श्रीलक्ष्मणहंसाचें वयासी । चवदा वर्षे जालीं मानसीं । विस्मय पावोनि बोले तातासी । जी परिसा विनंति माझी ॥१॥
तुम्हां प्रगट होता न ये । तरी प्रपंचनिर्वाह कैसा होय । मी करीन जाउनि कांहीं उपाय । मज आज्ञा द्यावी ॥२॥
तात म्हणे बापा खरें । ओळखीवीण कोण साचारे । नाम जरी प्रगटवावें त्वरें । तरी अनर्थ ॥३॥
मागुती लक्ष्मणराय बोलत । मजसि आज्ञा द्यावी त्वरित । प्रारब्ध तरी कळेल निश्चित । होणार तें होईल ॥४॥
तथास्तु म्हणुनि माधवरायानें । अश्व मनुष्य समागमें देणें । निघोनि मातापुरा केलें येणें । मागुती तेथुनी निघाले ॥५॥
अरणीपासीं जों पातले । तों तेथें एक नवल देखिलें । श्रीमंताचें सैन्य उतरलें । कामदार गणपतराव ॥६॥
वराडप्रांतीं राज्य श्रीमंताचें । जितुके असती तालोके साचे । काम सांगितले तितुकियाचें । तयाकडेसी ॥७॥
लक्ष्मणरायें तयाची भेटी । जावोनि घेतली उठाउठी । आपुलें संग्रही माझी जरी रोटी । असेल तरी द्यावी म्हणे ॥८॥
नूतन वय बोलणें चांगलें । पाहोनि अंतर तयाचें धालें । कळवळोनि निश्चयात्मक बोले । कीं तूं माझा ज्येष्ठ पुत्र ॥९॥
हे सर्वही संपत्ति थोरसान । तुझे असे हें सत्य माझें वचन । आणि सर्वत्रांसी आज्ञा करी जाण । कीं याचे आज्ञेंत रहावें ॥१०॥
आसन शयन आपणा ऐसे । वाहनही सिध्द आवडे ऐसें । वस्त्रालंकारहि दिधलें अपैसें । तेयेचि काळीं ॥११॥
तैसेंचि अंजनगांवासि आले । तेथील ठाणें हस्तगत केलें । इतर देशासी कामदार पाठविलें । राहोनि अंजनगांवीं ॥१२॥
सदर पेशकारिचें काम । लक्ष्मणरावाचा केला नेम । चारी मदतगारहि अनुक्रम । दिधलें हातातळीं ॥१३॥
तयांसी सांगितलें प्रीती । हा तुमचा यजमान निश्चिती । परी शिकवीत जावें ययाप्रति । लिहिणें मसलती सल्ल ॥१४॥
अल्पचि काळें हुशारी येतां । सर्वचि करुं लागे समस्ता । कारभार न अडेचि कोणता । तेव्हां तुष्टला यजमान ॥१५॥
असो गणपतरायें जाणोनी । द्रव्य पाठविलें खोलापुरालागुनी । पत्रही सत्कारें दिधलें लिहोनी । माधवरायासी ॥१६॥
मूल आम्हां सन्निधान असे । तुम्हीं चिंता करुं नये मानसें । तेणें संतोष अति जाला असे । म्हणे बाळें कुळ सांभाळिलें ॥१७॥
इकडे अंजनगांवी लक्ष्मणराय । कारभार चालवीत यथान्याय । तंव नागनाथमहाराज सहसमुदाय । तेथेंचि येवोनि राहिले ॥१८॥
लक्ष्मणराय प्रतिदिनीं दर्शना । जात असे भजनादि श्रवणा । एके दिनीं लक्ष्मणाचिये मना । अनुताप उदभवला ॥१९॥
म्हणे आपुला वंश रायजीपासून । परमार्थी तत्पर प्रपंचीं असून । मी काय प्रपंचाचेंचि आचरण । करिता जालों ॥२०॥
तातही माझा पूर्ण ज्ञानी । प्रपंचीं असोनि समाधानी । तयाचि क्षणीं मियां प्रार्थुनी । उपदेश नाहीं घेतला ॥२१॥
आतां वियोग जालासे ताताचा । पुन्हां संयोग केव्हां होय साचा । पुढें होय म्हणे तरी देहाचा । भरंवसा काय ॥२२॥
आतां जरी भेटीसी जावें । तरी यजमान पाठवितीना स्वभावें । आणि सन्निधानही ग्राम नव्हें । तरी करावें कैसें ॥२३॥
पूर्वापार बापाचाचि उपदेश । होत आला असे अशेष । घरींच संपत्ति असतां विशेष । बाहेरी कां फिरुं जावें ॥२४॥
तरी मी उपदेश घेईन बापाचा । परी दर्शन होय केधवां साचा । मज भरंवसा नसे घटिकेचा । तरी कैसें करावें ॥२५॥
अहा गुरुवर्या धांवे त्त्वरा । मज अनाथाचिये माहेरा । उपदेश करुनि ज्ञानद्वारां । मोक्षपदीं नांदवावें ॥२६॥
न सुचे कामधंदा भोजन । कवणासि नावडे भाषण । सर्वकाळ चित्त उदासीन । गुरुचा ध्यास अंतरीं ॥२७॥
कधीं भेटेल मज सदगुरु । केव्हां ब्रह्मज्ञान साक्षात्कारु । केव्हां गुरुसेवेचा प्रकारु । मज प्राप्त होय ॥२८॥
नलगे संपत्ति आणि स्वजन । नलगे स्त्रीपुत्र आदिकरुन । माझें मज केव्हां होय दर्शन । केव्हां अज्ञान नाशे ॥२९॥
नागनाथहंसांचें दर्शना जातां । येणेंच रीती राहे उदासता । तळमळ लागली असे जे चित्ता । ते ओळखिली समर्थे ॥३०॥
परी किमपिही नाहीं बोलिले । मनीं म्हणती पक्व होतां बहु भलें । आणि याचे चित्तासी दृढ असे झालें । कीं उपदेश घ्यावा बापाचा ॥३१॥
लक्ष्मणरावही क्षणभरी बैसोनी । पातले असती निजसदनीं । परी तळमळ जे लागली मनीं । ते तरी शांत नव्हे ॥३२॥
अगा गुरुराया सखया समर्था । धांव पाव मजसि अनाथा । बापाचें ध्यान करुं जाय तों नागनाथा । सन्मुख देखे ॥३३॥
मनामध्यें करी विचार । माझा गुरु तातचि हा निर्धार । परी नागनाथांचीच मूर्ति सत्त्वर । ध्यानीं कां येतसे ॥३४॥
मागुती तातासी आठवितां । महाराज दिसती घवघविता । कासाविसही होउनि पाहतां । मूर्ति न जाय परती ॥३५॥
तैसीच शयनीं निद्रा आली । तंव नागनाथहंसांची मूर्ति देखिली । येरु म्हणे मज ताताची अवस्था लागली । तरी ते कां उपदेश न करिती ॥३६॥
तंव एकाएकी माधवराव । येवोनि सांगति स्वयमेव । अरे मीच असे कीं एकभाव । नागनाथरुपें ॥३७॥
तरी तूं संशय सर्व टाकुनी । उपदेश घ्यावा प्रत्यक्ष जाउनी । तुज उपदेश नागनाथांवांचोनि । नव्हेल अन्याचा ॥३८॥
नागनाथहंसांची तूं प्रतिमा । येथें भेद नाहीं या नियमा । आतां विलंब न लावी हे बोलोनि वर्मा । गुप्त जहाले ॥३९॥
जागे होउनी स्वप्न आठवीत । विस्मयापन्न झालें चित्त । तेचि कथा चिमणें बाळ सांगत । पुढील प्रकरणीं ॥४०॥
इति श्रीमद्वंसगुरुपध्दति । ग्रंथरुपें ज्ञानाभिव्यक्ति । लक्ष्मणहंसाख्यान निगुती । चतुर्थ प्रकरणीं ॥४॥