एप्रिल ३० - संत

महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे .


जोंवर धरिली जगाची आस । तोंवर परमात्मा दूर खास ॥ परमात्म्याची प्राप्ति । न होई राखता विषयासक्ति ॥ जग विषयाकार राहिले । तेथे प्रेम केले तरी घातासी आले ॥ विषयी एकजीव झालो जाण । सुटता न सुटे आपण जाण ॥ मान , अपमान , जगाचे सुख -दु :ख । हे स्वार्थाचेच मूळ आहे जाण ॥ अभिमानांत परमात्म्याचे विस्मरण । हें जीवपणाचें मुख्य लक्षण ॥ सुख -दु :ख , विपत्ति -आपत्ति , । ही माया प्रपंचाची ओहोटी भरती ॥ आत्मनिश्चय बाणल्यावांचून । माया न हटे न सुटे जाण ॥ आता करी शूर मन । मायेसी हटवावे आपण ॥ जैसें जैसें बाहेर दिसलें । त्याचें बीज आपणाशीच उरलें ॥ एकच वस्तूची ओळखण जाण । पूर्ण होते समाधान ॥ ज्याच्यांत मानावें मी सुख । त्याच्यातच उदभवतें दु :ख ॥ नराचा होय नारायण । जर न चुकला मार्ग जाण ॥ जेथे ठेवावी आस । त्याचे बनावें लागतें दास ॥ देह तो पंचभूतांचा । त्याचा भरवसा न मानावा फारसा ॥ मी तुम्हांस सांगतों हित । दृश्यांत न ठेवावें चित्त ॥ दृश्य वस्तु नाशिवंत असते । भगवत्कृपेने समाधान येतें ॥

परिस्थिति नसे बंधनास कारण । असे आपलेच मनाची ठेवण ॥ देवास पाहावें ज्या रीतीनें । तसाच तो आपणास दिसतो जाण ॥ विषयाचा नाही झाला जोंवर त्याग । तोंवर रामसेवा नाही घडत सांग ॥ आपलें आत्यंतिक हित । हेंच खरा स्वार्थ जाण ॥ चित्तीं जे विषयापासून सुटले । ते आनंदासी आले ॥ रामनाम प्रेमयुक्त चाले धणी । त्यासी म्हणती ब्रह्मज्ञानी ॥ द्रव्यदारावर्जित जाण । ही खरी संताची खूण ॥ सृष्टि पाहावी भगवदाकारी । प्रेम ठेवील त्याचेवरी । त्याला नाही दुसरी सरी ॥ आल्यागेल्यास द्यावे अन्नदान । मुखानें भगवंताचें नाम । ह्रदयांत रामाची प्रीति । यासच थोर म्हणती जीवन्मुक्ति ॥ न धरावी जगाची आस । तोच होऊ पाहे रामदास ॥ नामांत संत । नामीं भगवंत ॥ वृत्ति राखावी अत्यंत शांत । हेंच संताचें मुख्य लक्षण जाण ॥ जेथे भगवंताचें नामस्मरण । तेथे सर्व संतांचें ठाण ॥ अगरबत्ती जळून गेली । परि सुवासाने राहिली । तैसे रामचरणी झाले जे लीन । तेच खरे जिवंत जाण ॥ संतचरणीं झाला लीन । त्याला भाग्यास नाही दुजें उणें ॥ संताची संगति । भगवन्नामानें साधते ॥

N/A

References : N/A
Last Updated : May 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP