२०८१
सदा सुरवर सुख तें इच्छिती । ऐसा लक्ष्मीपती कां रें न भजा ॥१॥
सोइरा धाइरा आन दुजा नाहीं । गुरु पिता पाहीं हाचि बंधु ॥२॥
सज्जन सांगती आन नाहीं आम्हां । एका जनार्दनीं प्रेमा वसें देहीं ॥३॥
२०८२
एक मागें एक पुढें । उभें रोकडें असती ॥१॥
चला जाऊं तया ठाया । पाहुं सखया आवडी ॥२॥
एक एकाचें करुनि मीस । रहिवासले सावकाश ॥३॥
बहु युगें जाहलीं पाहतां । खालीं न बैसती उभयतां ॥४॥
आनंदीं आनंद मना होय । एका जनार्दनीं पाहुनीं धाय ॥५॥
२०८३
योगी ध्याती जया चिंतिती मानसी । तो हृषीकेशी पंढरीये ॥१॥
जाऊं लवलाहे पाहूं पैं चरण । क्षेमालिंगन देऊं सुखें ॥२॥
एका जनार्दनीं पाहतां रुपडें । ब्रह्मा फाडोवाडें विटेवरी ॥३॥
२०८४
नीळवर्ण घनःश्याम । अत्माराम विटेवरी ॥१॥
चला जाऊं तया गांवा । उगवुं गोवां तांतडीं ॥२॥
भेटलिया मनोरथ । पुरती अर्थ मनाचें ॥३॥
साधे साधन फुकटचे । एका जनार्दनीं भाक साची ॥४॥
२०८५
पहा पहा विठ्ठलमुख । हरे जन्ममरण दुःख ॥१॥
पहातां राउळाची ध्वजा । पुर्वज उद्धरती सहजा ॥२॥
कळस देखतां नयनीं । होय पातकांची धुणी ॥३॥
चंद्रभागा करितां स्नान । कोटी तीर्थाचें मार्जन ॥४॥
पुंडलिका घेती भेटी । तयां वास तो वैकुंठी ॥५॥
एका जनार्दनीं प्रदक्षिणा । पार नाहीं त्यांच्या पुण्या ॥६॥
२०८६
भक्त देव एके ठायीं ते आवडी । घेऊनिया गुढी जाऊं तेथें ॥१॥
पाहूं चरनकमळ वोवाळूं श्रीमुख । होईल तेणें सुख चौदेहांसी ॥२॥
संतांचे ते भार गाती नाचताती । आनंदे डुल्लती विठ्ठल वाचे ॥३॥
एका जनार्दनीं आनंदसोहळा । पाहोनि धालों डोळा डोळीयाचा ॥४॥
२०८७
योगयाग तप जयासाठीं करणें । तें उभे कोणें पंढरीसी ॥१॥
काउलाची पेठ पंढरीचा हाट । मिळाले घनदाट वानकरी ॥२॥
पताकांचे भार गर्जती हरिदास । होऊनी उदास सर्वभावें ॥३॥
एका जनार्दनीं नाहीं कामक्रोध । अवघा गोविंद हृदयीं त्यांचें ॥४॥
२०८८
पुढें गेले हरीचे दास । त्यांची आस आम्हांसी ॥१॥
त्याची मार्गीं आम्हीं जाऊं । वाचे गाऊं विठ्ठला ॥२॥
संसाराचा न करुं धंदा । हरुषें सदा नाम गाऊं ॥३॥
एका जनार्दनीं डोळे । पहाती पाउलें कोंवळें ॥४॥
२०८९
योग्याचे ध्यान बैसलेंसे मौन । तो हा निधान विटेवरी ॥१॥
विठ्ठल सांवळा पाहुं चला डोळां । धरुनी बाळलीला कटीं कर ॥२॥
संतांचा समुदाव आरत्यांची दाटी । नामघोष सृष्टी न समाय ॥३॥
आषाढी कार्तिक आनंद सोहळा । येती नरनारी बाळा पाहवया ॥४॥
एका जनार्दनीं पुरला मनोरथ । विठ्ठल पाहतां चित्त गुंतलेसे ॥५॥
२०९०
न लगें काहीं यासी मोल । वेंचितां बोल फुकाचै ॥१॥
विठ्ठल विठ्ठल वदा वाचे । नोहे आणिकांचें कारण ॥२॥
नाचा प्रेमें वाळूवंटी । घाला मिठी संतांची ॥३॥
एका जनार्दनीं उभा । विठ्ठ्ल शोभा अनुपम्य ॥४॥
२०९१
अवघे रंगलें रंगी । अवघे त्या पांडुरंगीं ॥१॥
अवघा दुजा भाव नाहीं । अवघे विठ्ठलची पाही ॥२॥
अवघे आनंदें नाचती । अवघे रंगीं त्या गाती ॥३॥
अवघे भळे भोळे । अवघे प्रेमाचे आगळे ॥४॥
अवघा जनार्दन । एका जनार्दनीं भजन ॥५॥
२०९२
नाचेन आनंदें विठ्ठलनाम छंदें । परते भेदाभेद सांडोनियां ॥१॥
जाईन पंढरीं नाचेन महाद्वारी । वाचे हरि हरि रामकृष्ण ॥२॥
साधन आणीक नेणें मी सर्वथा । एका पंढरीनाथावांचुनी कांहीं ॥३॥
एका जनार्दनीं दृढ हा निश्चय । मुखीं नाम गाय सदोदित ॥४॥
२०९३
प्रेमळ प्रेमळ अंतरीं प्रेमळ । नाहीं काळ वेळ तयालागीं ॥१॥
प्रेमभावें गाय विठ्ठलाचि ध्याय । मग सुखा उणें काय संसारीया ॥२॥
जनार्दनाचा एक रंगला चरणीं । निजरंगीं रंगोनि मिळोनि गेला ॥३॥
२०९४
त्रिभुवनापरती पंढरीये पेठ । उभा तो वैकुंठ विटेवरी ॥१॥
पहा चला जाऊं पंढरीये । नवस पुरती सये अंतरीचे ॥२॥
उभा विटेवरी घेऊनी बुंथी । शंख चक्र गदा पद्म हातीं शोभती ॥३॥
राहीं रुक्मिणी उभ्या दोही दोबाही । चामरें मयुरपिच्छ ढाळिती ठायीं ॥४॥
एका जनार्दनीं पहातां रुप । पाहतां पाहतां जालें मन तद्रूप ॥५॥
२०९५
परलोकींचा सखाक उभा विटेवरी । भक्त साहाकारी पांडुरंग ॥१॥
चंद्रभागे तटी शोभे वाळूवंटीं । देखिलासे दृष्टी पांडुरंग ॥२॥
एका जनार्दनीं भेटतां तयासी । ऋद्धिसिद्धि दासी होती मग ॥३॥
२०९६
गोमटेंक नागर कटीं धरुनि कर । उभा तों सुकुमार वैकुंठींचा ॥१॥
रूपाचें रूपस पाहतां सावकाश । धणीं धाय मनास तया पाहतां ॥२॥
नाठवे कल्पना मनाचिया मना । बुद्धि ते चरणा विनटली ॥३॥
एका जनार्दनीं इंद्रियांची चाली । सर्व हारपली पंढरी पाहतां ॥४॥
२०९७
उपवास पारणें न लागे समाधी । वायांचि उपाधि कोण धरी ॥१॥
आम्हां विष्णुदासा कळलेंसे वर्म । मुखीं गावें नाम हातीं टाळीं ॥२॥
आनंदें बागडे जाती पंढरीसी । पहाती विठोबासी दृष्टीभरी ॥३॥
एका जनार्दनीं मनाचें उन्मन । एका दरुशनें मुक्तिपद ॥४॥
२०९८
देव विसरला देवपणासी । देखोनी भक्तांसी भुलला ॥१॥
नावडेचि वैकुंठ धाम । तो निष्काम कीर्तनीं नाचतो ॥२॥
नावडे शेषशायी आसन । उभा जघन धरुनी विटे ॥३॥
ऐसा प्रेमाचा भुकेला । एका जनार्दनीं धाला ॥४॥
२०९९
जघन प्रमाण दावीत श्रीअनंत । या रे या रे म्हणत भेटावया ॥१॥
आवडीची धणी ध्या रे प्रेमभावें । संतचरणां द्यावें आलिंगन ॥२॥
कट धरूनि करीं समचि पाउलीं । उभा वनमाळी भक्तांसाठीं ॥३॥
जीवींचें जीवन मनाचें मोहन । सगुण हें ध्यान भक्तिकाजा ॥४॥
रूपाचें रूपस निर्गुणावेगळें । पहतां तो संतमेळे उभा असे ॥५॥
विटे नीट उभा आनदाचा कंद । पाहतां परमानंद सुख वाटे ॥६॥
एका जनार्दनीं भक्ताचिया काजा । उभारूनि भुजा वाट पाहे ॥७॥
२१००
नेणतियासी नेणता तो सान । जाणतिया जाणपण धरुनी ठेला ॥१॥
योगियांचे मांदुस सज्जानाचें स्थळ । श्रम तो केवळ पाहतां जाय ॥२॥
जाणते नेणते येती बरवे परी । दरुशनें उद्धरी जड जीव ॥३॥
एका जनार्दनीं सगुण निर्गुण । जाणतां नेणतां सर्व आपणाचि जाण ॥४॥