मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीसंतएकनाथ गाथा|भाग दुसरा|
अभंग २००१ ते २०२०

आत्मस्थिति - अभंग २००१ ते २०२०

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीराम व श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.


२००१

सर्वस्व हरुनी म्हणसी बळीसी । म्यां बांधिलें विचारिसे कोण कोण ॥१॥

द्वारी द्वारपाळ झालासी अंकीत । सांग बुद्धिमंत ऐसा कोण ॥२॥

ऐसें नाथिलेंसी आपणा गोंविसी । एका जनार्दनीं बोल आम्हां कां ठेविसी ॥३॥

२००२

बळी आर्पिती देहासी । द्वारपाळ होसी तयासा ॥१॥

सांगा थोरपणा आहे कोण । घेतल्यावांचुन न देशी तूं ॥२॥

धर्म आधीं पूजा करीं । म्हणोनि घरीं राबसीं तूं ॥३॥

एका जनार्दनीं ऐसा उदार । घेतां निर्धार देशीं तूं ॥४॥

२००३

नलगे भुक्तिमुक्ति नलगे स्वर्गवास । नको वैकुंठावास देवराया ॥१॥

नलगे योगयाग अष्टांग साधन । न चुकें बंधन येणें कांहीं ॥२॥

नलगें इष्टमित्र सोईरें संबंधी । नको ही उपाधी पाठी लावूं ॥३॥

एका जनार्दनीं चुकवोनी पाल्हाळ । करी मज मोकळें गुरुराया ॥४॥

२००४

जय गोविंदा परमानंदा ऐक माझें बोल । निर्गुणरुपें असतां तुझें कांहींच नव्हें मोल ।

मग तुं माया रुप धरणी अती जाहलासी सबळ । नसतें देवपणा अंगी आणुनी चाळविसी केवळ ॥१॥

ऐस लाघवी तूं रामा । नको चाळवुं आह्मां ॥ध्रु०॥

नसतां तुज मज भेद देवा लटिकें जीवपण देसी । आपुले ठायीं थोरपण आणुनी आमुची सेवा घेसी ।

नसती अविद्या पाठीं लावुनी संसारी गोंविसे । नाना कर्मे केलीं म्हणोनी आम्हा कां दंडिसी ॥२॥

मातें भावें भजिजे ऐसा उपदेश करिसी । आपुल्या भक्तां तारीन म्हणोनी प्रतापें बोलसी ।

निंदक दुर्जन अभक्त त्यांतें नरकी तूं घालिसी । आपुल्या स्वार्थालागुनी दुसरीयातें कां पीडिसी ॥३॥

आपुली महिमा वाढो म्हणोनि आम्हां भक्त केलें । लक्ष चौर्‍यायंशी योनी देउनी संसारीं गोविंले ।

भावें तुंतें न भजों म्हणोनि आकस आरंभिलें । तुज मज वैर देवा ऐसें करितां नव्हे भलें ॥४॥

ऐसें तुज मज वैर म्हणोनि गुरुसी शरण गेलों । देवभक्तपण कोण्या कर्में मग पुसों लागलों ।

सदगुरु म्हणती सर्वही मायिक निश्चयें बोलिलों । देव आणि भक्त एकचि गोष्टिसी पावलों ॥५॥

मग गृरुकृपें करुन तुझें गिळीन देवपण । तुझिया नेणों भक्तावरी घालीन पाषाण ।

जीव शिव दोन्हीं मिळोनी मग मे सुखें राहीनक । तुज मज रुप ना रेखा त्यांतें निर्धारीन ॥६॥

ऐसें भक्तबोल ऐकुनी देवा थोर उपजली चिंता । विवेकबळें करुनि माझें देवपण उडवील आतां ।

यालागीं भिणें भक्तजनांसी ऐक्य करुनी तत्त्वतां । एका जनार्दनीं दरुशन द्यावें लागेल त्वरिता ॥७॥

२००५

संसारकूपीं हरि पडियेलों श्रीहरीं लाहुनी पैं शरीर । एका पिसें लागे कांहींएक न करवें पंचभूतिक विकार ।

सुष्ट दुष्ट कर्में करितां हे शिणलें मळमुत्र दोष जर्जर । ऐसिया जीवातें उद्धरसी म्हणोनी दोष जर्जर ।

ऐसिया जीवतें उद्धरसी म्हणोनी ब्रीद साजे रघुवीर ॥१॥

यालागीं रामचंद्रा रामचंद्रा हृदयींक धरिली नाममुद्रा ॥धृ०॥

आशा तृष्णा दोन्ही स्नेहाळ नागिणी कामक्रोध हे विकार । त्यांचिया संगति विषयवृद्धि जाली लहरी दुःख दरिद्र ।

इंगळाचे शेजे अंथुरितां वरी तिकडिया अरुवार । ऐसा हा संसार जाणोनी दुस्तर ठाकियेलें तुझें द्वार ॥२॥

कौळींके रुप कपटीं धरियेलें ते त्वा साचार केले । साभिमान्या देव गुरुचक्रवर्ती त्रिभुवनीं यश थोरलें ।

पांखीरु वाचिया लोभाकारणें गणिकेसी कैवल्य दिधलें । दंभ प्रपंच वोळगंता जीव तया तुं सायुज्य देती आपुलें ॥३॥

श्रीवत्स ब्राह्मणें झालासी पामरा आतां तुं तें पद मिरवीसी दातार । चरणस्पर्शे त्वां अहिल्या उद्धरिली विस्मयो थोर सुरनरां ।

जे गती देवकिये तैसीच पुतनें विश्राम एका वो वरा । तुझें मुद्रांकित न भीयें कळिकाळा तुं स्वामीं सारंगधरा ॥४॥

वनीं सिंहाचें भय दाखविलें जसा जे बैसविली गजस्कंधीं । परमपुरुषा तुझें नाम उच्चारितां वोळंगताती ऋद्धिसिद्धि ।

उपमन्या आरतें क्षिरसिंधु दिधली येवढी प्रसन्नबुद्धी । न गणितां रावणु शरणागतु केला लंका निरोपली आंधीं ॥५॥

नर सुर किन्नर पन्नग यक्ष त्रासियलें संसारें । जाणोनि शुकदेव गर्भी स्थिरावला भयाभीत बोले उत्तरें ।

जननीयेच्या कष्टा निष्कृती व्हावया उपदेश केला दातारें । जीवन्मुक्त शुक मुनिजनां वरिष्ठ जपतांची ध्यानीं दोन अक्षरें ॥६॥

ऐसा सहस्त्रमुखें वर्णितां नातुडसी गा देवा धांडोळितां सिद्ध पंथ । जगदबंधु दीनानाथ समुद्धरण द्रौपदीचा वेळाईत ।

सुदामियांच्या दों पोह्माकारणें स्नेहें पसरिसी हात । एका जनार्दनीं जवळीं बोलउनी उच्छिष्ट प्रसाद देत ॥७॥

२००६

पायांवरी ठेवितां भाळ । गेली तळमळ सकळही ॥१॥

बैसलें रुप डोळां आधीं । गेली उपाधी सकळ ॥२॥

एका जनार्दनीं मंगल जाला । अवघा भरला हृदयीं ॥३॥

२००७

गोजिरें ठाण विठोबांचे । आवडी साचें बैसली ॥१॥

आणखी न धावें कोठें मन । समचरण पाहातांचि ॥२॥

नाहीं आन दुजी वासना । आवडी चरआणा बैसलासे ॥३॥

एका जनार्दनीं मन । सांडिन कुर्वंडी करुन ॥४॥

२००८

आलिंगनालागीं उतावेळ मन । देखेन चरण विठोबाचे ॥१॥

मना समाधान मना समाधान । मना समाधान राहें मना ॥२॥

देखिलिया मूर्ति सांवळी सगुण । मन नाहीं बंधन मना तुज ॥३॥

एका जनार्दनीं मन आवारिलें । दृढ तें ठेविलें विठ्ठलपायीं ॥४॥

२००९

पायीं जडलें माझे मन । चित्त जालें समाधान ॥१॥

तुमच्या नामाचा महिमा । आजी पावन केलें आम्हां ॥२॥

कृपा केली तुम्हीं । लावियेलें आपुलें नामीं ॥३॥

एका जनार्दनीं पूर्ण कृपा । तेणें मार्ग जाला सोपा ॥४॥

२०१०

कुर्वडींन काया मन । समचरण देखोनियां ॥१॥

ऐसा वेधी वेधक कान्हा । विटु मना बैसलासे ॥२॥

नावडे कांहीं दुजें चित्तीं । श्रीविठ्ठलमुर्ति पाहतांचि ॥३॥

एका जनार्दनीं ध्यान । सुकुमार गोजिरें ठाण ॥४॥

२०११

वेधोनि नेलें आमुचें मन । लागलें ध्यान अंतरीं ॥१॥

दृष्टी धांवें पाहावया । आलिंगना बाह्मा उतावेळ ॥२॥

चरण उतावेळ चालतां पंथ । दुजा हेत नाहीं मनासी ॥३॥

एका जनार्दनीं डोई पायीं । दुजा भाव नाहीं इंद्रियां ॥४॥

२०१२

येणें पांडुरंग लावियेला चाळा । बैसलासे डोळां निवडेना ॥१॥

मनाचियें मनें घातिलेंसे ठाण । नोहे उत्थानपन कोणीकडे ॥२॥

वेधकु वेधकु पंढरीचा राणा । एका जनार्दना शरण होय ॥३॥

२०१३

देवासी कांहीं नेसणें नसे । जेथें तेथें देव उघडांची दिसे ॥१॥

देव निलाजरा देव निलाजरा । देव निलाजरा पाहा तुम्हीं ॥२॥

न लाजे तेथें नाहीं गांव । पांढरा डुकर झाला देव ॥३॥

एका जनार्दनीं एकल्या काज । भक्ति तेणेंचि नेली लाज ॥४॥

२०१४

हरीचें पाहतां श्रीमुख । सुखावलें मन नित्य नवा हर्ष ॥१॥

परमाप्रिय वो श्रीहरी । ध्याता ध्यान ध्येय सर्व हरि ॥२॥

एका जनार्दनीं पाहतां हरी । हरिरुप दिसे चराचरी ॥३॥

२०१५

राजीवाक्ष प्रभु रुक्मिणीरण । मनोहर ध्यान श्रीकृष्णाचें ॥१॥

शंख चक्रगदा पीतांबरधारी । नमिला कंसारी प्रेमभावें ॥२॥

मोक्ष अधिष्ठान पुण्य कीर्ति स्थान । पतितपावन पाडुरंग ॥३॥

जनार्दनीं देवाधिदेव । चित्तीं वासुदेव राहो सदा ॥४॥

२०१६

आनंद अद्वय नित्य निरामय । सावळा भासताहे मजलागीं ॥१॥

वेधु तयाचा माझिया जीवा । काया वाचा मनोभावा लागलासे ॥२॥

वेधलें मन झालें उन्मन । देखतां चरण गोड वाटे ॥३॥

पाहतां पावतां पारुषला जीव । एका जनार्दनीं देव कळों आला ॥४॥

२०१७

अष्टधातुवेगळा देखिला पुतळा । जिवींचा जिव्हाळा श्रीविठ्ठल ॥१॥

तयाचे चरणीं माझा दंडवत । घडो आणि चित्त जडो नामीं ॥२॥

एका जनार्दनीं देखिला डोळां । जावीं जीवनकळा विठ्ठल देवो ॥३॥

२०१८

सर्वसुखाची उघडली खाणी । श्रीमुख नयनीं पाहतां ॥१॥

मोक्षसुख आम्हां न लगे गा देवा । विश्रांतीसी ठेवा आणिकासी ॥२॥

धनसुख मज कासया हें पोटीं । पाहिजे लंगोटी सर्वभावें ॥३॥

स्त्रीसुख संसार कासया वेरझार । नको हा पसर मज देवा ॥४॥

एका जनार्दनीं नाशिवंत सुख । पाहतां तुझें मुख इच्छा पुरती ॥५॥

२०१९

नाम घेतां रुप आठवलें सांवळें । हीं खुण गोपाळें दिली मज ॥१॥

येणें जन्में कृष्ण दाटोनी टाकणें । आडवस्ती पेणें चुकविली ॥२॥

चुकविली वस्ती एका जनार्दनीं । संसार सांडणें सांडोनियां ॥३॥

२०२०

तुमचें नामसंकीर्तन । हेंचि माझें संध्यास्नान ॥१॥

तुमच्या पायाचें वंदन । हेंचि माझें अनुष्ठान ॥२॥

तुमच्या पायाचा साक्षेप । हाचि माझा कालक्षेप ॥३॥

तुमच्या प्रेमें आली निद्रा । हीच माझी ध्यान मुद्रा ॥४॥

एका जनार्दनीं सार । ब्रह्मारुप हा संसार ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP