अध्याय वीसावा - श्लोक १०१ ते १५०

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.


ऐसें जगन्माता बोलत ॥ तों उगाचि राहिला हनुमंत ॥ न बोले कांहीच मात ॥ पाहे तटस्थ जानकी ॥१॥

म्हणे येथें कापट्य पूर्ण ॥ कोण करितो न कळे कीर्तन ॥ बाहेर न भेटे येऊन ॥ तरी आतां प्राण सांडीन मी ॥२॥

अत्यंत कृश जाहली गोरटी ॥ मुद्रिका घातली मनगटीं ॥ म्हणे अयोध्यापति जगजेठी ॥ नव्हे भेटी तुझी आतां ॥३॥

मग जनकात्मजेनें ते वेळां ॥ वेणीदंड वेगें काढिला ॥ त्याचा गळां पाश घातला प्राणत्यागाकारणें ॥४॥

म्हणे अयोध्यापति तुजविण ॥ मी क्षण एक न ठेवीं प्राण ॥ ऐसें बोलोनियां वचन ॥ जनकात्मजा सरसावली ॥५॥

वेणीदंड काढोनि ॥ वृक्षडाहळीये बांधी तये क्षणीं ॥ राघवप्रिय तें देखोनि ॥ बहुत मनीं गजबजिला ॥६॥

जानकी त्यागील प्राणा ॥ मग काय सांगों रघुनंदना ॥ भरताग्रजा जगन्मोहना ॥ धांवें लौकरी ये वेळे ॥७॥

अंतरीं आठविले रामचरण ॥ बुद्धिप्रर्वतक म्हणोन ॥ मग तैसेंचि केलें उड्डाण ॥ गगनपंथें ते वेळां ॥८॥

अंजनी आत्मज ते वेळां ॥ गर्जोनि म्हणे पैल श्रीराम आला ॥ ऐसें बोलतां जनकबाळा ॥ ऊर्ध्वपंथें विलोकी ॥९॥

मारुती खालीं उतरून ॥ करिता जाहला साष्टांग नमन ॥ जगन्माता बोले वचन ॥ हो कल्याण चंद्रार्कवरी ॥११०॥

जोडोनियां दोनी कर ॥ उभा राहिला समोर ॥ म्हणे कल्याणरूप रघुवीर ॥ किष्किंधेसी सुखी असे ॥११॥

मी श्रीरामाचा अनुचर ॥ हनुमंतनामा वायुकुमर ॥ माते तुजकारणें लंकानगर ॥ धांडोळिलें सर्वही ॥१२॥

सीतेसी आनंद जाहला थोर ॥ जैसा बहुत दिवस गेला कुमर ॥ तो भेटतां हर्ष अपार ॥ तैसी निर्भय जाहली ॥१३॥

अवृष्टीं वर्षे घन ॥ कीं मृत्युसमयीं सुधारसपान ॥ कीं दुष्काळिया दर्शन ॥ क्षीरसिंधूचें जाहलें ॥१४॥

असो पंचवटीपासोन वर्तमान ॥ रामें लीला केली जी पूर्ण ॥ ती सीतासतीस वायुनंदन ॥ कथिता जाहला ते वेळीं ॥१५॥

जटायु उद्धरोनि कबंध वधिला ॥ वाळी मारोनि सुग्रीव स्थापिला ॥ तो अपार मेळवून हरिमेळा ॥ साह्य जाहला श्रीरामा ॥१६॥

आठवोन तव गुण स्वरूप ॥ राम सर्वदा करी विलाप ॥ श्र्वापदें पाषाण पादप ॥ सीता म्हणोनि आलिंगी ॥१७॥

तुवां जे अलंकार टाकिले ॥ ते म्यां श्रीरामापुढें ठेविले ॥ रामें शोक केला ते वेळे ॥ तो मज सर्वथा न वर्णवे ॥१८॥

तुजकारणें सौमित्र ॥ दुःखभरित अहोरात्र ॥ जैशी मातेची वाट निरंतर ॥ बाळक पाहे प्रीतीनें ॥१९॥

ऐसा ऐकतां समाचार ॥ जानकीस दाटला गहिंवर ॥ म्हणे परम कृपाळू रघुवीर ॥ मजकारणें शिणतसे ॥१२०॥

अयोध्येहूनि येतां हनुमंता ॥ मी मागें राहें चालतां ॥ श्रीराम तरूखालीं तत्वतां ॥ उभे राहती मजकारणें ॥२१॥

बहु श्रमलीस म्हणोन ॥ राम कुरवाळी माझें वदन ॥ बोलतां सीतेसी आलें रुदन ॥ सद्रद होऊन स्फुदतसे ॥२२॥

जानकीस म्हणे हनुमंत ॥ आतां शोक करिसी किमर्थ ॥ सत्वर येईल रघुनाथ ॥ दखमुखासी वधावया ॥२३॥

तूं आदिपुरुषाची चिच्छक्ति ॥ प्रणवरूपिणी मूळप्रकृति ॥ तुझे आज्ञेनें वर्तती ॥ विरिंचि रुद्र इंद्रादि ॥२४॥

भक्त तारावया निर्धारीं ॥ दोघें अवतरलां पृथ्वीवरी ॥ आधीं वियोग दोघांभीतरीं ॥ जाहलाचि नाहीं तत्वतां ॥२५॥

यावरी भूमिजा बोले वचन ॥ तूं श्रीरामाचा विश्र्वासी पूर्ण ॥ तुजप्रति अंतरखूण ॥ राघवें काय सांगितली ॥२६॥

येरू म्हणे कैकयीगृहांतरीं ॥ ताटिकांतकें आपुले करीं ॥ तुज वल्कलें नेसविली निर्धारीं ॥ खूण साचार ओळखें ही ॥२७॥

ऐसें ऐकतां जनकदुहिता ॥ म्हणे सखया हनुमंता ॥ तूं श्रीरामाचा पूर्ण आवडता ॥ कोटिगुणें अससी कीं ॥२८॥

परी तूं दिससी सूक्ष्म ॥ ऐसेच असतील प्लवंगम ॥ तरी हें लंकानगर दुर्गम ॥ तुम्हां कैसें आटोपे ॥२९॥

ऐसें सीतेचें वचन ऐकिलें ॥ हनुमंतें भीमरूप प्रकट केलें ॥ मंदाराचळातुल्य देखिलें ॥ विशाळ रूप मारुतीचें ॥१३०॥

कीं महामेरुचि अद्भुत ॥ कीं राक्षस वधावया समस्त ॥ अवतरला प्रळयकृतांत ॥ वानरवेष धरोनियां ॥३१॥

ऐसा देखानि रुद्रावतार ॥ सीता म्हणे हा केवळ ईश्र्वर ॥ रामकार्यालागीं निर्धार ॥ अवतरला येणें रूपें ॥३२॥

हनुमंत म्हणे महासती ॥ हे लंका घालीन पालथी ॥ परी कोपेल त्रिभुवनपति ॥ आज्ञा दिधली नाहीं मज ॥३३॥

जगन्माते मंगळभगिनी ॥ मजहूनियां प्रतापतरणी ॥ ऐसे वानर किष्किंधाभुवनीं ॥ रामाजवळी आहेत ॥३४॥

जांबुवंत नळ नीळ रविकुमर ॥ रणपंडित प्रतापशूर ॥ काळासी शिक्षा करणार ॥ राघवासवें असती पैं ॥३५॥

सीता म्हणे हनुमंतासी ॥ एवढा सागर कैसा तरलासी ॥ येरू म्हणे मुद्रेनें अनायासीं ॥ आणिलें मज ऐलतीरा ॥३६॥

मार्गीं जाहले श्रम बहुत ॥ तुझे दर्शन हरले समस्त ॥ परी जाहलों असें क्षुधाक्रांत ॥ फळें येथें दिसती बहु ॥३७॥

परहस्त ज्यास स्पर्शित ॥ तें सर्वथा नेघें मी निश्र्चित ॥ आतां आज्ञा दीजे त्वरित ॥ निजहस्तें घेईन मी ॥३८॥

उपरी बोले श्रीरामललना ॥ समीर स्पर्शो न शके या वना ॥ साठी सहस्र राक्षस रक्षणा ॥ ठेविले येथें लंकेशें ॥३९॥

हनुमंत ऐकतां ते अवसरीं ॥ गडबडां लोळे धरणीवरी ॥ फळआहाराविण बाहेरी ॥ निघों पाहती प्राण माझे ॥१४०॥

अहा मध्येंच आलें मरण ॥ अंतरले रघुपतीचे चरण ॥ आतां सीताशुद्धि सांगेल कोण ॥ कौसल्यात्मजासी जाऊनियां ॥४१॥

सफळ वृक्ष देखोन दृष्टीं ॥ माझें चित्त होतसे कष्टीं ॥ ऐसें वाटतसे पोटीं ॥ वनचि अवघें सांठवावें ॥४२॥

ऐसें बोलतां हनुमंत ॥ क्षण एक पडला निचेष्टित ॥ नेत्र गरगरां भोवंडित ॥ मुख पसरी फळांलागीं ॥४३॥

ऐसें देखोनि ते वेळीं ॥ जगन्माता सद्रदित जाहली ॥ अहा म्हणोन धांविन्नली ॥ कुरवाळित कृपाकरें ॥४४॥

म्हणे कपींद्रा उठीं उठीं ॥ पडली फळें तरुतळवटीं ॥ तीं पाहोनि एक मुष्टी ॥ घेईं उदरतृप्तीपुरतींच ॥४५॥

बा रे वरी चढसी जाण ॥ तरी तुज माझी असे आण ॥ पडलीं फळें ती वेंचून ॥ उदरनिर्वाह करीं कां ॥४६॥

ऐसें सीता बोलतां वचन ॥ मारुति उठिला झडकरून ॥ चरण धरी धांवोन ॥ म्हणे प्रमाण आज्ञा तुझी ॥४७॥

मग जे वृक्ष करिती रामस्मरण ॥ सीतेवरी छाया केली सघन ॥ ते रामउपासक पूर्ण ॥ करी वंदन कपि त्यांतें ॥४८॥

जो रामउपासक निर्मळ ॥ त्यासी विघ्न करूं न शके काळ ॥ म्हणोनि अंजनीचा बाळ ॥ तरु ते सकळ रक्षीत ॥४९॥

जे तरु न करिती रामस्मरण ॥ तेच उपटिले मुळींहून ॥ भुजाबळें त्राहाटून ॥ उर्वीवरी झोडिले ॥१५०॥

N/A

References : N/A
Last Updated : April 10, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP