अध्याय एकोणीसावा - श्लोक १०१ ते १५०

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.


असो वानररूप पालटोनी ॥ अणुप्रमाण वेष धरूनि ॥ न खुपे मुंगीचे नयनीं ॥ घरोघरीं हिंडतसे ॥१॥

जैसा जनीं असोनि जनार्दन ॥ जीवासि नव्हे दृश्यमान ॥ तैसा निरालोद्भवनंदन ॥ व्यक्त न दिसे कोणासी ॥२॥

घरोघरीं चर्या पहात ॥ तों अवघे देखिले अधर्मरत ॥ वरिवरि आचार दावित ॥ जैसा मैंद शांति धरी ॥३॥

घरोघरीं अग्निहोत्रें पूर्ण ॥ मुखीं सदा वेदाध्ययन ॥ परी दृष्टी देखतां गोब्राह्मण ॥ मुखीं घालोनि रगडिती ॥४॥

जारकर्मरत नारीनर ॥ रुद्राक्षमाळा घेऊन थोर ॥ जपती सदा कौटिल्यमंत्र ॥ जारण मारण मोहनादि ॥५॥

लटिकेचि डोळे झांकून ॥ दाविती शांति अवलंबून ॥ मांस रक्त मद्यपान ॥ घूर्णितनयन डुल्लती ॥६॥

हृदयीं मद मत्सर दुमदुमिती ॥ वाचाबळें जनांसी गोंविती ॥ आम्ही कर्मातीत जाहलों म्हणती ॥ सदाचारभ्रष्ट क्रिया ॥७॥

आम्ही ज्ञानी सदा मुक्त ॥ झालों लोककर्मविरहित ॥ मना आवडे तो भाग भोगित ॥ महा उन्मत्त विषयांध ॥८॥

व्यर्थ राक्षसांचा आचार ॥ जैसें स्नान करून आले कुंजर ॥ कीं भस्मांत लोळती खर ॥ त्यांसी योगीश्र्वर कोण म्हणे ॥९॥

एक राक्षस संन्यास घेऊन ॥ करिती गोमांसभक्षण ॥ सवेंच संपादोनी आचमन ॥ कर्ता कोण म्हणती पैं ॥११०॥

विरजाहोम करून ॥ तीळ तूप गेलें जळोन ॥ कामक्रोधादि साहीजण ॥ अधिकाधिक माजले ॥११॥

नाना जीवाजाती भक्षोनी ॥ म्हणती आम्हांतें शिवूं नका कोणी ॥ एक गोचर्म पांघरोनी ॥ जटाधारी बैसला ॥१२॥

वनांत हिंडती वानप्रस्थ ॥ गोहननालागीं बैसती गुप्त ॥ ब्राह्मणांसी मारून भक्षित ॥ कर्ता येथें कोण म्हणती ॥१३॥

आम्ही ब्रह्मचारी विरक्त ॥ म्हणोन इंद्रियें ठेविलीं मुक्त ॥ गृहस्थ पडले गृहागतींत । पापें अमित जोडिती ॥१४॥

क्षत्रिय अधर्म तेथें सर्व वसती ॥ समरीं पाठी देऊन पळती ॥ वाढिवेच्या गोष्टी बोलती ॥ घाय घालिती अधर्मे ॥१५॥

वैश्यांचें अधर्मी चित्त ॥ जोखोन दुसऱ्यासी नाडित ॥ शुद्ध धर्मवाट पाडित ॥ विप्रसेवा सांडोनियां ॥१६॥

वाण्यांनी उदीम तळासी आणिला ॥ सर्वत्रांचा गुंडाळा केला ॥ सोनारीं वरकोल घातला ॥ सर्व जिरविले अलंकार ॥१७॥

सोनार ठकठक करिती ॥ तेथें नाहीं सीता सती ॥ नाळी झांकणी कांसार विकती ॥ चिच्छक्ती तेथें कैंची ॥१८॥

व्यवहारें कालांतरीं प्राप्ति ॥ लक्षूनि परहस्तीं समर्पिती ॥ खत हातीं लिहून घेती ॥ पाहोन रडती जन्मवरी ॥१९॥

तेली भोंवे घाण्याभोंवता ॥ तेथें कैची सती सीता ॥ साळी कोष्टी पांजणी करितां ॥ जन्म वृथा पैं गेला ॥१२०॥

गारींत निघाले जीवें जीत ॥ तांबोळी शायशीं पंचायशीं ॥ करित ॥ शिंपी अखंड ते खंडित ॥ सीता निश्र्चित तेथें कैंची ॥२१॥

रंगारी जें वस्त्र श्र्वेत ॥ तें काळें करिती निश्र्चित ॥ नसतेचि ठसे लावित ॥ शुद्धावरी मूर्ख पैं ॥२२॥

भुसाऱ्यांनीं धान्यसंग्रह केला ॥ मोजितां व्यर्थ जन्म गेला ॥ तेथें नाहीं जनकबाळा ॥ ते चित्कळा अवतरली ॥२३॥

वेद पढती वेदपाठक ॥ तेथें निष्ठा न धरिती अभाविक ॥ प्रतिग्रहाखालीं जन्म देख ॥ गेला निश्र्चित तयांचा ॥२४॥

इदं भवति इदं न भवति ॥ पंडित हेंचि खटपटती ॥ सदा परनिंदा जल्पती ॥ सीता सती तेथें कैंची ॥२५॥

ताठले सदा गायक ॥ अभिमानानें हुंबती अधिक ॥ प्रेम सांडोनि गाती श़ृंगारिक ॥ सीता सती तेथें कैंची ॥२६॥

ज्यातिषी गोंविले ग्रहगतीं ॥ गृहांत पडिले ते न निघती ॥ आपण कोण हे नेणती ॥ सीता सती तेथें कैंची ॥२७॥

प्रहस्तादि प्रधान घरें ॥ शोधिलीं सर्व अंतःपुरें ॥ पद्मिणीसम स्वरूपें सुंदरें ॥ पदनखा भृंग रुणझुणती ॥२८॥

हनुमंत नाना तर्क करी ॥ कोठें नुमगे जनककुमरी ॥ म्हणे योगगतीनें निर्धारीं ॥ प्राण दिधला जानकीनें ॥२९॥

कीं सरितापतिमाजीं बुडाली ॥ कीं रावणें सक्रोधें भक्षिली ॥ अंतररिक्षांहून खालीं पडली ॥ गेली चूर होऊनियां ॥१३०॥

कीं रावणें दृढ धरिली ॥ कळ लागोन सुकुमार मेली ॥ कीं रावणपत्न्यांनीं मारिली ॥ सवतीमत्सर करोनियां ॥३१॥

हनुमंत दुःखें गडबडां लोळे ॥ आंसुवें पूर्ण भरले डोळे ॥ म्हणे वृथा समुद्रलंघन केलें ॥ शून्य पडिलें सर्व कार्य ॥३२॥

अहा सीते सीते करून ॥ वृथा आलिंगी राजीवनयन ॥ सीतेचें रूप म्हणोन ॥ हृदयीं पाषाण धरीतसे ॥३३॥

मी गेलिया रघुनाथ ॥ प्राण त्यागील यथार्थ ॥ सुग्रीव नळ नीळ जांबुवंत ॥ सुमित्रासुत न वांचती ॥३४॥

जाईल अयोध्येसी समाचार ॥ भक्त शिरोमणी भरत वीर ॥ शत्रुघ्न आणि माता समग्र ॥ प्राण देतील निर्धारें ॥३५॥

वृथा कष्ट गेले मुळींहूनि ॥ ठायी न पडे जनकनंदिनी ॥ नवजाय मी परतोनि ॥ चापपाणी वाट पाहील ॥३६॥

करितां रघुपतीचें स्मरण ॥ विघ्नें पळती मुळींहून ॥ जैसा सुटतां अद्भुत प्रभंजन ॥ जलदजाळ क्षणीं वितळे ॥३७॥

पडतां किंचित अग्न ॥ तृण पर्वतींचें जाय जळोन ॥ कीं गृहस्वामी जागा देखोन ॥ तस्कर जेवीं पळती पैं ॥३८॥

कीं उगवतां दिनपति ॥ भगणें सर्व लोपती ॥ मृगेंद्र देखितां निश्र्चितीं ॥ अचेतन होती वारण ॥३९॥

तैसें रघुपतीचें करितां स्मरण ॥ विघ्नें सर्व पळती उठोन ॥ करोनि लंकेचें कंदन ॥ पालथी घालीन सागरीं ॥१४०॥

ऐसें बोलोन हनुमंत ॥ कलह माजविला लंकेत ॥ घरोघरीं लोकांत आकांत ॥ ओढविला वायुसुतें ॥४१॥

रत्नजडित गोपुरें देखा । विद्युत्प्राय झळकती पताका ॥ कनक कळसां नाहीं संख्या ॥ दिव्य लंका नगर तें ॥४२॥

अंजनीसुत मत्त वारण ॥ पुच्छ हें वज्रशुंडा जाण ॥ सकळ गापुरें ओढून ॥ अकस्मात पाडित ॥४३॥

मध्यरात्र जाहली पूर्ण ॥ निद्रार्णवीं लोक निमग्न ॥ तों अकस्मात घरें कोसळून ॥ पडोनि जन दडपती ॥४४॥

जैसे पर्वताचे कडे खचती ॥ तैशीं गोपुरें खालीं पडती ॥ महाद्वारें ओढून मारुति ॥ झुगारित गगनपंथें ॥४५॥

गवाक्षद्वारें पुच्छ घालून ॥ गृहस्तंभ पाडी आकर्षून ॥ लत्ताप्रहारें करून ॥ कपाटें फोडोन टाकित ॥४६॥

नगरतळ दणाणत ॥ भयंकर घोषें किंकाटत ॥ वृक्ष उन्मळी अकस्मात ॥ भयभीत लोक जाहले ॥४७॥

एकचि नगरीं कोल्हाळ झाला ॥ एक म्हणती पळा रे पळा ॥ ऐसें बोलतां अकस्मात शिळा ॥ येऊन पडती मस्तकीं ॥४८॥

राक्षसिणींची बाळें धरुनि ॥ भिरकावून देत गगनीं ॥ राक्षसी वक्षःस्थळें बडवूनि हांका फोडिती आक्रोशें ॥४९॥

स्त्रीपुरुष दोघें नग्न ॥ एकांतीं केलें शयन ॥ तीं जागीं न होतां उचलून ॥ बिदीस शेज ठेवित ॥१५०॥

N/A

References : N/A
Last Updated : April 09, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP