भांडारगृह फोडून ॥ नाना वस्तूंच्या मांदुसा आणून ॥ राजबिदीस टाकी पूर्ण ॥ एकेच ठायीं सर्वांच्या ॥५१॥
पुच्छाचे चपेटे थोर ॥ रात्रीं वाजवी वारंवार ॥ भयभीत जाहले अवघे असुर ॥ बोलों उत्तर न शकती ॥५२॥
ऐसें नगर गांजोनि पूर्ण ॥ मग राजद्वारावरी जाऊन ॥ बैसला अंजनीनंदन ॥ कलह पूर्ण माजवावया ॥५३॥
हृदयीं पुच्छ धरोनि हनुमंत ॥ वारंवार तया चुंबित ॥ डोळे मोडोन वांकुल्या दावित ॥ घुलकावीत मान पैं ॥५४॥
तों नरनारी असंख्यात ॥ कलश घेऊन उदक आणित ॥ पुच्छ गोंवून अकस्मात ॥ कपी फोडितो एकदांचि ॥५५॥
नारी दचकल्या समस्त ॥ कोण गे येथें घागरी फोडीत ॥ त्यांचे कर्णनासिकीं हनुमंत ॥ पुच्छ घालित हळूचि ॥५६॥
तेणें दुश्र्चिंत नारी दचकती ॥ एक फडांफडां शिंकती ॥ भरला घट मारुती ॥ जाऊं नेदी नगरांत ॥५७॥
घटस्फोट जाहले राजद्वारीं ॥ शिव्या देती नगरींच्या असुरी ॥ दशमुखा तुझी न उरे उरी ॥ जनककुमारी क्षोभली ॥५८॥
सीतेनें चेतविलें भूत ॥ तें नगरांत हिंडे गुप्त ॥ हें लंकेचा करील निःपात ॥ दशकंठ यथार्थ निमेल ॥५९॥
तों राजदर्शनासी महावीर ॥ तुरंग धरूनी ॥ गरगरां भोवंडोनि आपटी मेदिनीं ॥ एकावरी एक उचलोनी ॥ अश्र्वासहित स्वार टाकी ॥६१॥
तों गजभार आले उन्मत्त ॥ त्यांचे पुच्छें उपडोनियां दांत ॥ वरी बैसले असुर समस्त ॥ दंतघायें झोडिले ॥६२॥
गुढारांसहित गज उचलोनी ॥ भिरकावित समुद्रजीवनीं ॥ तों रथारूढ होऊनि ॥ राजकुमार पातल ॥६३॥
तंत वितंत घन सुस्वर ॥ वाजवीत वाद्यांचे गजर ॥ देखतां क्षोभला वानर ॥ पुच्छ सत्वर सोडिलें ॥६४॥
शतांचे शत रथ ओढोनी ॥ कुमार पालथे पाडिले मेदिनी ॥ सारथी भिरकाविले गगनीं ॥ घोडे मारून टाकिले ॥६५॥
पुच्छघायेंकरूनीं ॥ वाजंत्री झोडिले ते क्षणीं ॥ वाद्यें गेली सकळ गळोनी ॥ शंख करित पळती ते ॥६६॥
तों पालखील बैसोन प्रधान ॥ आले देखोनि वायुनंदन ॥ सूक्ष्म पुच्छ करून ॥ भोयांचे कानीं सूदिलें ॥६७॥
भोई दचकले एकाएकीं ॥ खालती आपटिली पालखी ॥ त्यांतें प्रधान धरोनि जवळिकीं ॥ ताडण करिती बहुसाल ॥६८॥
ते म्हणती कां मारितां व्यर्थ ॥ श्रावणारिस्नुषेनें चेतविलें भूत ॥ तें तुमचा अपमान करित ॥ शिबिका बहुत मोडिल्या ॥६९॥
पालख्या रथ गज घोडे ॥ झोडून पाडिले एकीकडे ॥ कोणी न ये राजद्वाराकडे ॥ जो तो दडे सांधीकोनीं ॥१७०॥
सवेंच उठोनि मारुति ॥ घरोघरीं घेत पाळती ॥ सीतेची गोष्टि कोणे रीती ॥ कैसें बोलती म्हणोनियां ॥७१॥
असो अस्ता गेला चंडकिरण ॥ सभामंडपीं बैसला रावण ॥ तये सभेंत अंजनीनंदन ॥ प्रवेशता पैं जाहला ॥७२॥
सिंहासनीं बैसला लंकानाथ ॥ पाठीसी उभा रामदूत ॥ तों सभेस घरटीकार सांगत ॥ रावणासन्मुख वर्तलें तें ॥७३॥
म्हणती शक्ररिजनका अवधारीं ॥ दुष्ट विघ्नें उदेलीं नगरीं ॥ लक्षांचे लक्ष फुटल्या घागरी ॥ नगरद्वारीं लंकेशा ॥७४॥
उगीच पडती गोपुरें ॥ बहुसाल रिचवती मंदिरें ॥ गगनमार्गीं टाकिलीं लेंकुरें ॥ कपाटें समग्र मोडिलीं ॥७५॥
वीर पडले म्हणताती ॥ निद्रिस्त जन वोसणती ॥ दुश्र्चिन्हें बहुत लंकापती ॥ शंका वाटे सांगतां ॥७६॥
ताटिकांतकाची कांता झडकरी ॥ नेऊन सोडावी कांतारीं ॥ इतुकेन स्वस्थ लंकापुरी ॥ चिरकाळ नांदेल ॥७७॥
ऐसें बोलतां धरटीकार ॥ क्रोधावला द्विपंचवक्र ॥ म्हणे याची जिव्हा आणि श्रोत्र ॥ छोदोनियां टाका ॥७८॥
नसतें कल्पित दुश्र्चिन्ह ॥ सांगतो मूर्ख आम्हांलागून ॥ ऐसें ऐकतां वचन राघवप्रियकर क्षोभला ॥७९॥
म्हणे लटिकें दुश्र्चिन्ह ॥ यासीच दावूं खरें करून ॥ माझे पुच्छासी होवो बहु कल्याण ॥ करीन कंदन सभेचें ॥१८०॥
तों रावणापुढें नापिक येत ॥ शस्त्रें श्मश्रु नीट करित ॥ तों नापिकाचे कर्णीं हनुमंत ॥ पुच्छ घाली हळूचि ॥८१॥
तों नापिक भयें दचकला ॥ तेणें हात चांचरी गेला ॥ मिशी भादरली ते वेळां ॥ एकीकडील अवघीच ॥८२॥
तेणें क्षोभला लंकानाथ ॥ हस्तें ताडिला नापिक ॥ रावणाचे पृष्ठीवरी देख ॥ हनुमंतें मुष्टि ओपिली ॥८३॥
वामहस्तचपेटेंकरूनी ॥ दाही छत्रें पाडिलीं धरणीं ॥ सवेंच दाही मुकुट हाणोनी ॥ सव्यहस्तें पाडिले ॥८४॥
छत्रदंड घेवोनि करीं ॥ घाली रावणाचे अपानद्वारीं ॥ येरू मागें पाहे ते अवसरीं ॥ तों दंड माझारी खंडिला ॥८५॥
चौदा गांवें मंडप विस्तीर्ण ॥ सुगंधस्नेहें दीप शोभायमान ॥ चौदा सहस्र लाविले पूर्ण ॥ ठायींठायीं सुरेख ॥८६॥
कर्पूरदीप सतेज थोर ॥ आठ लक्ष सभेसमोर ॥ पाजळोन उभे असती असुर ॥ विशाळ शरीरें जयांचीं ॥८७॥
पुच्छघातें वायुकुमरें ॥ दीपिका विझविल्या एकसरें ॥ दीप तेथें एकही न उरे ॥ जाहले घाबरे सभालोक ॥८८॥
अंधार पडतांचि तेथ ॥ नागवूं लागला हनुमंत ॥ शस्त्रवस्त्रादि समस्त ॥ अलंकार घेत हिरोनि ॥८९॥
मुकुट घेऊन सत्वर ॥ मस्तकीं हाणी मुष्टिप्रहार ॥ जैसा सपक्ष नगावरी पुरंदर ॥ वज्र बळें प्रेरी पैं ॥१९०॥
बोटें तोडोनि मुद्रिका सकळ ॥ काढून घेत अंजनीबाळ ॥ कंठ पिळोन काढी माळ ॥ करिती कल्होळ असुर तेव्हां ॥९१॥
मुष्टिघातें हृदय फोडूनि ॥ मग घेत पदक काढूनि ॥ पादप्रहारें माज मोडूनि ॥ मग ओढीत कडदोरा ॥९२॥
नेसलीं वस्त्रें घेत हिरोनि ॥ सवेंच लिंग टाकी तोडोनि ॥ एक वस्त्रें फेडोनि ॥ अगोदर टाकिती ॥९३॥
एक म्हणती आयुष्य जाहलें जरी ॥ वस्त्रालंकार देखों संसारी ॥ परी लिंगाविण जन्मवरी ॥ काय म्हणोनि कंठावें ॥९४॥
राक्षसांचे चरण मोडूनि ॥ मग ब्रीदें घेतलीं काढूनि ॥ एक हांक फोडिती ते क्षणीं ॥ घ्राण छेदोनि टाकित ॥९५॥
एकासी एक दाविती खूण ॥ बोलूं नका रे वांचवा प्राण ॥ एक म्हणती निर्मूळ करावया पूर्ण ॥ महद्भुत उदेलें ॥९६॥
आणिली श्रीरामाची कांता ॥ सतियां शिरोमणि पतिव्रता ॥ तिणेंच हें भूत चेतवितां ॥ प्रळय जाहला लंकेसी ॥९७॥
अंधार पडला दारुण ॥ सुटला अद्भुत प्रभंजन ॥ दीपिका आणितां जाती विझोन ॥ अनर्थ पूर्ण ओढवला ॥९८॥
एक म्हणती कोठें लंकानाथ ॥ एक म्हणती मेला कीं जित ॥ जवळ असतां न कळे मात ॥ थोर प्राणांत ओढवला ॥९९॥
देवांतक नरांतक राजसुत ॥ अतिकाय इंद्रजित ॥ मत्त महामत्त युद्धोन्मत्त ॥ प्रहस्तादि नागविले ॥२००॥
उघडोनियां सभाद्वार ॥ कोणी जाऊं न शके बाहेर ॥ होत पुच्छाचा घोर मार ॥ दडती असुर ठायीं ठायीं ॥१॥
भयभीत दशकंधर ॥ म्हणे सत्य बोलिला घरटीकार ॥ प्रचंड हें विघ्न दुस्तर ॥ आलें साचार प्रत्यया ॥२॥
रावणाचे पृष्ठीवरी मार ॥ वज्रप्राय होत थोर ॥ बोलूं न शके अणुमात्र ॥ घ्राण छेदील म्हणोनी ॥३॥
रावणाचे कानीं हनुमंत ॥ हळूच जावोनि सांगे मात ॥ जनकजापतीचा मी दूत ॥ त्रासीन नगर समस्त हें ॥४॥
तुझी छेदोनी दाही शिरें ॥ किष्किंधेसीं नेईन क्षणमात्रें ॥ परी त्या अयोध्याधीशें उदारें ॥ आज्ञा नाहीं दीधली ॥५॥
ऐसें सांगतां वायुनंदन ॥ मनीं भ्रमित झाला द्विपंचवदन ॥ कर्णी सांगितलें वर्तमान ॥ कळलें नाहीं रावणा ॥६॥
ऐसा प्रळय करूनि थोर ॥ निघोन गेला वायुपुत्र ॥ नागविले प्रतापें वीर ॥ दशवक्रादिकरोनियां ॥७॥
दीपिका आणिल्या तात्काळ ॥ तों नागवेचि असुर सकळ ॥ कित्येक मूर्च्छा येऊनि विकळ ॥ बहुत पडले धरणीये ॥८॥
कित्येकांचे मोडले करचरण ॥ बहुतांचे तोडिले कर्णघ्राण ॥ एक लिंग तोडिलें म्हणोन ॥ रावणासी दाखविती ॥९॥
दुःखें व्याप्त पिशिताशन ॥ स्वसदना गेला उठोन ॥ चिंताक्रांत दशवदन ॥ राणिवसांत प्रवेशला ॥२१०॥
रामविजय ग्रंथ सुंदर ॥ हें विश्रांतीचें दिव्य मंदिर ॥ येथें पहुडले सज्ञान नर ॥ जे रघुवीरउपासक ॥११॥
जे मतिमंद अज्ञानी जन ॥ सेविताती अविद्यारण्य ॥ त्यांसी हें रामविजयसदन ॥ प्राप्त नोहे सहसाही ॥१२॥
विषकंठहृदया रघुनंदना ॥ श्रीरामा दशकंठदर्पहरणा ॥ श्रीधरवरदा जगद्भूषणा ॥ ब्रह्मानंदा सुखाब्धि ॥१३॥
स्वस्ति श्रीरामविजयग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकनाटकाधार ॥ सदा परिसोत भक्त चतुर ॥ एकोनविंशतितमोध्याय गोड हा ॥२१४॥
श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥ अध्याय १९ ॥ ओंवीसंख्या ॥२१४॥