एप्रिल १ - संत

महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे.

आयुष्यात संगतीला फार महत्त्व असते. संगतीचा परिणाम विनासायास आणि बराचसा न कळत होत असतो. संतसंगती लाभणे ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. ती पूर्वपुण्याईमुळेच लाभते. ज्याच्याशी आपण संगत करावी, त्याचे गुणधर्म आपल्याला येऊन चिकटतात हे आपण पाहतो. समजा, काही लोकांनी इथे यायचे ठरविले. एकाने विचार केला की आपण पायीच जाऊ, दुसरा बैलगाडीने निघाला, तिसर्‍याने आगगाडीने प्रवास केला, तर चौथा मोटारने आला. सर्वजण जर एकाच ठिकाणाहून निघाले तर साहजिकच मोटारीने येणारा सर्वात लवकर पोहोचेल; म्हणजे ज्याच्याशी संगत केली त्या वाहनचे गुणधर्म त्याला विनासायास लाभले. संगतीची दुसरी गंमत अशी की, ज्याच्या संगतीत आपण जातो त्याच्यापुढे आपले कर्तृत्व लोप पावते. इथून पुष्कळ मुले शिक्षण घेऊन पुढे कुणी वकील झाले, तर कुणी डॉक्टर झाले. परत इथे आल्यावर त्यांनी इथल्या मुलींशी लग्ने केली. त्या मुली फारशा शिकलेल्या नसतील; परंतु वकिलाशी लग्न केलेली वकिलीणबाई झाली, डॉक्टरशी लग्न केलेली डॉक्टरीण झाली. असे जर देहाच्या संगतीने सामान्य माणसाचेही गुणधर्म आपल्यात येतात, तर सत्संगतीचा परिणाम किती होत असला पाहिजे ! आपण तिकीट काढून गाडीत बसतो. आपल्या शेजारी कोण येऊन बसेल ते आपल्या हाती नसते. तो विडी ओढणारा असला आणि आपल्याला धूर सहन होत नसला तरी नाइलाजाने तिथेच बसावे लागते. व्यसनी किंवा विषयी माणसाची संगत ही अशी तापदायक, घातक असते. उलट सत्पुरुषाची संगत ही उत्तम, लाभदायी ठरते. सत्संगतीपासून सदवासना आणि सदविचार प्राप्त होतात.
एखादा साधू बैरागी असेल, झाडाखाली बसला असेल. तो स्वत: उपाशी असेल तर त्याच्याकडे येणारी मंडळीही उपाशी राहतील. समर्थांकडे कुणी गेला तर ते म्हणतील, “ मी भिक्षेची झोळी घेतो, तूही घे; दोघेही भिक्षा मागून आणू, आणि जे मिळेल ते शिजवून खाऊ. ” पण संत गृहस्थाश्रमी असेल तर आपल्याकडे येणाराला तो वाटेल ते करुन खायला घालील. अन्नानुसार वासना बनते, म्हणून संताघरचे अन्न मागून घेऊन खावे. संताची देहाने संगती लाभणे सुलभ नाही. तो राहात असेल तिथून आपण लांब राहात असू; आणि जवळ राहात असलो तरी प्रपंच-कामधंद्यामुळे चोवीस तासांत त्याच्या सान्निध्यात कितीसे राहता येणार? मग देहसंगतीचा लाभ कितीसा मिळेल? तेव्हा नामाची संगत हीच सर्वांना सदासर्वकाळ लाभण्यासारखी उत्तम सत्संगत होय.

N/A

References : N/A
Last Updated : May 19, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP