मार्च ६ - प्रपंच

महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे.

माझ्या निरूपणाचा तुम्हाला विसर पडतो म्हणूनच बरे आहे. एखादी गोष्ट चांगली आहे आणि ती मिळाली तर सुखप्रद होईल, ह्या गोष्टीची आटवण आसूनही आपण ती मिळवण्यासाठी प्रयत्न करत नाही, हे अगदी अयोग्य आहे. हे पापच आहे. जर आपल्याला समजलेच नाही तर ते करण्यात पाप नाही, परंतू समजूनही न करण्यात अत्यंत पाप आहे. खरे म्हणजे, प्रयत्न करणे आपल्या हातात आहे. आपण ऐकतो की, अंतकाळी जी मती तीच गती. मृत्यूसमयी जशी वासना त्याप्रमाणे आपल्याला पुनर्जन्म प्राप्त होतो; तेव्हा वासनेतच आपला जन्म आणि वासनेतच आपला अंत, असे असताना तिला दूर कशी करता येईल? एखादा मनुष्य काळा असेल तर त्याला काळेपण काही घालवता येत नाही; त्याप्रमाणे, वासना असणे हा मनुष्याचा एक सहज गुण आहे, तो त्याला पालटता येत नाही. तर मग आम्हाला वासनेतून कधीच मुक्त होता येणार नाही का? मनुष्याच्या ठिकाणी इतर प्राणीमात्रांपेक्षा जर काही वेगळे असेल तर चांगले काय आणि वाईट काय हे कळण्याची बुद्धी. आपण कळूनसवरूनही वासनेला, अहंपणाला आधार देतो, इथेच आपले चुकते. आपला अहंपणा इतका खोल गेला आहे की, आपल्याला हे सर्व माझेच वाटते: माझी बायको, माझी मुले, माझे घर, माझे माझे म्हणून किती सांगावे! त्या माझेपणामुळेच अहंभाव वाढीला लागून, सर्व काही आपल्या मनाजोगते, आपल्याला सुख देणारे, हवेसे वाटू लागते, आणि दुःख अगदी नकोसे वाटते. अर्थात जगात कोणालाच नुसते सुख मिळत नाही. असे असूनही अहंपणाला बळी पडून सुखाच्या लालचीने मनुष्य मरेपर्यंत बरीवाईट कृत्ये करीत असतो, आणि त्याप्रमाणे त्याची वासना बनत जाते. वासना म्हणजे अभिमान, म्हणजेच मीपणा. अशा रीतीने अहंपणाच जर वासनेचे मुळ अधिष्ठान आहे, तर तो नको का घालवायला? खरोखरच, मनुष्याचा अहंपणा इतका खोल मुरलेला आहे की, त्याचे निर्मूलन करायला तसेच सुक्ष्म अस्त्र पाहिजे. नामाइतके प्रभावी आणि सुक्ष्म अस्त्र दुसरे कोणतेच नाही. ते परमेश्वराच्या अगदी जवळचे आहे. परंतु एवढे असूनही आपण ते आवडीने, निष्ठेने घेत नाही. आम्हांला सर्वकाही समजते, परंतु नामस्मरण करण्याचा आळस आपल्यात भरलेला आहे; भगवंत कर्ता आहे असे अनुसंधान जो रात्रंदिवस ठेवील त्याचाच अहंकार जाईल हे ध्यानात ठेवून आपण भगवंताचे नाम घ्यावे.
मनाने भगवंताचे होणे हे भक्तीचे मर्म आहे. आपल्याला जे पाहिजे ते त्याच्याजवळ मागावे. मागितलेली वस्तू भगवंत देईल किंवा न देईल. वस्तू दिली तर बरेच झाले, पण आपण मागितलेली वस्तू भगवंताने दिली नाही तर ती देणे आपल्या हिताचे नव्हते असे खरे मनापासून वाटावे. ही भावना वाढवण्यासाठी, भगवंत दाता आहे असे लक्षात ठेवून शक्य तितके नामस्मरण करावे.

N/A

References : N/A
Last Updated : May 18, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP