मग पडलीं फळें एकवटोनी ॥ हस्तद्वयें टाकी वदनीं ॥ हनुवटी हाले तेक्षणीं ॥ फळे तांतडी चावितां ॥५१॥
चंचळ दृष्टी करून ॥ मागें पुढें पाहे अवलोकून ॥ तंव ते वनरक्षक संपूर्ण ॥ निद्रार्णवीं बुडाले ॥५२॥
राक्षसांनी मद्य प्राशिलें ॥ हनुमंतें वन विध्वंसिलें ॥ पुढें पुच्छें उपडोनि आणिले ॥ वृक्ष भोंवते सर्वही ॥५३॥
हनुमंत बैसे फलहारासी ॥ पुच्छ पाहुणेर करी तयासी ॥ न सोडी बैसल्या ठायासी ॥ आपोशन मोडे म्हणोनी ॥५४॥
पुच्छासी हनुमंत बोले ॥ गोड गोड आणीं कां फळें ॥ आजि त्वां तृप्त आम्हां केलें ॥ चिरंजीव राहे तूं ॥५५॥
नंदनवनाहून सुंदर ॥ अशोकवनींचे तरुवर ॥ फणस इक्षुदंड लवंग परिकर ॥ उपडी समग्र एकदांचि ॥५६॥
केळी नारळी देवदार ॥ जंबू कपित्थ अंजीर ॥ ज्याचें रस लागती मधुर ॥ हनुमंतवीर सेवितसे ॥५७॥
असो तरुवर लक्षकोडी ॥ भुजाबळें उर्वीवरी झोडी ॥ राघव स्मरणें तांतडी ॥ फळें वदनीं टाकीतसे ॥५८॥
हनुमंत करीत यजन ॥ रामनाममंत्रेंकरून ॥ वदनकुंडीं आहुती पूर्ण ॥ घालोनि जठराग्नि तृप्त करी ॥५९॥
सीतेनें घातली आपुली आण ॥ वृक्षावरी न चढावें पूर्ण ॥ यालागीं वृक्ष झोडोन । फळें पाडी धरणीये ॥१६०॥
जैसी कां चपळा कडाडी ॥ तैसें पुच्छ वृक्ष मोडी ॥ तों राक्षस उठले तांतडी ॥ भीम कोल्हाळ करितचि ॥६१॥
चक्रें डांगा भिंडिमाळा ॥ घेऊन धांवले एकवेळां ॥ सीताशोकहरण कोंडिला ॥ सकळीं मिळोन एकदांचि ॥६२॥
वृषभीं कोंडिला महाव्याघ्र ॥ कीं बहुत विखारी खगेंद्र ॥ कीं श्रृगालीं वेढिला मृगेंद्र ॥ खद्योत दिनकरा धरूं म्हणती ॥६३॥
कीं मंथूनि सागर द्विज ॥ धरूं म्हणती प्रळयबीज ॥ कीं आर्द्रमृत्तिकेचे गज ॥ प्राशूं म्हणती जळसिंधु ॥६४॥
कर्पूरपुतळे म्हणती एकवेळां ॥ धरोनि आणूं वडवानळा ॥ मक्षिका मिळोनि सकळा ॥ भूगोल उचलूं भाविती ॥६५॥
उष्ट्रांनी ब्रीद बांधोन ॥ तुंबरापुढें मांडिलें गायन ॥ कीं वृश्र्चिक पुच्छेंकरून ॥ ताडीन म्हणे वज्रातें ॥६६॥
तैसे हनुमंतावरी वनरक्षक ॥ एकदांच धांवले सकळिक ॥ यावरी लोकप्राणेशबाळक ॥ काय करिता जाहला ॥६७॥
विशाळ वृक्ष उपडोनी ॥ सव्य करीं घेत तेच क्षणीं ॥ जैसा पावक शुष्कवनीं ॥ संहारी तैसा राक्षसां ॥६८॥
साठीं सहस्र वनपाळ ॥ पुच्छें भारे बांधिले सकळ ॥ फिरवूनियां तात्काळ ॥ भूमीवरी आपटिले ॥६९॥
जैसीं तुंबिनीचीं ओलीं फळें ॥ बळें आपटितां होतीं शकलें ॥ तैसे वनरक्षक ते वेळे ॥ चूर्ण जाहले सकळही ॥१७०॥
सवेंच समुद्रजीवनीं ॥ प्रेतें देत भिरकावूनी ॥ भुभुःकारें गर्जे तो ध्वनी ॥ गगनगर्भीं न समाये ॥७१॥
घायाळें उरलीं किंचित ॥ तीं रावणासमीप आलीं धांवत ॥ म्हणती एक वानर अद्भुत ॥ अशोकवनीं प्रगटला ॥७२॥
सकळ वन विध्वंसून ॥ वनरक्षक मारिले संपूर्ण ॥ ऐसें राक्षसेंद्रें परिसोन ॥ परम विषाद पावला ॥७३॥
तेव्हां ऐशीं सहस्र महावीर ॥ प्रेरिता झाला दशकंधर ॥ म्हणे धरोनि आणा रे वानर ॥ नानायत्नें करूनियां ॥७४॥
जरी नाटोपे तुम्हांलागून ॥ तरी मज दावूं नका वदन ॥ ऐशीं सहस्र पिशिताशन ॥ गर्जत वना पातले ॥७५॥
नानाशस्त्रें घेतलीं हातीं ॥ हांकें निराळ गाजविती ॥ ऐसें देखोन मारुति ॥ विशाळरूप जाहला ॥७६॥
जैसा मंदराचळ विशाळ ॥ तैसा दिसे अंजनीबाळ ॥ वासुकी ऐसें पुच्छा सबळ ॥ लंबायमान सोडिलें ॥७७॥
लंकेचे महाद्वारींची अर्गळा ॥ लोहबंदी वेष्टिला ते वेळां ॥ मारुति मारीत उठिला ॥ सिंहनादें गर्जत ॥७८॥
वृक्षावरी पक्षी उडोनी ॥ प्रातःकाळीं भरती गगनीं ॥ तैशीं अरिमस्तकें तुटोनि ॥ उसळोन धरणीं पडताती ॥७९॥
बांधोनी शत्रुसमुदायभार ॥ गगनीं फिरवी वायुकुमर ॥ आपटितां होती चूर ॥ करचरणादि अवयव ॥१८०॥
तों त्यांत मुख्य जंबुमाळी ॥ हांका देत पातला ते वेळीं ॥ म्हणे वानरा रणमंडळीं ॥ तुज आजि मारीन ॥८१॥
शूल घेवोनि ते वेळां ॥ बळें मारुतीवरी धांविन्नला ॥ तों हनुमंतें लत्ताप्रहार दिधला ॥ कोथळा फुटला तयाचा ॥८२॥
जैसें शस्त्र बैसतां प्रबळ ॥ चूर्ण होय फणसफळ ॥ कीं वज्रघातें महाशैल ॥ चूर्ण जैसा होय पैं ॥८३॥
ऐसा जंबुमाळी पडला ॥ चिरोन हनुमंतें भिरकाविला ॥ दशमुखास समाचार कळला ॥ अत्यंत कोपला ते काळीं ॥८४॥
मग पाठविले लक्ष वीर ॥ पांच सेनाधीश मुख्य थोर ॥ मल्ल प्रतिमल्लनामें असुर ॥ प्रचंड चंड जघन पैं ॥८५॥
रावणाची आज्ञा घेऊन ॥ वेगें पावला अशोकवना ॥ हें देखोन वायुनंदन ॥ अर्गळा हातीं तुळीतसे ॥८६॥
करोनि पुच्छाचें उखळ ॥ हातीं घेऊनि लोहमुसळ ॥ कांडीतसे लंकेशाचें दळ ॥ साळीऐसें तेधवां ॥८७॥
असुरदेह पडती अचेतन ॥ हाचि साळींचा कोंडा झाडून ॥ सूक्ष्मदेह तांदूळ पूर्ण ॥ जात उद्धरोनि कपिहस्तें ॥८८॥
करकरां कपि दाढा खात ॥ नेत्र गरगरां भोवंडित ॥ शस्त्रास्त्रें अवघे वर्षत ॥ पिशिताशन ऊठती ॥८९॥
मेरूऐसा सबळ ॥ जातां अंजनीचा बाळ ॥ तो तेथें देंखिलें देऊळ ॥ सहस्रस्तंभमंडित ॥१९०॥
तेथें रावणें देवी स्थापिली ॥ ब्राह्मणाचा देत नित्य बळी ॥ वायुसुतें ते वेळीं ॥ तें विदारिलें देवालय ॥९१॥
पायासकट उपडोन ॥ आकाशपंथें देत भिरकावून ॥ दशदिशांसी गेले पाषाण ॥ पक्ष्यांऐसे उडोनियां ॥९२॥
असो यावरी हनुमंतें ॥ लोहार्गळा घेवोनि हातें ॥ मांडिलें वीरकंदनातें ॥ गीत रामाचें गातसे ॥९३॥
अशोकवन तेचि खळें ॥ माजी वीरधान्य रगडिलें ॥ हनुमंत तिवडा मध्यें बळें ॥ पुच्छ फिरवीतसे ॥९४॥
तया खळियाजवळी ॥ खेचरदेवी जनकबाळी ॥ महावीरांचे दिधले बळी ॥ राशी केल्या शिरांच्या ॥९५॥
रेणुकेच्या कैवारें फरशधरें ॥ सर्व क्षत्रियांची छेदिलीं शिरें ॥ तैसें सीतेकारणें राघवकिंकरें ॥ संहारिले यामिनीचर ॥९६॥
असो हनुमंत ते वेळां ॥ असुर पुच्छें करूनि गोळा ॥ आपटोनि समुद्रजळा माजी निक्षेपी साक्षेपें ॥९७॥
लक्ष वीर संहारिले ॥ मग सात पुत्र पाठविले ॥ तेही हनुमंतें चूर्ण केले ॥ अर्गळाघातेंकरूनियां ॥९८॥
हांक गेली रावणापाशीं ॥ वानरें संहारिलें समस्तांसी ॥ मग पाठविलें अखयासी ॥ दळभारेंसी तेधवां ॥९९॥
अखया देखोनि हनुमंत ॥ लोहर्गळा घेऊन नाचत ॥ गदगदां हंसूनि बोलत ॥ लंकेशात्मजासी तेधवां ॥२००॥
अरे अखया तुझें नाम व्यर्थ ॥ जैसे अजागळींचे स्तन यथार्थ ॥ कीं मूर्खासी अलंकार घातले सत्य ॥ बधिराचे श्रोत्र जैसे कां ॥१॥
कीं गर्भांधाचे नयन ॥ व्यर्थ काय विशाळ दिसोन ॥ कीं नासिकाविण वदन ॥ नामकरण तैसें तुझें ॥२॥
रासभासी भद्रासन ॥ श्र्वानासी अग्रपूजामान ॥ कीं दिव्यांबर परिधान ॥ व्यर्थ प्रेतास करविलें ॥३॥
तैसें अखया नाम दशमुखें ॥ तुज ठेविलें व्यर्थ शतमुखें ॥ आतां अखया तुझा क्षणएकें ॥ क्षय करीन जाणपां ॥४॥
मग अखया धनुष्य घेऊन ॥ सोडी बाणापाठीं बाण ॥ क्षण एक वायुनंदन ॥ उगाच उभा राहिला ॥५॥
काडिया पाडतां बहुत ॥ बैसका न सांडी पर्वत ॥ कीं सुमनवृष्टीनें मदोन्मत्त ॥ खेद सहसा न मानी ॥६॥
तैसे अखयाचे बाण ॥ येतां न भंगे वायुनंदन ॥ मग लोहार्गळा घेऊन ॥ कृतांतवत धांविन्नला ॥७॥
बैसता लोहार्गळेचे घाय ॥ अखयाचा जाहला क्षय ॥ समीरात्मज पावला जय ॥ सुरसमुदाय आनंदला ॥८॥
ऐकोनि अखयाचा समाचार ॥ शोकार्णवीं पडला लंकेश्र्वर ॥ आसाळी राक्षस भयंकर ॥ अशोकवना धाडिली ॥९॥
दहा सहस्र गजांचें बळ ॥ उदरांत सांठवी अचळ ॥ एक योजन मुख विशाळ ॥ पसरोनियां धांविन्नली ॥२१०॥
कपाळीं चर्चिला शेंदूर ॥ बाबरझोटी भयंकर ॥ तिनें धांवोनि सत्वर ॥ वायुसुत धरियेला ॥११॥
उचलोनि घातला मुखांत ॥ दांतांसी दांत जो मेळवित ॥ तंव तों उतरला उदरांत ॥ क्षणमात्र न लागतां ॥१२॥
लंकेशासी सांगता हेर ॥ आसळीनें गिळिला वानर ॥ ऐकतां आनंदला दशशिर ॥ असुरसभेसहित पैं ॥१३॥
रावण शर्करा वांटित ॥ तों दूत आले शंख करित ॥ आसाळीचा जाहला अंत ॥ हनुमंतें पोट फोडिलें ॥१४॥
तिनं चाविला नसतां वानर ॥ सगळाचि गिळिला सत्वर ॥ यालागीं जितचि वीर ॥ उदर फोडोनि निघाला ॥१५॥
शोकाकुलित द्विपंचवदन ॥ म्हणे हें अद्भुत प्रगटलें विघ्न ॥ यावरी शक्रजित जाऊन ॥ युद्ध करील परिसा तें ॥१६॥
रामविजय ग्रंथ सुरस ॥ सुंदरकांड कौतुक विशेष ॥ श्रवण करोत सावकाश ॥ रघुवीर भक्त आदरें ॥१७॥
रविकुळमंडणा पुराणपुरुषा ॥ श्रीमद्भीमातटनिवासा ॥ ब्रह्मानंदा अविनाशा ॥ श्रीधरवरदा जगद्रुरो ॥१८॥
स्वस्ति श्रीरामविजय ग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकनाटकाधार ॥ सदा परिसोत भक्त चतुर ॥ विंशतितमाध्याय गोड हा ॥२१९॥
॥ अध्याय ॥ ॥ २० ॥ ॥ ओंव्या ॥ ॥ २१९॥
॥ श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥