श्री गणेशाय नमः ॥
अद्भुत रामकथेचा महिमा ॥ देऊं गोदावरीची उपमा ॥ स्नान करितां कर्मा अकर्मा ॥ पासोनि मुक्त होइजे ॥१॥
उभयलोकीं इच्छा अधिक ॥ हींचि तटाकें सुरेख ॥ मनोरम प्रवाह देख ॥ उचंबळेल ब्रह्मानंदें ॥२॥
रामकथामृतजीवन ॥ प्रेमळ तेथें जळचरें पूर्ण ॥ देव गंधर्व मुनिजन ॥ तटीं सघन तरु हेचि ॥३॥
अनेक चरित्रें तत्वतां ॥ त्याचि येथें मिळाल्या सरिता ॥ भक्ति ज्ञान वैराग्य पाहतां ॥ ऊर्मी येथें विलसती ॥४॥
ओघ चालिला अद्भुत ॥ फोडोनियां पापपर्वत ॥ सप्तकांड सप्तमुखें मिळत ॥ भक्तहृदयसागरीं ॥५॥
जे त्रिविधतापें तापले ॥ जे तीर्थव्रतें करितां भागले ॥ ते येथें स्नान करितां निवाले ॥ नाहीं परतले संसारा ॥६॥
या गंगेत करिता स्नान ॥ अंगीं संचरे भक्तिज्ञान ॥ सकळ चातुर्ये एकवटोन ॥ पायां लागती अपार ॥७॥
सुंदरकांड इंद्रभुवन ॥ प्रेमरस तो सहस्रनयन ॥ वाग्देवी हे रंभा पूर्ण ॥ नृत्य करी कुशलत्वें ॥८॥
अंतरीं उघडोनि श्रवण ॥ श्रवण करोत पंडितजन ॥ सप्तकांडोत्तर संपूर्ण ॥ सुंदरकांड रसभरित ॥९॥
अठरावे अध्यायीं कथा अद्भुत ॥ समुद्रतीरीं उभा हनुमंत ॥ लंकेसी जावया उद्युक्त ॥ वानर समस्त पाहती ॥१०॥
लोकप्राणेशसुत ते वेळां ॥ महेंद्राचळीं उभा ठाकला ॥ परम भुभुःकारें गर्जिन्नला ॥ तेणें डळमळिला भूगोल ॥११॥
सुटला जातां अंगवात ॥ म्हणोनि वानर भयभीत ॥ पोटासीं धरोनि पर्वत ॥ अगोदर बैसले ॥१२॥
यशस्वी रघुवीर म्हणोन ॥ समीरात्मजें केलें उड्डाण ॥ त्याचे अंगवातेंकरून ॥ प्रळय वर्तला सर्वांसी ॥१३॥
महातरुवर उन्मळोनि ॥ द्विजांऐसे फिरती गगनीं ॥ अचळ चळती ठायींहूनि ॥ भुभुःकारध्वनीसरसेचि ॥१४॥
नक्षत्रें रिचवती भूमंडळी ॥ बैसली मेघांची दांतखिळी ॥ कृतांतासंही ते वेळीं ॥ भय अत्यंत वाटलें ॥१५॥
उचंबळलें समुद्रजळ ॥ डळमळलें उर्वीमंडळ ॥ हेलावती सप्तपाताळ ॥ अंगवातेंकरूनियां ॥१६॥
भोगींद्र दचकला अंतरीं ॥ कूर्म निजपृष्ठी सांवरी ॥ यज्ञवराह धरित्री ॥ उचलोनि देत दाढेसी ॥१७॥
दिग्गज चळचळां कांपती ॥ मेरुमांदार डळमळिती ॥ सुधापानी परम चित्तीं ॥ भय पावले तेधवां ॥१८॥
शचीवर मनीं दचकला ॥ अपर्णा पडे शिवाचे गळां ॥ भयभीत जाहली कमळा ॥ विष्णु तीतें सांवरी ॥१९॥
विरिंचि सांगे सकळांप्रती ॥ सीताशुद्धीस जातो मारुती ॥ सुर विमानी बैसोनि येती ॥ अद्भुत कौतुक पहावया ॥२०॥
कौतुक विलोकिती सुर सकळ ॥ प्रतापरुद्र अंजनीबाळ ॥ कीं तो वासरमणि निर्मळ ॥ वानरवेषें जातसे ॥२१॥
कल्पांविजूचे उमाळे भडकती ॥ तैशी कुंडलें कर्णीं तळपती ॥ वज्रकौपीन निश्र्चितीं ॥ कटिप्रदेशीं मुंजी झळके ॥२२॥
त्रिगुणरूप कल्पांतचपळा ॥ तेवीं यज्ञोपवीत रुळे गळां ॥ उणें आणिलें दिव्य प्रवाळा ॥ मुखीं पृच्छाग्नीं रंगा तैसा ॥२३॥
अंगींच्या रोमावळी पिंजारत ॥ भुभुःकारें नभ गर्जत ॥ दिग्गजांची टोळीं बैसत ॥ आंदोळत ब्रह्मांड ॥२४॥
गाजवी पुच्छाचा फडत्कार ॥ प्रतिशब्द देत अंबर ॥ दणाणित लंकानगर ॥ दशवदन हडबडला ॥२५॥
चपळ पदद्वय आणि पाणी ॥ झेंपावत धांवे गगनीं ॥ उड्डाणावरी उड्डाण घेऊनि ॥ रुद्रावतार जातसे ॥२६॥
अंतरिक्षीं जाय सपक्ष पर्वत ॥ कीं क्षीराब्धीशायीप्रति द्विजेंद्र धांवत ॥ कीं मानस लक्षोनियां जात ॥ राजहंस ज्यापरी ॥२७॥
कीं चिंतामणिवारु सवेग ॥ चपळत्वें क्रमी नभमार्ग ॥ अंजनीहृदयारविंदभृंग ॥ जात चपळ तैसाचि ॥२८॥
पितयाचें बहुत गमन । तयाहूनि सवेग कपीचें उड्डाण ॥ किंवा रघुनाथाचा बाण ॥ चापापासून सुटला ॥२९॥
कीं मनाचें चंचळपण ॥ पावे जैसें चिंतिलें स्थान ॥ तैसा लोकप्राणेशनंदन ॥ यमदिशा लक्षोनि जातसे ॥३०॥
ऐसा अंतरिक्ष जातां हनुमंत ॥ आश्र्चर्य करिती देव समस्त ॥ म्हणती पाहों याचें सामर्थ्य ॥ रंभा त्वरित पाठविली ॥३१॥
साधितां परमार्थज्ञान ॥ आडवें येत मायाविघ्न ॥ कीं साधूं जातां निधान ॥ विवशी येत आडवी ॥३२॥
तैशी रंभा देवीं धाडली ॥ मुख पसरोनि उभी ठाकली ॥ तिच्या वदनांत उडी पडली ॥ हनुमंताची अकस्मात ॥३३॥
तिच्या कर्णद्वारें मारुति ॥ सवेंचि निघाला त्वरितगती ॥ तिणें हनुमंत स्तविला प्रीतीं ॥ स्वर्गाप्रति गेली मग ॥३४॥
समुद्रें पाठविला पर्वत ॥ मैनाकनामें अद्भुत ॥ तो ऊर्ध्वपंथें आडवा येत ॥ हनुमंतासी ते काळीं ॥३५॥
जों जों वाढे पर्वत ॥ तों तों उंच जाय हनुमंत ॥ मग तो अचळ प्रार्थित ॥ हनुमंतासी ते काळीं ॥३६॥
म्हणे महापुरुषा मजवरी ॥ विश्रांति घेईं क्षणभरी ॥ मग एकाच हस्तें भारी ॥ नग पाताळीं घातला ॥३७॥
जो शांतिसुखें डोलत ॥ त्यास देखोन क्रोध पळत ॥ तैसा हस्तभारें पर्वत ॥ सागरांत दडपिला ॥३८॥
तेथोन उड्डाण पुढें चालिलें ॥ तों सिंहिकेनें वदन पसरिलें ॥ छायासूत्र साधिलें ॥ कापट्य केलें अद्भुत ॥३९॥
राहूकेतूंची जे माता ॥ तेचि सिंहिका जाण तत्वतां ॥ ती ग्रासावया हनुमंता ॥ पूर्वींच तेथें जपत होती ॥४०॥
उताणी समुद्रांत निजोन ॥ बारा योजनें पसरिलें वदन ॥ छाया पडतांचि वायुनंदन ॥ तिच्या वदनांत कोसळला ॥४१॥
स्वर्गीचा हुडा अकस्मात ॥ उर्वीवरी जेवीं पडत ॥ सिंहिकेच्या वदनी हनुमंत ॥ पडिला सत्य त्यापरी ॥४२॥
ते दांतांसि दांत मेळवित ॥ तों उदरांत गेला हनुमंत ॥ पोट फाडून त्वरित ॥ आला बाहेर ते काळीं ॥४३॥
विषयपाश तोडोनि समस्त ॥ परमार्था निघे जेवीं विरक्त ॥ तैसा बाहेर आला हनुमंत ॥ सिंहिका तेथेंच निमाली ॥४४॥
पुढें चालिलें उड्डाण ॥ तों लंकादेवी आली धांवोन ॥ तिनं आडवा पाय घालून ॥ हनुमंतासी पाडिलें ॥४५॥
करितां श्रीरामभजन ॥ नसतीं विघ्नें येति धांवोन ॥ परी साधक तितकीं लोटून ॥ सावधान स्मरण करी ॥४६॥
असो लंकादेवीस मुष्टिप्रहार ॥ वज्रप्राय देत वायुकुमर ॥ तिणें स्तवन केलें अपार ॥ म्हणे मज न मारावें ॥४७॥
तूं विजयी होशील साचार ॥ तंव पुढें उडी जात अपार ॥ पडलंकेसी सत्वर ॥ उडी जावोन पडियेली ॥४८॥
उडी सरसी त वेळीं ॥ पडलंका ते दणाणिली ॥ क्रौंचा असे तये स्थळीं ॥ कनिष्ठ भगिनी रावणाची ॥४९॥
तिचा घर्घरनामें भ्रतार ॥ इंद्रें मारिला तो असुर ॥ यालागीं क्रौंचेसी दशकंधर ॥ पडलंकेसी स्थापित ॥५०॥