लक्ष्मणहंसाख्यान - जातकर्म व नामकर्म

श्रीमत्सद्‍गुरूहंसराजस्वामींची शिकवण म्हणजे मोक्षरूपी ध्येय गाठण्याकरितां श्रुति, युक्ति व अनुभूति यांच्या आधाराने साधकांच्या सोयीकरितां तयार करून दिलेली ज्ञानयोगाची सोपानपरंपराच आहे. 

अमूर्त परी सत्शिष्य कळवळे । मूर्तत्त्वाचे अतिशय डोहळे । गर्भादिहि दावीत सोहळे । माइकत्त्वें कडोनी ॥१॥

असो माधवरावाचिये सदनीं । गर्भ वाढे येसूबाइलागुनी । वाढता उत्साह होत अनुदिनीं । अन्नसंतर्पणादि ॥२॥

आसनीं शयनीं किंवा भोजनीं । सदा आनंदरुप येसूबाई मनीं । दुजा भावचि नसे काळीं कवणी । समाधानी पूर्णत्त्वें ॥३॥

काय आवडे पति पुसत । येरी बोले कीं काय अप्राप्त । जे जे जया क्षणीं भोग येत । ते ते तया क्षणीं आवडी ॥४॥

परी या जगामाजीं निश्चयात्मक । उरो न द्यावा एक याचक । अवघेचि करावे पुण्यश्लोक । तळमळ नसावीं कवणा ॥५॥

शोकवार्ता कोठें नसावी । आनंदें सृष्टि दुमदुमावी । कर्म ज्ञान उपासना चालावी । एकरुप सदा ॥६॥

आळस नसावा कवणासी । सावध असावें प्रयत्नासी । निर्विघ्न गुरु साह्यतेसी । सर्वत्रां असावा ॥७॥

ऐसें कांतेचें ऐकतां उत्तर । अंतरीं लोटला आनंदपूर । समाधिसुखें डुले निरंतर । म्हणे वंशध्वज उभारला ॥८॥

आमुचे वडिलावडिलांचें संचित । एकत्र होऊन अकस्मात । उदभवलें असे अनावरत । आकाशीं सूर्य जैसा ॥९॥

कीं हें ब्रह्म मूर्तिमंत । मायावशें आलें गर्भांत । कीं हें जगचि उद्वरील समस्त । ज्ञानदर्शनद्वारां ॥१०॥

धन्य धन्य हो भाग्य आमुचें । म्हणोनि निर्लज्ज होऊनि नाचे । मग मेळवून भार याचकांचे । अपार द्रव्य वांटी ॥११॥

प्रतिदिनीं ब्राह्मणसंतर्पण । तांबूल दक्षिणा वस्त्राभरण । ऐसें तृप्त केलें याचकजन । गुढ्या पताका उमविल्या ॥१२॥

मंगळ तुरे सदा वाजती । अवघी नगरी दुमदुमली अति । सुवासिनी सदना मिरवत येती । धूसुरे उधळती अपार ॥१३॥

प्रजेचींही उपायनें अनेक । येती तेही वांटिती सकळिक । ऐसा उत्साह होत्साता कौतुक । जन्मवेळ पातली ॥१४॥

उदंड स्त्रियांचा समुदाय मिळे । चतुर शहाण्या असती कुशळे । सर्वांचे येसूबाईकडे डोळे । कित्येक सन्निध बैसल्या ॥१५॥

परी बाळ कवणे रीती जन्मलें । हें कवणें नाहीं देखिलें । उगेंचि आकाशांतून उतरलें । कीं प्रगटलें भूमींतून ॥१६॥

अति सलक्षण तें बाळ । सूक्ष्मत्त्वें फांकतसे किळ । सोहंशब्देंचि अळुमाळ । रुदनहि जयाचें ॥१७॥

सर्वंही नारींचे मुखांतून । पुत्र झाला हेंचि निघतसे वचन । तेणें दुमदुमलें सर्व सदन । शब्द बाहेरी फांकतसे ॥१८॥

सर्व दासदासी स्वजन आप्त । माधवरायांसी सांगती वृत्तांत । ऐकतांचि भंडार फोडुनी समस्त । याचकां वांटितसे ॥१९॥

हें आपुलें कीं यजमानाचें । द्रव्य असे द्यावें कोणाचें । ऐसें किमपिही न संकोचे । तया आनंदामाजीं ॥२०॥

जाला एकचि जयजयकार । वाजती वाद्यांचे गजर । यंत्रेंहीं सुटताती अपार । लघु आणि दीर्घ ॥२१॥

ब्राह्मणसमुदाय मिळाला । माधवराया म्हणती आंत चला । पुत्रमुख पाहे वहिला । मंगळस्नान करोनी ॥२२॥

मग अति गजरेसी मंगलस्नान । करोनी पातले सर्व ब्राह्मण । पातले जेथें सूतिकासदन । सर्व समुदाय स्त्रियांचे ॥२३॥

दिव्य बैसते झाले आसनीं । सर्व ब्राह्मणही पृथकासनीं । तंव बाळ आणिती जाली उपजननी । तें अंकावरी घेतलें ॥२४॥

सुवर्णशलाकेनें मधबिंदु । मुखीं घालितां उठिला आनंदु । म्हणे या बिंदूनें परमानंदु । तृप्त होवो जगाचा ॥२५॥

मागुती बाळाच्या मुखाकडे । माधवराव पाहतसे कोडें । म्हणती सखया तुज नसे सांकडें । कांहीं परमार्थाचें ॥२६॥

परी माझिये संशय मनासी । कीं प्रपंच करुन परमार्थ चालविसी । कीं परमार्थचि नुसधा वाढविसी । हा निश्चय नव्हे ॥२७॥

अमृतरायजीपासून । मजपर्यंत जे पुरुष उत्पन्न । तेणें प्रपंच परमार्थ समसमान । चालविला यथान्यायें ॥२८॥

आतां तुझी क्रिया कैसी चाले हें अंतरीं न जाय कळलें । ऐसें ऐकतांचि किंचित बाळ हसलें । पाहोनी मुखाकडे ॥२९॥

त्या हसण्यांत सुचविलें इतुकें । जैसा अंत :करणी भाव कौतुकें । तैसेंचि घडेल निश्चयात्मकें । यथायुक्त रीतीं ॥३०॥

मग जातकर्म नामकर्म । करिते जाले अनुक्रम । लक्ष्मण हें आवडी ठेविलें नाम । तया चिमण्या बाळाचें ॥३१॥

इति श्रीमद्वंसगुरुपध्दति । ग्रंथरुपें ज्ञानाभिव्यक्ति । लक्ष्मणहंसाख्यान निगुती । द्वितीय प्रकरणीं ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : May 23, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP