श्रीगणेशाय नमः ॥
जैसे दुर्बळाचिया गृहाप्रति ॥ समर्थ सोयरे येती ॥ त्यांसी पाहुणेर करावया निश्र्चिती ॥ नाहीं शक्ति तयातें ॥१॥
मग तो कंदमूळें आणून ॥ पुढें ठेवी प्रीतीकरून ॥ तैसे हे प्राकृत बोल पूर्ण ॥ संतांपुढें समर्पिले ॥२॥
पयोब्धीपुढें ठेविलें तक्र ॥ कीं सुरभीपुढें अजाक्षीर ॥ अमृतापुढें साखर ॥ नेऊनियां समर्पिली ॥३॥
कुबेरापुढें कवडी जाण ॥ रंकें ठेविली नेऊन ॥ शीतळ व्हावया रोहिणीरमण ॥ नवनीत पुढें ठेविलें ॥४॥
कल्पद्रुमापुढें बदरीफळ ॥ वैरागराचे कंठीं स्फटिकमाळ ॥ मलयगिरीसी गंध शीतळ ॥ निंबकाष्ठाचें चर्चिलें ॥५॥
जो ब्रह्मांडप्रकाशक गभस्ति ॥ त्यासी ओंवाळिजे एकारती ॥ परी तो घेत देखोन भक्ति ॥ ऐसेंचि येथें संतीं केलें ॥६॥
तैसे बोल हे हीन जाण ॥ परी संतांसी आवडी पूर्ण ॥ एकुणिसावे अध्यायीं कथन ॥ काय जाहलें तें परिसा हो ॥७॥
असुरांतें देखोनि हनुमंत ॥ सभा नागवूनि समस्त ॥ पुरुषार्थ करोनि अद्भुत ॥ गेला गुप्तरूपेंचि ॥८॥
लंकेचीं मंदिरें समस्त सीतेलागीं शोधी हनुमंत ॥ जैसा रत्नपरीक्षक निरीक्षित ॥ रत्न आपुलें हारपलें ॥९॥
धांडोळिली लंका नगरी ॥ कोठें नुमगे जनककुमरी ॥ जेथें होतीं रावण-मंदोदरी ॥ तेथें हनुमंत पातला ॥१०॥
तंव तो शक्रारिजनक ॥ हवन करी विघ्नाशक ॥ शेजेवरी निजली निःशंक ॥ पट्टराणी मंदोदरी ॥११॥
उपरमाडिया गोपुरें ॥ राणिवसाचीं दामोदरें ॥ ऐशीं सहस्र अंतःपुरें ॥ सीतेलागीं शोधिलीं ॥१२॥
सकळ स्त्रियांचे मंदिरांत ॥ रिघोन पाहे हनुमंत ॥ जो महाराज इंद्रियजित ॥ काम रुळत तोडरी ॥१३॥
रावणें आणिल्या नारी ॥ नागिणी पद्मिणी किन्नरी ॥ ज्यांचिया पदनखांवरी ॥ भ्रमर रुंजी घालिती ॥१४॥
ऐशा सुंदरी देखत ॥ परी काममोहित नव्हे हनुमंत तो राघवप्रिय अतिविरक्त ॥ ऊर्ध्वरेता वज्रदेही ॥१५॥
घटमठांमाजी व्यापून ॥ वेगळें असे जैसें गगन ॥ तैसाचि अंजनीनंदन ॥ लोकांत वर्तूनि वेगळा ॥१६॥
स्त्रिया शोधिल्या समस्त ॥ तव मंदोदरी जेथें निद्रिस्थ ॥ तेथें येऊन हनुमंत ॥ उभा राहिला क्षणभरी ॥१७॥
सुरूप देखोनि मंदोदरी ॥ म्हणे हेचि होय विदेहकुमरी ॥ निजेली पवित्रपणें शेजेवरी ॥ पतिव्रता म्हणोनियां ॥१८॥
सतियां शिरोरत्न सीता सती ॥ परमपुरुषाची चिच्छक्ति ॥ मज आजि भेटली निश्र्चितीं ॥ म्हणोन मारुती नाचत ॥१९॥
तों होमविधि संपादून ॥ तेथें आला द्विपंचवदन ॥ तों मंदोदरी उठोन ॥ पाय धूत पतीचे ॥२०॥
ऐसें देखोन हनुमंत ॥ क्षोभला जैसा प्रळयकृतांत ॥ म्हणे जानकी होय यथार्थ ॥ वश्य जाहली रावणातें ॥२१॥
रामवचन आठवी मारुति ॥ सीतेचे वदनीं कर्पूरदीप्ति ॥ मग मुखाजवळी त्वरितगति ॥ मंदोदरीच्या पातला ॥२२॥
मुख तिचे अवघ्राणिलें ॥ तों दुर्गंधीनें मन विटलें ॥ म्हणे मद्यपान आहे केलें ॥ उभयवर्गीं मिळोनियां ॥२३॥
भिंतीस लावतां कान ॥ होत नाहीं रामस्मरण ॥ हे रावणासी मानली पूर्ण ॥ तेथें स्मरण कायसें ॥२४॥
तों रावण आणि मंदोदरी ॥ दोघें निजलीं शेजेवरी ॥ सुषुप्तिअवस्थेमाझारी ॥ निमग्न जाहलीं ते वेळे ॥२५॥
मनी विचारी हनुमंत ॥ या दोघांसी उचलोनि त्वरित ॥ किष्किंधेसी न्यावीं यथार्थ ॥ पाहील रघुनाथ दोघांतें ॥२६॥
किंवा घालून चंड पाषाण ॥ दोघांचे येथेंच घेऊं प्राण ॥ ऐसें विचारी वायुनंदन ॥ तंव अपूर्व वर्तलें ॥२७॥
अकस्मात गजबजोनी ॥ मंदोदरी बैसली उठोनी ॥ आक्रोशें हांक फोडोनी ॥ वक्षःस्थळ बडवित ॥२८॥
सवेंचि महाशंख करित ॥ दशकंठ धरी तिचे हात ॥ मयजा म्हणे अतित्वरित ॥ सीता द्या हो रामाची ॥२९॥
आजि विलोकिलें दुष्ट स्वप्न ॥ माझी गळसरी गेली जळोन ॥ एक बळिया वानर येऊन अशोकवन विध्वंसिलें ॥३०॥
तेणें वधिला अखया सुत ॥ समरीं गांजिला इंद्रजित ॥ घेऊन आला जनकजामात ॥ हरिदळ अद्भुत न वर्णवे ॥३१॥
शिळीं बुजोनियां सरितानाथ ॥ सुवेळेसी आला अवनिजाकांत ॥ रावण कुंभकर्ण शक्रजित ॥ वधोनि विजयी जाहला असे ॥३२॥
स्वप्न नव्हे हें ब्रह्मवचन ॥ तरी मंगळभगिनी द्या नेऊन ॥ मंगळदायक रघुनंदन ॥ त्यासी शरण जावें जी ॥३३॥
करितां परदाराभिलाष ॥ कोण पावला मागें यश ॥ मानव नव्हे राघवेश ॥ पुराणपुरुष अवतरला ॥३४॥
उदरीं बांधोनि दृढ पाषाण ॥ केवीं तरेल अगाध जीवन ॥ बळेंचि केलें विषप्राशन ॥ त्यासी कल्याण मग कैचें ॥३५॥
खदिरांगाराचे शेजेवरी ॥ कैसा प्राणी निद्रा करी ॥ महासर्पाचे मुखाभीतरीं ॥ हस्त घालितां उरे कैसा ॥३६॥
शार्दूळ करूं गेला पलाटण ॥ त्याचे जाळीमाजी जाऊन ॥ नांदेन म्हणे क्षेम कल्याण ॥ तो प्राणी कैसा वांचेल ॥३७॥
तुम्ही जरी सर्वांसी जिंकिलें ॥ परी राघवेंद्रा तैसें न चले ॥ पूर्णब्रह्म अवतरलें ॥ भक्तजन रक्षावया ॥३८॥
यालागीं द्विपंचवदना ॥ मी शरण जात्यें रघुनंदना ॥ देवोनि तयाची अंगना ॥ चुडेदान मागेन ॥३९॥
मनीं विचारी लंकापति ॥ इचें वचन सर्व मानिती ॥ नेऊन देईल सीता अवचितीं ॥ भलत्यासी आज्ञा करूनियां ॥४०॥
रावण म्हणे मंदोदरी ॥ तूं सर्वथा चिंता न करीं ॥ उदयीक नेऊन जनककुमारी ॥ जनकजामाता देईन ॥४१॥
पांचकोटी राक्षसगण ॥ अशोकवनाभोंवतें रक्षण ॥ तयांसी सांगोन पाठवी रावण ॥ रात्रंदिवस सावध असावें ॥४२॥
बिभीषण कुंभकर्ण इंद्रजित ॥ हे मयजेसी मानिती बहुत ॥ यांचा विश्र्वास न धरावा यथार्थ ॥ नेऊन देतील जानकीतें ॥४३॥
ऐसें समस्त वर्तमान ॥ वायुसुतें केलें श्रवण ॥ म्हणे मंदोदरी सती धन्य ॥ इच्या स्मरणें दोष नुरे ॥४४॥
तो दूतीस म्हणे दशकंधर ॥ अशोकवना जाऊनि सत्वर ॥ जनकात्मजेचा समाचार ॥ घेऊन येईं त्वरेनें ॥४५॥
तात्काळ चालिली दूती ॥ तयेमागें जाय मारुति ॥ आला अशोकवनाप्रति ॥ आनंद चित्तीं न समाये ॥४६॥
तों अशोकवृक्षाचे तळीं ॥ ध्यानस्थ बैसली मैथिली ॥ दूती परतली तात्काळीं ॥ हनुमंत तेथे राहिला ॥४७॥
जय जय रघुवीर रघुवीर अयोध्यानाथ ॥ म्हणोनि नाचों लागला हनुमंत ॥ म्हणे धन्य मी आजि येथ ॥ जगन्माता देखिली ॥४८॥
पुच्छा नाचवी कडोविकडी ॥ तों विटावी डोळे मोडी ॥ चक्राकार मारी उडी ॥ रामनाम गर्जोनियां ॥४९॥
चहूंकडे पाहे मारुति ॥ तों रामनामें वृक्ष गर्जती ॥ पंचभूतें पक्षी घुमती ॥ रामस्मरणें करूनियां ॥५०॥