अध्याय अठ्ठावीसावा - श्लोक १०१ ते १५०

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते .


उगवला नसतां वासरमणी ॥ औषधी आणाव्या त्वरेंकरूनि ॥ ऐसें ऐकतां तये क्षणीं ॥ मारुतात्मज आवेशला ॥१॥

क्षीराब्धीचे पैलतीरीं ॥ चार कोटी योजने दूरी ॥ मारुती म्हणे तृतीय प्रहरीं ॥ औषधी वेगीं आणितों ॥२॥

बिभीषणासी हनुमंत ॥ बोले होऊन सद्रदित ॥ जतन करावा रघुनाथ ॥ सौमित्रासहित जीवेंसी ॥३॥

ऐसे बोलोनि हनुमंत ॥ वेगें उडाला आकाशपंथ ॥ म्हणे यशस्वी अयोध्यानाथ ॥ शक्तिदाता होईं कीं ॥४॥

चपळ पणिद्वय चरण ॥ घेत उड्डाणावरी उड्डाण ॥ कीं क्षीराब्धीप्रति सुपर्ण ॥ वैकुंठींहून जातसे ॥५॥

लक्षून मानससरोवर ॥ मराळ झेंपावें सत्वर ॥ त्याचपरी अंजनीकुमर ॥ सप्तद्वीपें ओलांडी ॥६॥

सप्तसमुद्र ओलांडून ॥ द्रोणाचळाजवळी येऊन ॥ जनकजाशोकहरण ॥ उभा ठाकला ते वेळीं ॥७॥

अगस्ति सागराचें तीरी ॥ की त्रिविक्रम बळीचे द्वारीं ॥ कीं नृपाचिया भांडारी ॥ तस्कर जैसा संचरें ॥८॥

कीं तरूजवळी येऊनि ॥ उभा ठाकला कुठारपाणी ॥ कीं निधानापासी प्रीतिकरूनि ॥ सावध उभा ठाकला ॥९॥

असो कर जोडूनि हनुमंत ॥ द्रोणाचळातें स्तवित ॥ म्हणे तूं परोपकारी पर्वत ॥ पुण्यरूप नांदसी ॥११०॥

तुझें करितांचि स्मरण ॥ सकळ रोग जाती पळोन ॥ तरी शरजालीं रामलक्ष्मण ॥ इंद्रजितें पाडियेले ॥११॥

तूं जीवनदाता सत्य ॥ त्रिभुवनामाजी यथार्थ ॥ कीर्ति ऐकोनियां धांवत ॥ मी याचक आलों असें ॥१२॥

औषधी देऊनियां निर्मळ ॥ मज बोळवावें तत्काळ ॥ तंव तो प्रत्यक्ष मूर्तिमंत शैल ॥ बोलता जाहला कपीसी ॥१३॥

म्हणे मर्कटा आलासी कोठून ॥ कैंचा राम कैंचा लक्ष्मण ॥ देवांस औषधी दुर्लभ जाण ॥ तुज कोठून प्राप्त होती ॥१४॥

धरूनि माझा आश्रय ॥ मर्कटा तूं येथेंचि राहें ॥ त्यावरी तो राघवप्रिय ॥ काय बोलता जाहला ॥१५॥

म्हणे पाषाणहृदयी तूं द्रोण ॥ मंदबुद्धि मूढ मलिन ॥ कार्याकार्य तुजलागोन ॥ निर्दया कैसें समजेना ॥१६॥

वायसा काय मुक्ताहार ॥ मद्यपीयास काय तत्त्वविचार ॥ निर्दयासी धर्मशास्त्र ॥ सारासार समजेना ॥१७॥

मांसभक्षकास नुपजे दया ॥ हिंसकास कैंची माया ॥ उपरति पैशून्यवादिया ॥ कदाकाळें नसेचि ॥१८॥

कृपणासी नावडे धर्म ॥ जारासी नावडे सत्कर्म ॥ निंदकासी नावडे प्रेम ॥ भजनमार्ग कदाही ॥१९॥

कीर्तन नावडे भूतप्रेतां ॥ दुग्ध नावडे नवज्वरिता ॥ टवाळासी पैं तत्वतां ॥ तपानुष्ठान नावडे ॥१२०॥

तैसा तु अत्यंत निष्ठुर ॥ रामभजन नेणसी पामर ॥ तुज न लागतां क्षणमात्र ॥ उचलोनि नेतो लंकेसी ॥२१॥

शेषाकार पुच्छ पसरून ॥ द्रोणाचळ बांधिला आंवळून ॥ तत्काळचि उपडोन ॥ करतळीं घेऊन चालला ॥२२॥

उगवल्या असंख्यात सौदामिनी ॥ तैसा पर्वत दिसे दुरूनि ॥ कीं करी घेऊनियां तरणि ॥ हनुमंत वीर जातसे ॥२३॥

कीं सुधारसघट नेता सुपर्ण ॥ लीलाकमल उचली पूर्ण ॥ कीं सहस्रवदनें उर्वी उचलोन ॥ सर्षप्राय धरिली शिरीं ॥२४॥

कीं कनकताट द्रोणाचळ ॥ वल्ल्य़ा तेचि दीप तेजाळ ॥ पाजळूनियां अंजनीबाळ ॥ ओंवाळू येत रामातें ॥२५॥

चतुर्थ प्रहरीं ब्राह्मी मुहूर्ती ॥ सुवेळेसी आला मारुति ॥ तंव तो नूतनलंकापति ॥ सामोरा धांवे आनंदे ॥२६॥

तो सुटला शीतळ प्रभंजन ॥ चालिला वल्लींचा सुवास घेऊन ॥ त्या वातस्पर्शे रामलक्ष्मण ॥ सेनेसहित ऊठिले ॥२७॥

रजनी संपता तात्काळ ॥ किरणांसहित उगवे रविमंडळ ॥ तैसा राम तमालनीळ ॥ वानरांसमवेत ऊठला ॥२८॥

कोणाचे तनूवरी साचार ॥ घाय न दिसे अणुमात्र ॥ असो द्रोणाचळासी वायुपुत्र ॥ घेऊन मागुतीं उडाला ॥२९॥

लीलाकंदुक खेळे बाळ ॥ तैसा पर्वत झेली विशाळ ॥ पूर्वस्थळीं ठेवून तत्काळ ॥ सुवेळेसी पातला ॥१३०॥

देवांसहित शक्र बैसत ॥ तैसा कपिवेष्टित रघुनाथ ॥ सद्रद होवोनि हनुमंत ॥ रामचरणीं लागला ॥३१॥

जाहला एकचि जयजयकार ॥ प्रेमें दाटला रघुवीर ॥ हृदयी धरिला वायुकुमर ॥ तो न सोडीच सर्वथा ॥३२॥

स्कंदासी भेटे उमावर ॥ कीं इंद्रा आलिंगी जयंतपुत्र ॥ कीं संजीवनी साधितां पवित्र ॥ गुरु कचासी आलिंगी ॥३३॥

हनुमंताचें निजवदन ॥ क्षणक्षणां कुरवाळित रघुनंदन ॥ धन्य धन्य आजिचा दिन ॥ स्वामीगौरव लाहिजे तुवां ॥३४॥

श्रीराम म्हणे मारुतीसी ॥ सर्वांचा प्राणदाता तूं होसी ॥ सरली नाही जो निशी ॥ पर्वत तुवां आणिला ॥३५॥

बाळक होतां व्यथाभूत ॥ जनक जाऊनि औषधें आणित ॥ बा रे तैसेंच केले निश्चिंत ॥ प्रताप अद्भुत न वर्णवे ॥३६॥

ऐसें बोलता रघुनंदन ॥ सकळ कपी म्हणती धन्य धन्य ॥ स्वामीगौरवापुढें पूर्ण ॥ सुधारसपान तुच्छ पैं ॥३७॥

सुग्रीवादि कपी धांवती ॥ हनुमंतासी दृढ हृदयीं धरिती ॥ वानरांसी म्हणे किष्किंधापति ॥ यावरी काय पाहतां ॥३८॥

आतां लंकेवरी जाऊन ॥ सकळ सदना लावा अग्न ॥ अष्टदशपद्में वानर घेऊन ॥ नळ नीळ मारुति धांविन्नले ॥३९॥

गगनचुंबित तैलकाष्ठें ॥ कपींनी चुडी पाजळिल्या नेटें ॥ कीं ते रामभवानीचे दिवटे ॥ गोंधळ घालिती रणांगणी ॥१४०॥

चुडी घेऊनि समग्र ॥ भुभुःकारें गर्जविले अंबर ॥ जय जय यशस्वी रघुवीर ॥ म्हणोनी धांवती सर्वही ॥४१॥

लंकादुर्ग ओलांडून ॥ आंत प्रवेशले वानरगण ॥ तो अद्भुत सुटला प्रभंजन ॥ चुडिया लाविती एकसरें ॥४२॥

वायूचे अद्भुत कल्लोळ ॥ आकाशपंथें चालिली ज्वाळ ॥ लंकेमाजी हलकल्लोळ ॥ पळती लोक सर्व पैं ॥४३॥

धूर अद्भुत दाटलासे ॥ तेथे कोणा कोणी न दिसे ॥ ज्वाळा धांवती आवेशें ॥ लंका सर्व ग्रासावया ॥४४॥

कोट्यावधि घरें जळती ॥ राक्षस स्त्रियांसह आहाळती ॥ आळोआळीं उभे असती ॥ चुडी घेऊन वानर ॥४५॥

दृष्टीं देखतां रजनीचर ॥ चुडींनी भजिती वानर ॥ तो दशमुखासी समाचार ॥ दूत सत्वर सांगती ॥४६॥

हनुमंतें आणूनि द्रोणाचळ ॥ सजीव केले वैरी सकळ ॥ लंकेंत प्रवेशलें कपिदळ ॥ जाळिली सकळ मंदिरें ॥४७॥

मग जंघ प्रजंघ क्रोधन ॥ विरूपाक्ष शोणिताक्ष राजनंदन ॥ कुंभनिकुंभांप्रति रावण ॥ म्हणे धांवारे सत्वर ॥४८॥

सिद्ध करूनियां दळभार ॥ कुंभ निकुंभ धांवती सत्वर ॥ घालोनियां पर्जन्यास्त्र ॥ अग्नि समग्र विझविला ॥४९॥

जैसें कलेवर सांडोनि जाती प्राण ॥ तैसे लंकेबाहेर आले कपिगण ॥ रणभूमीसी सर्व मिळोन ॥ युद्धालागीं सरसावले ॥१५०॥

N/A

References : N/A
Last Updated : June 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP