अध्याय अठ्ठावीसावा - श्लोक १ ते ५०

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते .


श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

श्रीरामचरित्र अतिसुरस ॥ परिसतां अंतःकरणीं उल्हास ॥ सांडोनि आठव विसरास ॥ राममय जाहलें ॥१॥

रघुवीरमहिमा विशेष ॥ शोधावया धांविन्नले मानस ॥ तंव ते उन्मत्त होऊनि निःशेष ॥ राममय जाहलें ॥२॥

बुद्धि धांवली वेगेंकरून ॥ गणावया जगद्वंद्याचे गुण ॥ तंव ते बौद्धरूप होऊन ॥ राममय जाहली ॥३॥

तो चित्तास आला आवेश ॥ धणी भरी वर्णावया अयोध्याधीश ॥ तें चैतन्यरूप होऊनि विशेष ॥ राममय जाहलें ॥४॥

कास घाली अहंकार ॥ पावेन रामकथाब्धीचा पार ॥ तो ब्रह्मानंदीं बुडाला साचार ॥ निरहंकार होऊनियां ॥५॥

ऐकतां रघुनाथचरित्र ॥ श्रवण होऊनि ठेले चकित ॥ त्वचा आनंदमय होत ॥ इतर स्पर्श टाकूनियां ॥६॥

राम पहावया वेळोवेळीं ॥ चक्षूंनी घेतली आळी ॥ रसना आनंदें नाचों लागली ॥ रामचरित्र वर्णावया ॥७॥

रामचरणकमळींचा आमोद ॥ सेवावया घ्राण झालें मिलिंद ॥ एवं सर्व इंद्रियवृंद ॥ रघुनाथीं लीन जाहला ॥८॥

वक्ता म्हणे दश इंद्रियांतें ॥ जिव्हेसी भाग्य आलें अद्भुतें ॥ रघुपतीचें गुण वर्णीते ॥ ब्रह्मानंदें करूनियां ॥९॥

श्रोते म्हणती आमचे श्रवण ॥ दशइंद्रियांमाजी धन्य ॥ पुढें बोले कथानुसंधान ॥ युद्धकांड सुरस तें ॥१०॥

सत्ताविसावे अध्यायीं कथन ॥ रामें वधिला कुंभकर्ण ॥ उद्विग्न जाहला रावण ॥ तों वीर सहाजण उठिले ॥११॥

महापार्श्व आणि महोदर ॥ देवांतक नरांतक त्रिशिर ॥ अतिकाय राजपुत्र ॥ शक्रजिताचा कनिष्ठ बंधु ॥१२॥

घेऊनि चतुरंग सेना ॥ साही चालिले रणांगणा ॥ रणवाद्यें वाजती नाना ॥ ऐकतां मना भय उपजे ॥१३॥

महाद्वार उल्लंघून ॥ बाहेर निघाले साहीजण ॥ तों साही रथांवरी आणून ॥ शिरें टाकिली गृध्रांनीं ॥१४॥

ऐसा होतां अपशकुन ॥ मनीं विराले साहीजण ॥ परी वीरश्री नावरे पूर्ण ॥ वेगीं रणांगणीं पातले ॥१५॥

देखतां अमित्रांचे भार ॥ स्मरारिमित्रांचे उठिले वीर ॥ घेऊन पर्वत तरुवर ॥ समरांगणीं मिसळले ॥१६॥

राक्षसांचे झाले अस्थिपंजर ॥ क्षण माघारले असुर ॥ तंव तो नरांतक राजपुत्र ॥ तुरंगारूढ धांविन्नला ॥१७॥

अनिवार कपींचा मार ॥ बळें विदारिती वानर ॥ मृत्तिकाघटवत फोडिती शिर ॥ कीं पूगीफल चूर्ण केलें ॥१८॥

तो तुरुंग श्यामकर्ण ॥ क्षीरार्णवाचें हृदयरत्न ॥ कीं मुसेंत आटोनि चंद्रकिरण ॥ तुरंगोत्तम ओतिला ॥१९॥

कीं जान्हवीचे तोये घडिला ॥ कीं उच्चैःश्रव्याचा बंधु आला ॥ सुपर्णाहुन वेगें आगळा ॥ ऐसा प्रवेशला परदळी ॥२०॥

जैसी प्रळयविद्युल्लता ॥ तैसी झळके असिलता ॥ अलातचक्र जेवीं फिरतां ॥ दृष्टीं न दिसे कवणातें ॥२१॥

अश्व खर्ग क्षत्री पाहीं ॥ तिनी मिळाली एके ठायीं ॥ नरांतकें ते समयी ॥ ख्याति केली अद्भुत ॥२२॥

अठरा लक्ष ते क्षणीं ॥ वानर मारिले रणांगणी ॥ किंचित माघारले द्रुमपाणी ॥ तें अंगदें दुरोनि लक्षिलें ॥२३॥

अनिवार नरांतकाचा मार ॥ वानरवीर होतां समोर ॥ सहस्रांचे सहस्र ॥ घायासरिसे पाडितसे ॥२४॥

धांवे जैसा कृतांत ॥ तैसा पेटला वाळिसुत ॥ कीं वृक्षावरी अकस्मात ॥ सौदामिनी पडियेली ॥२५॥

तैसा अंगद अकस्मात आला ॥ कठोर पाणिप्रहार दीधला ॥ नरांतकाचा अंत जाहला ॥ अश्वासहित ते काळीं ॥२६॥

नरांतक पडतां चौघेजण ॥ अंगदावरी धांवले चहूंकडून ॥ महापार्श्व महोदर जाण ॥ देवांतक आणि त्रिशिर ॥२७॥

दोन पर्वत करी घेऊन॥ उभा ठाकला वाळीनंदन ॥ चौघांसी युद्ध करितां पूर्ण ॥ अंगद संकटीं पडियेला ॥२८॥

तंव ते धांवती तिघेजण ॥ वृषभ नळ वायुनंदन ॥ नळें पर्वतघायेंकरून ॥ महोदर रणीं मारिला ॥२९॥

देवांतकासमीप हनुमंत ॥ येऊन तयासी बोलत ॥ तुज देवांतक नाम सत्य ॥ कोण्या मूढें ठेविलें ॥३०॥

निर्नासिकासी नाम रतिकांत ॥ कीं जारासी नाम ब्रह्मचारी म्हणत ॥ कीं ज्याचें नांव आदित्य ॥ तो अंधारीं पडियेला ॥३१॥

जंबूक दृष्टी देखतां पळे ॥ त्यासी केसरी नाम ठेविलें ॥ दोनी नेत्र संकोच जाहले । कमळनेत्र नाम तया ॥३२॥

अमंगळानाम भागीरथी ॥ अनुसूया नाम जारिणीप्रती ॥ कीं बाळविधवेसी निश्चितीं ॥ जन्मसावित्री हे नाम ॥३३॥

कोरान्न मागतां न मिळे कण ॥ तयासी इंद्र नाम ठेविलें पूर्ण ॥ जया क्षीरसिंधु नामाभिधान ॥ परी तक्रही न मिळे प्राशना ॥३४॥

अजारक्षका नाम पंडित ॥ काष्ठवाहका नाम नृपनाथ ॥ की दरिद्रियासी नाम प्राप्त ॥ कुबेर ऐसें जाहलें ॥३५॥

जैसे अजागळींचे स्तन ॥ कीं मुखमंडण बधिरकर्ण ॥ गर्भांधाचे विशाळ नयन । तैसें जाण नाम तुझें ॥३६॥

वृषभासी सिंहासन ॥ श्वानासी अर्गजालेपन पूर्ण ॥ कीं दिव्यांबर परिधान ॥ जैसें उष्ट्रासी करविलें ॥३७॥

कनकवृक्ष धोत्रियासी म्हणती ॥ कीं चर्माचा केला हस्ती ॥ पक्षियासी भरद्वाज म्हणती ॥ देवातक तव नाम तैसें ॥३८॥

ऐसे बोलोनि वायुकुमर ॥ हृदयीं दिधला लत्ताप्रहार ॥ संपला देवांतकाचा संसार ॥ तों त्रिशिरा सत्वर धांविन्नला ॥३९॥

हनुमंतें वृक्ष घेऊन ॥ त्रिशिरा मरिला न लागतां क्षण ॥ ऋषभे पर्वत घेऊन ॥ महापार्श्व मारिला ॥४०॥

ऐसें अतिकाय देखोन ॥ सारथियासी म्हणे प्रेरीं स्यंदन ॥ सर्वांसी अलक्ष करून ॥ रामावरी धांविन्नला ॥४१॥

सहस्र घोडे ज्याचे रथी ॥ एके सूत्रें आंवरी सारथी ॥ अरुणासही न टिके गती ॥ नवल कपी करिती पैं ॥४२॥

अतिकायाचे स्थूळ शरीर ॥ इंद्रजिताऐसा प्रचंड वीर ॥ तया समोर जाहले पांच वानर ॥ पर्वत होती घेऊनियां ॥४३॥

गवय गवाक्ष कुमुद ॥ शरभ आणि पांचवा मैंद ॥ पर्वत टाकिती सुबुद्ध ॥ एकदांच ते काळीं ॥४४॥

अतिकायें सोडूनि बाण ॥ पर्वत टाकिले पिष्ट करून ॥ शरी खिळिले पांचही जण ॥ आरंबळत पडियेले ॥४५॥

बिभीषणासी पुसे रघुनंदन ॥ अहो हा आहे कोणाचा कोण ॥ येरु म्हणे रावणाचा नंदन ॥ नामाभिधान अतिकाय ॥४६॥

हा दिव्यरथ तेजागळा ॥ ब्रह्मदेव यासी दिधला ॥ हा अनिवार असे झाला ॥ पुरुषार्थ याचा अद्भुत ॥४७॥

हा कोणास नाटोपे पूर्ण ॥ तुम्हींच उठावें घेऊन धनुष्यबाण ॥ कीं पाठवावा उर्मिलाजीवन ॥ याचा प्राण घ्यावया ॥४८॥

काढिली चापाची गवसणी ॥ जेवीं निशांतीं प्रकटे तरणी ॥ कीं कुंडांतील महाअग्नि ॥ याज्ञिकें फुंकोनि चेतविला ॥४९॥

तों विनवी सुमित्रानंदन ॥ मी अतिकायासी युद्ध करीन ॥ अवश्य म्हणे सीताजीवन ॥ विजयी होई रणांगणी ॥५०॥

N/A

References : N/A
Last Updated : June 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP