श्रोतीं असावें सावधान । लक्ष्मणहंसांचें हे कथन । बाळक वाढतसे अनुदिन । माधवरायाचें सदनीं ॥१॥
पंचवर्षे जालियावरी । पिता उत्साहें व्रतबंध करी । पुढें लग्न व्हावें जों निर्धारी । तों रोजगारा विघ्न आलें ॥२॥
राजेंद्रावरीच गर्दी जाली । तयाचे अश्रितांसी धरणी आली । तैनाती सीबंदी जे असे पहिली । तेणेंचि अटकाव केला ॥३॥
माधवरायांसी शहरासि नेलें । लक्ष्मणरायासी गढींत अटकाविलें । माधवराय अटकेंतून पळाले । राहिले गुप्त शहरांत ॥४॥
पत्र पाठविलें घराकडे । तेथोनि निघावें पाहोनि सवडे । मीहि निघून येईन तिकडे । परी निघावें हरप्रयत्नें ॥५॥
येसूबाईनें पत्र पाहोनी । विचार करिती झालीं मनीं । बाळ तरी अठकेंत अनुदिनी । तरी कैसें जावें ॥६॥
एक यवन जमादार । तो बहुता दिवसांचा असे मित्र । तयासी बोलावुनी समाचार । सर्वही सांगितला ॥७॥
तो म्हणे म्यां अन्न खादलें । तरी हें अवश्य कार्य करीन वहिलें । रात्र जालिया मंडळीस काढिलें । तेणें सर्वही घरिच्या ॥८॥
कांहीं कांहीं द्रव्य येसूबाई । घेती झाली तये समयीं । इतर संपत्ति ठायीच्या ठायीं । सर्व राहिली असे ॥९॥
असो जमादारें गढींतुनी । लक्ष्मणरायासी आणिलें काढोनी । ग्रामाबाहेर सर्वांसि आणुनी । मार्गस्थ केलें ॥१०॥
नंतर सर्व मंडळी समवेत । हयात नगरीं पातले रात्रींत । तेथें होते स्वकीय आप्त । तेथें एक दिन राहिले ॥११॥
तया आप्तमंडळीनें मिळोनी । सांगती मोंगलांईत न राहावें जनीं । आणि मंडळी लावावी फोडोनी । एकस्थानीं योग्य नव्हे ॥१२॥
नंतर सर्व मंडळी फोडिली । अपुलाले इच्छेनें लाविलीं । मुलें दोन आणि यशोदा उरली । आणिक एक दोन दासी ॥१३॥
उमरखेड श्रीमंताकडे असे । तेथें राहिले जावोनि अपैसे । तेथील कामदार तयाचे सहवासें । परी तेथेंहि विघ्न आलें ॥१४॥
मोंगलाचें पत्र आलें श्रीमंतासी । तेणें लिहिलें कामदारासी । कीं माधवरायांचे मंडळीसी । हवाली करुनि द्यावें ॥१५॥
तेणें येसूबाईकडे येउन । सांगितले सर्व वर्तमान । आजि रात्रिमाजीं करावें गमन । तेव्हां तयारी केली ॥१६॥
तों शहराहुन अस्तमानीं । माधवराव भिक्षुकवेष घेवोनी । आले भेटले सर्वांलागुनी । मग निघाले तयांसहित ॥१७॥
परी भिक्षुकाचे वेषें निघाले । माहुरप्रांतीं जवळियासि आले । तेथें किंचित्काळ असती राहिले । नामें आच्छादुनी ॥१८॥
तेथें नागनाथमहाराज । चिकणीहून आले सहज । दामोदरभारतीसहित समाज । असे संगें ॥१९॥
हंसरायें लक्ष्मणरायासी । बोलोनि घेतलें मांडियेसी । विचारोनि म्हणती निजमानसीं । आमुची ही प्रतिमा ॥२०॥
परी मानसींच गोष्टी ठेविली । लक्ष्मणाची हनुवटी कुरवाळली । शर्करा मुखामाजीं घातली । म्हणती गोड होसी ऐसाची ॥२१॥
मग हंसराय स्वइच्छा गेले । माधवरायही तेथोनि निघाले । नागपुरासन्निधान पावले । खोलापुरा ग्रामासी ॥२२॥
परी तेथेंहि असती आच्छादुनी । वरुती दाविती भिक्षुक म्हणुनी । होतें जें द्रव्य खाती मोडुनी । दुसरा उपाय नाहीं ॥२३॥
नाम प्रगटून रोजगार करावा । तरी मोंगल धरुन नेईल स्वभावा । आच्छादुन राहतां मिळावा । रोजगारही कैसा ॥२४॥
असो तेथील एक जमिनदार । तेणें ओळखिलें कीं हे असती थोर । जाणोनि घेतसे समाचार । आदरें स्वकीया ऐसा ॥२५॥
तेथें चिरकाल असती राहिले । पुढें काय जें वर्तलें वहिलें । अनुक्रमें चिमणें बाळ बोले । तें अवधारावें श्रोतीं ॥२६॥
इति श्रीमद्वंसगुरुपध्दति । ग्रंथरुपें ज्ञानाभिव्यक्ति । लक्ष्मणहंसाख्यान निगुती । तृतीय प्रकरणीं ॥३॥