लक्ष्मणहंसाख्यान - वसमतीस उद्योग

श्रीमत्सद्‍गुरूहंसराजस्वामींची शिकवण म्हणजे मोक्षरूपी ध्येय गाठण्याकरितां श्रुति, युक्ति व अनुभूति यांच्या आधाराने साधकांच्या सोयीकरितां तयार करून दिलेली ज्ञानयोगाची सोपानपरंपराच आहे. 

श्रीलक्ष्मणहंस अरण्यांत । एकट असतां सेवून एकांत । इकडे माधवरायांसी साद्यंत । समाचार कळला ॥१॥

कीं लक्ष्मणराय जोगी होऊन । गेला आपणांसी त्यागून । तेणें अतिशय शोक दारुण । करिती मातापिता ॥२॥

आणिकही मुलें जें कांहीं होते । तेही मरुनि गेले समस्ते । हेही मूल असतां एकुलतें । उठोनि गेलें ॥३॥

अम्हां भरंवसा अति होता । कीं प्रपंच परमार्थ चालवील उभयतां । हें कांहींच न घडोनि वन सेविता । कैसा झाला नेणो ॥४॥

जरी कोठें वार्ताही लागती । तरी तेथें जावोनि सत्त्वरगती । बोध करोनि सदनाप्रति । घेवोनि येतो ॥५॥

तंव वर्तमानही कळतें झालें । कीं मूल लक्ष्मादेवीपासीं बैसलें । मग निघोनि तया स्थळासी आले । विलोकिलें पुत्रासी ॥६॥

तंव ताताकडे नावलोकित । पाहोनीहि नेत्र लावोनि बैसत । तेव्हां पाचारोनि माधवराव म्हणत । कीं मज ओळखिसी कीं नाहीं ॥७॥

येरु बोले दुजे कांहीं असावें । तरी ओळखी अथवा नोळखावें । एक आत्माचि परिपूर्ण स्वभावें । तेथें तूं मी कोठें ॥८॥

माधवरायही ऐकोनि म्हणत । आत्मा तरी परिपूर्ण अनंत । परी व्यापार देहाचे केवी चालत । तूं मी ऐसें न म्हणतां ॥९॥

मी तात तूं अससी लेंकरु । जोंवरी दिसे हा आकारु । आत्मा एकरुप परी व्यवहारु । राहेल कैसा ॥१०॥

सोनें एक अलंकार । ओळखिलें जरी तरीही चाले व्यापार । चालतांही उणा अधिक प्रकार । सोनियासि कोणता ॥११॥

तंव लक्ष्मण बोले आकारु कैचा । अवघा बडिवार कल्पनेचा । कोण तात सुत रुपनामाचा । भाव जन्मला कधीं ॥१२॥

अज्ञानें न कळून होतें भाविलें । तें अज्ञान गुरुनाथें फेडिलें । आतां एकचि परब्रह्म उरलें । जें व्यापारशून्य ॥१३॥

इतुकें बोलुनि मौन्य धरिलें । मग माधवरायें मनीं विचारिलें । यासी पूर्ण ज्ञान नाहीं जालें । उगा निग्रहीं पडिला ॥१४॥

हा आमुचें आतां ऐकेना । तरी याचे गुरुसी आणावें ये क्षणा । नंतर तैसेंचि निघोनिया दर्शना । नागनाथांचें पातले ॥१५॥

हंसरायेंही सत्कार करोनि । बैसविले स्वकीयसन्निधानीं । तंव माधवराय बोलती वाणी । जी जी ज्ञान हें कैसें ॥१६॥

कांहीं व्यापारचि नसावे । उगें काष्ठप्राय पडावें । तेंचि ज्ञान मानेना स्वभावें । परपारदर्शिया ॥१७॥

कधीं जाली होती प्रवृत्ति । कीं आत्मयासी करणें निवृत्ति । ऐसें असतां जे गडदेंत पडती । ते मूर्ख कां न म्हणावें ॥१८॥

ऐसिया समर्थासी गांठी पडून । न वजाय जरी हें मूर्खपण । तरी हें प्रारब्ध जाणावें आडवें विघ्न । उभें राहिलें ॥१९॥

व्यापार निमतां आत्मा भेटे । आणि व्यापारांत आत्मा काय निवटे । ऐसें हें परम ज्ञान गोमटें । वाटे मजलागी ॥२०॥

इतुकें ऐकतां सिध्दांतवचन । उभयतां पडिलें आलिंगन । नागनाथ म्हणती हें सत्यचि वचन । परी मज ठाउके नाहीं ॥२१॥

कीं दिवाणजी अरण्यचि सेवोनी । बैसलें गडदेंत जावोनी । असो आतां विचार न करोनी । बैसला असे जरी ॥२२॥

तरी चलावें मीहि येतसे । पाहूं आग्रह जो धरिला मानसें । मग तयाचि क्षणीं उठोनि तैसें । उभयतांही आले ॥२३॥

भला भला म्हणोनि हंस बोलती । तंव एकाएकी देखिली गुरुमूर्ति । लक्ष्मणहंसें साष्टांग प्रीती । नमस्कार घातिला ॥२४॥

गुरु म्हणती कवणें सांगितलें । कीं अरण्यचि पाहिजे सेविलें । तंव दिवाणजी भीतभीत बोले । कीं व्यापारीं सुखदु :ख होतीं ॥२५॥

कांहीं उपाधि नसतां निवांत । ऐसें सुख मजसी असे प्राप्त । तस्मात ऐसेंच म्यां असावें स्वस्थचित्त । तरी समर्थे हेचि आज्ञा द्यावी ॥२६॥

बहु बरें म्हणती चाल ग्रामासी । सदगुरुआज्ञा होतांचि ऐसी । उठोनि म्हणे चलावें त्त्वरेसी । मग आले अंजनगांवा ॥२७॥

नागनाथहंस लक्ष्मणहंसांसी । बोलते झाले आदरेसी । तुझी मनवासना कैसी । सांगे मजप्रति ॥२८॥

तंव लक्ष्मण बोले कर जोडून । म्यां निवांत असावें एकांत सेवुन । अथवा सदा घडावें गुरुपादसेवन । याविण तिजें मज नको

॥२९॥

नको प्रपंच नको व्यापार । नलगे मीतूं आपपर । नको नको हें उपार्जन येर । परतंत्रत्त्वें ॥३०॥

नागनाथ म्हणती तुजलागी । अन्य उपाधि न ये उपेगी । तरी वस्त्रें घेउनी भिक्षा मग वेगीं । परी करि वडिलांची सेवा ॥३१॥

तंव दिवाणजी म्हणे माझिये बुध्दी । हेंही मज वाटतसे विरोधी । मठमठिका संस्थान करणें उपाधि । हा काय प्रपंच नव्हे ॥३२॥

जरी याचा त्याग घडे सांग । तरिच परमार्थ प्रतिष्ठे अभंग । नातरी जैसें नटाचें सोंग । वरी भगवें आंत फिकें ॥३३॥

तस्मात मज दुसरें न आज्ञापावें । एक निवांतचि करोनि ठेवावें । अथवा चरणाचें सेवनचि द्यावें । आमरणापर्यंत ॥३४॥

समर्थ म्हणती गुरुआज्ञा पालन । हें तो असे कीं तुज प्रमाण । नाहीं कोण म्हणे लक्ष्मण । परी गुरुसेवाच द्यावी ॥३५॥

मागुती म्हणती माधवराय । मीच कीं असे एकरुप अद्वय । तरी उठे करि सेवा जाय । हेचि आज्ञा आमुची ॥३६॥

बापाचें वचन नुल्लंघावें । तयाचें समाधान राखावें । यांत उणे सहसा न पडावें । आज्ञा हे मान्य करी ॥३७॥

तेव्हां तथास्तु म्हणोनि लक्ष्मण । सदगुरुचे वंदी चरण । सेवा करीन यथाविधीन । परी लग्न सहसा न करी ॥३८॥

तंव नागनाथ म्हणती भला जाय । सेवा करी सांडून संशय । प्रारब्ध असेल तैसें अचुक होय । न चुके कवणा ॥३९॥

नंतर माधवरायांसही सांगितलें । यासी घेऊन जावें वहिलें । मग निघोनि उभयतांही पातले । खोलापुरासी ॥४०॥

नागनाथ मनीं विचारिते झाले । कीं दिवाणजीसि तातासवें लाविलें । परी पूर्ण समाधान नाहीं बाणलें । सहजस्थितीचें ॥४१॥

असो पुढें होईल भेटी । तेव्हां बोध करुं उठाउठी । इकडें माधवराव म्हणे गा राहटी । आतां कैसी चालविसी ॥४२॥

मग म्हणती लक्ष्मणहंस । रोजगार करुं वडिलाचे हितास । आतां जातसों नागपुरास । आज्ञा मज द्यावी ॥४३॥

माधवराय म्हणती तिकडे ना जावें । आणि माझें मानस कीं लग्न व्हावें । येथें योजूनही आलेसें बरवें । आणि द्रव्यही असे ॥४४॥

तंव लक्ष्मणहंस बोलतसे गिरा । अन्य आज्ञा पाहिजे ती करा । परी मी लग्न सहसा न करी निर्धारा । हे सत्य सत्य वाणी ॥४५॥

नागपुरा न जावें म्हणिलें । तरी सर्वही देशा चला अपुले । हें वचन सर्वांसी मानलें । मग आले जवळिया ॥४६॥

तेथें कांहीं दिन राहिले । तंव तस्करें वस्त्रपात्र हरिलें । कांहीं द्रव्य होतें तेंही नेलें । जाले निष्कांचन ॥४७॥

पुढें संकट पडलें माध्यान्हाचें । कोठेंतरी जाताहि न वचे । तंव लक्ष्मणहंसांसी ज्येष्ठ गुरुबंधूंचें । दर्शन जालें ॥४८॥

तयाचें नाम राजाराम । तया हुरमुजी वस्त्रें भिक्षा मागणें हा नेम । ते उभयतां एकमेकां बोलती परम । कीं जाऊं जांबेसी ॥४९॥

ते जन्मभूमी समर्थांची । पहावी आवडी हे मनाची । जरी रोजगार लागला तुज तिकडेचि । तरी मग मंडळी नेऊं ॥५०॥

ऐसेंच माधवरायांसी पुसोनी । आले जांबेच्या सन्निधानीं । येउनि बैसले अस्तमानी । पंचवाटिकेमाजीं ॥५१॥

एकमेकां बोलत बैसले । तंव तेथें संस्थानचे संप्रदायी आले । तेणें भगवें वस्त्र हिरोनि नेलें । विचार कांहीं न करितां ॥५२॥

इकडे काकूबाई होती निजेली । तंव स्वप्नीं मारुतीची व्यक्ति आली । म्हणे माझी त्त्वां अमर्यादा केली । आणि ताडिली निजहस्तीं ॥५३॥

जागी होऊन विस्मित पाहत । तंव शिष्यानें वस्त्रें आणिलीं देखत । तया धि :कारुन पंचवटिकेस येत । आले कोण पाहूं तयां ॥५४॥

तंव ते उभयतांही स्वस्थ बैसले । खंति नाहीं वस्त्रें जरी नेलें । ऐसें देखतांचि साष्टांग घातले काकूबाईनें तेव्हां ॥५५॥

महाराज अपराध क्षमा करावा । नेणतां घडतां कोप न धरावा । नंतर उभयतांसिही स्वभावा । मठामाजीं आणिलें ॥५६॥

कांहीं काळ ठेवोनि घेतलें । पहिलीं वस्त्रें तो प्रार्थोनि दिधलें । आणिकही आवडीनें नूतन अर्पिलें । बहु शांतविलें दोघां ॥५७॥

नंतर तेथुनीहि निघोनी । आले असती वसमतीलागोनी । तेथें सायेरचें काम जालें तत्क्षणीं । लक्ष्मणहंसालागीं ॥५८॥

नंतर माधवराया समवेत । मंडळीं आणविली समस्त । आणिकही मिळालें बहुत गोत । खायालागी ॥५९॥

असो आतां पुढें कैसें कैसें । वर्तलें चिमणें बाळ बोलतसे । तेचि कथा श्रोतीं अति विश्वासें । ऐकती सादर ॥६०॥

इति श्रीमद्वंसगुरुपध्दति । ग्रंथरुपें ज्ञानाभिव्यक्ति । लक्ष्मणहंसाख्यान निगुती षष्ठ प्रकरणीं ॥६॥


References : N/A
Last Updated : May 23, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP