मार्च ७ - प्रपंच

महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे.

लग्न करणे याला आपण सामान्यत: प्रपंच समजतो. लग्न ही फार पवित्र संस्था आहे. तिच्यामध्ये दोन जीवांचा उध्दार आहे. ज्याप्रमाणे गुरु आणि शिष्य यांचा संबंध असतो, म्हणजे दोघांचे मत एकच असते, त्यापमाणे पती आणि पत्नी यांचा संबंध असावा. पत्नी आपले सर्वस्व पतीला देते, यामध्येच खरे पवित्रपण आहे. लग्नाचा पवित्रपणा ज्या वेळी नाहीसा होईल, त्या वेळी आपल्या धर्माचा पायाच उखडला असे समजावे. आपली अशी समजूत असते की, लग्न केले तेव्हा सुख हे लागणारच. जे जे परमेश्वराने निर्माण केले ते माझ्या सुखासाठीच केले असे आपण म्हणतो. वास्तविक, एकच वस्तू ठेवली आणि ती सर्वांनी घ्यावी म्हटले, तर सर्वच एकट्याच्या हाती कशी येईल? बायको म्हणते, “ मी माहेरी सोळा वर्षे तपश्चर्या केली आणि आता यांच्या पदरात पडले, तेव्हा यांनी मला आता सुख द्यावे. ” पोरांना वाटते, “ आमची पुण्याई म्हणून यांना इतका पगार झाला, तेव्हा यांनी नाही का आमचे लाड पुरवू “ खरोखर, सुखाकरिताच प्रत्येकाची धडपड चाललेली असते; परंतु करे सुख कशात आहे हे कळूनसुध्दा, आपण डोळ्यांवर कातडे ओढून घ्यावे, त्याप्रमाणे तिकडे दुर्लक्ष करीत असतो. प्रपंचात सुख मिळावे म्हणून आपण जी चिकाटी धरतो, तिच्या एकचतुर्थांश चिकाटी जरी भगवंतासाठी आपण धरली तरी आपले काम भागेल. आनंदाच्या प्राप्तीसाठी आपण जे साधन आज करतो आहोत ते चुकीचे आहे. तात्पुरत्या सुखासाठी आपण आज धडपडत आहोत, त्यापासून दु:खच पदरात पडते. म्हणून तसे न करता, चिरकाल टिकणार्‍या सुखासाठी आपण काही तरी साधन करावे.
जगामध्ये प्रत्येक गोष्टीला बंधन आहे. प्रत्येकाचे नियम ठरलेले आहेत. त्या नियमांचे उल्लंघन करणे म्हणजे अनवस्था आणणे होय. त्याप्रमाणे कुटुंबामध्यें प्रत्येक माणसाचे कर्तव्य ठरलेले आहे. असे कर्तव्याचे वळण जिथे असते त्या घराला ‘ वळण आहे ’ असे म्हणतात. ज्या घरामध्ये वळण असते ते घर सुखी होईल. समजा, आपण एक घर बांधले, त्यामध्ये दरवाजे केले, भिंतीला खिडक्या केल्या, वर आढ्याला झरोके केले आता त्यांपैकी झरोक्यांनी विचार केला की, ‘ आम्ही का म्हणून लहान असावे? आम्ही दरवाज्यांइतकेच मोठे होणार ! ’ असे म्हणून ते दरवाज्यांइतके मोठे झाले; खिडक्यांनीही तोच विचार केला, आणि त्या सगळ्या दरवाज्यांइतक्या मोठ्या बनल्या; असे झाल्यावर त्या घराचे काय होईल? हे जसे योग्य नव्हे, तसे, ज्या घरामध्ये प्रत्येकजण आपलेच मत खरे म्हणतो, आणि जेथे वडील माणसांविषयी आदर नसतो, त्या घराचा विचका व्हायला वेळ लागत नाही.


References : N/A
Last Updated : May 18, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP