते.

 

 

 

* विजयादशमी

आश्‍विन शु. दशमील श्रवण-नक्षत्रयोग असता विजयादशमी असते. या दिवशी राज्यवृद्धीच्या भावनेने आणि विजयप्राप्तीच्या आकांक्षेने राजेलोक 'विजयकाली' प्रस्थान करतात. 'ज्योतिर्निबंध' ग्रंथात लिहिले आहे की,

'आश्‍विनस्य सिते पक्षे दशम्यां तारकोदये

स कालो विजयो ज्ञेय: सर्वकार्यार्थ सिद्धये ॥'

आश्‍विन शु. दशमीला संध्याकाळी तारकोदयाचा समय हा 'विजयकाल' होय. या वेळी केलेली सर्व कार्ये सिद्धी पावतात. आश्‍विन शु. दशमी पूर्वविद्ध निषिद्ध, परविद्धा शुद्ध आणि श्रवणयुक्त सूर्योदयव्यापिनी सर्वश्रेष्ठ होय. राजेलोकांनी या दिवशी प्रात:स्नानादी नित्यकर्मे उरकून

'मम क्षेमारोग्यादिसिद्धयर्थं यात्रायां विजयसिद्धयर्थं गणपतिमातृकामार्गदेवता परजिताशमीपूजनानि करिष्ये ।'

असा संकल्प करून उपर्युक्त सर्व देवता, अस्त्रशस्त्र-अश्‍वादी, तसेच पूजनीय गुरुजन, इत्यादींची यथाविधी पूजा करावी आणि उत्तमतर्‍हेने सजवलेल्या घोड्यावर आरूढ होऊन अपरासह् णमयी गज, तुरंग, रथ राज्यैश्‍वर्य इत्यादिसहित स्वारीस निघावे. आपल्या नगराच्या बाहेर ईशान्य कोपर्‍यात शमी आणि अश्‍मन्तक (आपटा) वृक्षाच्या समीप घोड्यावरून उतरावे. शमीच्या बुंध्याजवळच्या भूमीवर प्रोक्षण करावे आणि पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुख बसून प्रथम शमीवृक्षाचे, नंतर अश्‍मंतक वृक्षाचे पूजन करावे. नंतर

'शमी शमय मे पापं शमी लोहितकंटका । धारिण्यर्जुनबाणानां रामस्य प्रियवांदिनी ॥

करिष्यमाणयात्रायां यथाकालं सुखं मम । तत्र निर्विघ्नकर्ती त्वं भव श्रीरामपूजिते ॥'

या मंत्राने शमीची प्रार्थना करावी आणि

'अश्मन्तक महावृक्ष महादोषनिवारक । इष्टानां दर्शन देहि शत्रूणां च विनाशनम् ।'

अशा मंत्राने अश्‍मन्तकाची प्रार्थना करावी. नंतर शमीची किंवा अश्‍मन्तकाची किंवा दोहोंची पाने घेऊन त्यात पूजास्थानची थोडीशी माती आणि थोडे तांदूळ व एक सुपारी ठेवून कपड्यात बांधून घ्यावी आणि कार्यसिद्धीच्या कामनेने स्वत:पाशी ठेवावी. नंतर आचार्यादिकांचे आशीर्वाद घेऊन तेथेच पूर्वदिशेला विष्णूला प्रदक्षिणा करून आपल्या शत्रूचे स्वरूप ह्रदयामध्ये आणि त्याची प्रतिकृती डॊळ्यात उभी करून तोफ, बंदूक किंवा सुवर्णशर याने त्याच्या ह्रदयाच्या मर्मस्थलाचा भेद करावा अणि हाती खड्‌ग घेऊन दक्षिण दिशेला आरंभ करून वृक्षानजीकच्या चारी दिशांना भ्रमण करून विजय प्राप्त करावा आणि 'शत्रूला जिंकले आहे' असे म्हणावे. यानंतर नगराकडे पूर्ववत परतावे आणि प्रवेशद्वारी आरती करून निवास करावा.

N/A

N/A
Last Updated : February 10, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP