एप्रिल २ - संत
महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे.
सत्संगती अती अपूर्व करणारी आहे. संतांची संगत दोन प्रकारे होऊ शकते. एक, संतांच्या देहाची; दुसरी, संतांनी सांगितलेले साधन करीत राहण्याची. यांपैकी पहिली, म्हणजे संताच्या देहाची संगती लाभणे फार कठीण आणि दुर्मिळ. कारण संत जरी खरा असला तरी त्याला ओळखणे कठीण असते, आणि पुष्कळदा त्याच्या बाह्य वागणुकीवरुन मनात विकल्प येण्याचा संभव असतो; आणि एखाद्या भोंदूशीच गाठ पडली तर त्याच्या संगतीपासून नुकसान हे ठरलेलेच. म्हणून पहिला, म्हणजे संताच्या देहाच्या संगतीचा मार्ग, हा पुष्कळदा धोक्याचा ठरण्याचा संभव असतो. दुसर्या मार्गाने जाण्यात, म्हणजे त्याने सांगितलेले साधन करण्यात, बिलकूल धोका नसतो; कारण खरा संत काय किंवा भोंदू साधू काय, कोणीही झाला तरी तो दुसर्याला सांगताना खरे आणि बरोबर असेल तेच सांगेल. तो भोंदू असला तरी, आपला भोंदूपणा लपविण्याकरिता, जे बरोबर असेल तेच सांगणे त्याला जरुर असते. साधकाने शुध्द भावनेने ते साधन केले की सत्संगतीचा फायदा मिळून त्याचे काम होते. खर्या संताच्या देहाच्या संगतीचा लाभ जर दैववशात प्राप्त झाला तर मात्र काम बेमालूम होते. ज्या वाहनाचा आपण आश्रय करतो त्या वाहनाचा वेग हा आपला वेग होतो; फक्त त्या वाहनात निश्चल बसून राहणे एवढेच आपले काम असते. तसे आपण खर्या संताजवळ नुसते पडून राहावे. संताच्या संगतीत आपली कृती अशी काहीच नसते, नुसते अस्तित्व असते. त्यामुळे अहंकाराला वाव न राहून वासनेचा क्षय व्हायला फार मदत होते. तुकाराम महाराजांनी देवाजवळ धनसंपदा मागितली नाही, मुक्तीदेखील नको असे म्हटले, फक्त संतसंगती दे असे म्हटले.
संतसंगाने नाम घेण्याची बुध्दी येते. बुध्दीची स्थिरता ठेवणे हे फक्त नामानेच साधेल. नाम जरुर तेवढे ठेवते आणि बाकीचे नष्ट करुन टाकते. पण अनन्यभावाने नाम घ्यावे. नाम घेता घेता बुध्दीला स्थिरता येते; आणि मग मनात विकल्प न येता संतांच्या देहाच्या संगतीचा खरा फायदा घेता येतो. सत्संगतीत कष्टाशिवाय ईश्वरप्राप्ती होते. संतसंगतीत साधने आपोआप होत असतात. त्यांच्या पूजनाबरोबर पूजन, भजनाबरोबर भजन, श्रवणाबरोबर श्रवण, स्मरणाबरोबर स्मरण आपोआप होते. सत्संगतीत स्वत:ची विस्मृती होते आणि नामस्मरण घडते. म्हणून प्रयत्नाने संतसंगती करावी. तिथे प्रारब्ध आणू नये. सत्संगतीत राहून नाम घेतले तर देहबुध्दीच्या कोंडीतून बाहेर पडता येते.
N/A
References : N/A
Last Updated : May 19, 2010
TOP