मास - शिवरात्री
हे व्रत चैत्र आदीकरून सर्व महिन्यांत वद्य चतुर्दशीला करतात. त्यासाठी बर्याच रात्रीपर्यंत असणारी त्रयोदश - विद्धा चतुर्दशीच दिवस पाहिला जातो. कारण याव व्रतातही महाशिवरात्री व्रताप्रमाणेच चारी प्रहर पूजा आणि जागरण ह्या गोष्टी असतात. यात जया त्रयोदशीचा योग विशेष फलदायी समजला जातो. या व्रताला दीपावली किंवा मार्गशीर्षापासून आरंभ करावा.
* शिवरात्री
हे व्रत माघ व. चतुर्दशीला करतात. हे व्रत प्रतिवार्षिक म्हणून केले जाते. त्या दृष्टीने हे 'नित्यव्रत' आहे. तसेच मनात काही हेतू बाळगून त्याच्या पूर्तीसाठीही केले जाते व त्या दृष्टीने हे 'काम्यव्रत' आहे. प्रतिपदादी तिथीचे अग्नीआदी स्वामी आहेत. ज्या तिथीचा जो स्वामी असेल त्या तिथीस त्याचे पूजन करणे अधिक चांगले. चतुर्दशीचा स्वामी शिव होय. या दिवशीच्या रात्री हे व्रत करतात म्हणून याला 'शिवरात्री व्रत' म्हणतात ते योग्यच होय. प्रत्येक महिन्याची वद्य चतुर्दशी ही शिवरात्रच असते आणि शिवभक्त प्रत्येक वद्य चतुर्दशीला हे व्रत करतात. परंतु ईशान संहितेमधील 'शिवलिंगतयोद्भूता: कोटिसूर्यसमप्रभ: ।' या वचननुसार माघ व. चतुर्दशीच्या मध्यरात्री ज्योतिर्लिंगाचा प्रादुर्भाव झाला असल्यामुळे त्या शिवरात्रीला महाशिवरात्री म्हटले जाते आणि
'शिवरात्रिव्रतं नाम सर्वपापप्रणाशनम् । आचाण्डालामनुष्याणां भुक्तिमुक्तिप्रदायकम् ॥'
या वचनाप्रमाणे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, अस्पृश्य, स्त्रीपुरुष आणि बाल, तरुण, वृद्ध हे सारेही हे व्रत करू शकतात आणि बहुधा ते करतातही. हे व्रत न केल्याने दोष लागतो. राम, कृष्ण, वामन व नृसिंह यांच जयंति -दिवस, तसेच एकदशी हे सर्व दिवस उपवासाचे होत. त्याचप्रमाणे महाशिवरात्रीचा दिवस उपवासाचा असून त्याच्या व्रतकालादिकाचा निर्णयही इतर उपवासाच्या दिवसांसारखाच आहे. तशात प्रदोष कालास व मध्यरात्रिसमयास लिहिले आहे की; माघ व. चतुर्दशीला रात्रीच्या समयी भूत, प्रेत, पिशाच, शक्ती आणि स्वत: शिव भ्रमण करीत असतात. अतएव, अशा वेळी त्यांचे पूजन केल्याने मनुष्य पापमुक्त होतो. जर ही शिवरात्र त्रयोदशी, चतुर्दशी व अमावस्या या तिथींना स्पर्श करणारी असेल तर अधिक उत्तम, आणि आदित्य अथवा भौमवारचा योग (शिवयोग) तर त्याहून उत्तम. 'व्रतान्ते पारणम् ' 'तिथ्यन्ते पारणम्' आणि 'तिथिभान्ते च पारणम्' या वचनानुसार व्रताचे उद्यापन केले जाते. पण शिवरात्रीव्रताचे वैशिष्ट्य असे आहे की,
'तिथीनामेवसर्वासामुपवास व्रतादिषु । तिथ्यन्ते पारणं कुर्यात्विना शिवचतुर्दशिम् ॥'
याम्हणण्याप्रमाणे शिवरात्रिव्रताचे उद्यापन चतुर्दशीलाच केले पाहिजे आणि चतुर्दशी पूर्वविद्धा (प्रदोष निशीथोभयव्यापिनी ) असेल तरच हे शक्य होते. हे व्रत करणाराने माघ व. चतुर्दशीच्या दिवशी सकाळी संध्यादी विधी पार पाडून मस्तकी भस्माचा त्रिपुंड्र तिलक धारण करावा, गळ्यात रुद्राक्षाची माला धारण करावी. हातात उदक घेऊन
'शिवरात्रिव्रतं ह्येतत्करिष्येऽहं महाफलम् । निर्विघ्नमस्तु मे चात्र त्वत्प्रसादाज्जगत्पते ॥'
हा मंत्र म्हणून अर्घ्य सोडावे आणि संपूर्ण दिवस मौन पाळून शिवचिंतनात घालवावा. सायंकाळी पुन्हा स्नान करावे, शिवालयात जाऊन सोयीप्रमाणे पूर्वाभिमुख अथवा उत्तराभिमुख होऊन बसावे आणि तिलक व रुद्राक्ष धरण करून
ममाखिलपापक्षयपूर्वक सकलाभीष्टसिद्धये शिवपूजनं करिष्ये ।'
असा संकल्प करावा. तदनंतर ऋतुकालोद्भव गंधपुष्प,बिल्वपत्र, धोतर्याची फूले, घृतमिश्रित गुग्गुळाचा धूपदीप, नैवेद्य आणि नीरांजनादी आवश्यक साहित्य घेऊन रात्रीच्या पहिल्या प्रहरी 'पहिली पूजा', दुसर्या प्रहरी 'दुसरी पूजा' याप्रमाणे चार पूजाविधी पंचोपचार, षोडशोपचार अथवा राजोपचार जसे शक्य होतील तसे परंतु सर्व एकाच पद्धतीने पार पाडावे आणि त्याचबरोबर रुद्राचा पाठ म्हणावा. असे केल्याने एकाच वेळी पाठ, पूजा, जागरण, आणि उपवास या चारही गोष्टी साधतात. पूजेनंतर नीरांजन, मंत्रपुष्पांजली, अर्घ्यप्रदान आणि प्रदक्षिणा करावी. प्रत्येक पूजेच्या वेळी
'मयाकृतान्यनेकानि पापानि हर शंकर ।
शिवरात्रौ ददाम्यर्घ्यंमुमाकान्त गृहाण मे ॥'
असे म्हणून अर्घ्य सोडावे आणि
'संसारक्लेशदग्धस्य व्रतेमानेन शंकर । प्रसीद सुमुखो नाथ ज्ञानदृष्टिप्रदो भव ॥'
अशी प्रार्थना करावी. स्कंद पुराणात सांगितले आहे की, माघ व. चतुर्दशीला शिवाचे पूजन, जागरण आणि उपवास केल्याने मनुष्य मातेचे दुग्ध कधीही प्राशन करू शकत नाही, म्हणजे त्याला पुनर्जन्मापासून मुक्ती मिळते.
* रंटति चतुर्दशी
माघ व. चतुर्दशीला हे व्रत करतात. अरुणोदयाला स्नान करून यमाचे त्यांच्या चौदा नावांनी तर्पण करावे. रंटती नावांची एक वेदी असून तिला कालीचे एक रूप मानतात. बंगालमध्ये या दिवशी कालीची पूजा करतात. तिला रंटती पूजा असे म्हणतात.