अध्याय अठ्ठावीसावा - श्लोक ५१ ते १००

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते .


चाप चढवूनि सत्वर ॥ पुढें धांवे सुमित्राकुमर ॥ म्हणे रे अतिकाया तुझें स्थूल शरीर ॥ विटंबीन आजि घातें ॥५१॥

तुझे स्थूल सूक्ष्म देह दोन्ही ॥ शरें वेगळे करीन समरांगणी ॥ आतां लंकेत परतोनी ॥ कैसा जाशील माघारा ॥५२॥

कृतांताचियां मुखांत ॥ सांपडला राक्षस समस्त ॥ कुंजर गेला सिंहदरींत ॥ तो कैसा येईल माघारा ॥५३॥

काळें पाश घालूनि ॥ ओढून तुज आणिलें रणीं ॥ भुजंगाचे कवेतूनि ॥ मूषक कैसा जाईल ॥५४॥

अतिकाय म्हणे ते समयीं ॥ तूं वीर म्हणविशी पाहीं ॥ महाव्याघ्राचें सोंग पाही ॥ जंबुकें जैसे धरियेले ॥५५॥

नट नृप जाहला वेष धरून ॥ परी त्या न भीती कोणी जन ॥ वरी वैराग्य दावी पूर्ण ॥ अंतरीं मन तळमळीं ॥५६॥

अयोध्या सांडोनि लवलाहीं ॥ प्रारब्धे आणिलें ये ठायीं ॥ आतां कोणाचे पायीं ॥ जाल तुम्हीं येऊनियां ॥५७॥

स्वर्गी तुमचे पितृगण ॥ काय करिती तेथे बैसोन ॥ त्यांचा समाचार आणावया पाठवीन ॥ तुम्हांस आतां ये काळीं ॥५८॥

ऐसें ऐकोन अतिकायाचें वचन ॥ सौमित्र म्हणे सावधान ॥ आतां सांभाळीं माझे बाण ॥ तुझे प्राणहरते जे ॥५९॥

तों अतिकाय लोटी स्यंदन ॥ जो शतखणीं मंडित पूर्ण ॥ मित्रकरसंख्या वारू जाण ॥ श्वेतवर्ण योजिले ॥६०॥

सौमित्र सोडी पांच बाण ॥ नेणों पंच चपळा निघाल्या मेघांतून ॥ लंकेशपुत्रें देखोन ॥ योजिला बाण ते काळीं ॥६१॥

चापापासून सुटतां बाण ॥ तेणें पांच शर टाकिले खंडून ॥ मग सोडीत सहस्रबाण ॥ सुमित्रानंदन ते काळीं ॥६२॥

परम चपळ अतिकाया ॥ तितुके शर तोडी लवलाह्यां ॥ प्रळयमेघां परी गर्जोनियां ॥ सहस्र बाण सोडिले ॥६३॥

मग लक्षांचे लक्ष बाण ॥ सोडी सुमित्रानंदन ॥ कीं बाणांचाच पर्जन्य ॥ वर्षतसे ते काळीं ॥६४॥

तेथें गजमस्तकें विराजित ॥ मुक्तें त्याचि गारा उसळत ॥ शक्ति विद्युलता अद्भुत ॥ पूर वहात अशुद्धाचे ॥६५॥

तेथें शस्त्रें जाती वोसन ॥ प्रेतें वृक्ष जाती वाहोन ॥ वीरांचे हस्त विरोळे पूर्ण ॥ तळपताती ठायीं ठायीं ॥६६॥

वीरांचे दंत विखुरले बहुत ॥ तेचि वाळू असंख्यात ॥ खेटकें वरी तरत ॥ तेचि कूर्म जाणावे ॥६७॥

गजशुंडा वाहती ॥ तेचि नाडेसावजे तळपती ॥ असो ऐसी सौमित्रें केली ख्याती ॥ मान तुकाविती वानर ॥६८॥

बहुतास्त्रें नाना शस्त्रें ॥ सौमित्रावरी लंकेशपुत्रें ॥ टाकिलीं परी सौमित्रें ॥ छेदोनियां पाडिली ॥६९॥

मग सौमित्रें काढिला दिव्य बाण ॥ मुखीं ब्रह्मास्त्र स्थापून ॥ कल्पांतविजेसमान ॥ चापापासून सोडिला ॥७०॥

निमिष न लागतां साचार ॥ छेदिलें अतिकायाचें शिर ॥ झाला एकचि जयजयकार ॥ सुमनें सुरवर वर्षती ॥७१॥

बहुसाल आटिलें दळ ॥ लंकेत प्रवेशले घायाळ ॥ रावणापुढें सकळ ॥ समाचार सांगती ॥७२॥

सिंहासनारूढ रावण ॥ खालीं पडे मूर्च्छा येऊन ॥ मग इंद्रजितें धांवोन ॥ सांवरून बैसविला ॥७३॥

म्हणे माझीं साही निधानें गेली ॥ पुनः परतोन नाहीं देखिलीं ॥ अतिकायासारिखा बळी ॥ पाठिराखा तुझा गेला ॥७४॥

इंद्रजित म्हणे रायाप्रती ॥ होणार न चुके कल्पांतीं ॥ आतां युद्धासी जातो मी निश्चितीं ॥ शत्रुक्षय करावया ॥७५॥

चतुरंग दळेंसी झडकरी ॥ रणमंडळीं आला शक्रारी ॥ सेनादुर्ग ते अवसरी ॥ आपणाभोंवते रचियेले ॥७६॥

रक्तें करूनियां स्नान ॥ रक्तवर्ण वस्त्रें नेसून ॥ बिभीतकसमिधा आणोन ॥ सर्षपधान्यसंयुक्त ॥७७॥

रणमंडळीं केलें हवन ॥ आंतून निघाला स्यंदन ॥ धनुष्य तूणीर शस्त्रें पूर्ण ॥ सारथि अश्वांसमवेत ॥७८॥

त्या रथी बैसोन झडकरी ॥ मेघाआड गेला शक्रारी ॥ दुर्धर शर ते अवसरी ॥ वर्षता जाहला अपार ॥७९॥

ते बाण नव्हती संपूर्ण ॥ वर्षत विजांचा पर्जन्य ॥ शिरें आणि कर चरण ॥ कपींचीं तुटतीं तटतटां ॥८०॥

कोट्यनकोटी पडिले वानर ॥ जाहला एकचि हाहाकार ॥ एकाखालीं एक दडपती वीर ॥ परम दुस्तर ओढवलें ॥८१॥

एक पळावया योजिती ॥ तात्काळ कर चरण खंडिती ॥ रामसौमित्र तटस्थ पाहती ॥ अंगीं आदळती सायक ॥८२॥

धनुष्यें हातींची गळोनी ॥ रामसौमित्र तटस्थ पाहती ॥ अंगीं आदळती सायक ॥८२॥

धनुष्यें हातींची गळोनी ॥ रामसौमित्र पडले धरणीं ॥ लीलावतारी चापपाणी ॥ दाखवी करणी शत्रूची ॥८३॥

शतबाणें इंद्रजितें ॥ खिळिलें रामसौमित्रांतें ॥ पुराणसंख्या बाणीं अर्कजातें ॥ विंधोनि भूमी पाडिलें ॥८४॥

शास्त्रसंख्याबाणी ॥ गंधमादन पाडिला रणीं ॥ रविसंख्येनें धरणीं ॥ ऋषभ मैंद पाडिले ॥८५॥

चंद्रकळासंख्या बाणीं नीळ ॥ सागर संख्यें ऋक्षपाळ ॥ स्कंदमुखसंख्येनें नळ ॥ प्रेतवत पाडिला ॥८६॥

ऋत्ववर्धदिवससंख्याबाणी ॥ अंगद पाडिला समरांगणीं ॥ गवय गवाक्ष शरभ तीनी ॥ संवत्सरसंख्यांनीं खिळिलें पैं ॥८७॥

सोडून कळासंख्याबाण ॥ खिळिला दधिमुख पावकलोचन ॥ विद्यासंख्या सायक पूर्ण ॥ सुषेणावरी घातले ॥८८॥

रुद्रनेत्रसंख्या टाकून शर ॥ खिळिले गज केसरी वानर ॥ हेमकूट गौरमुख वीर ॥ युगसंख्यांनीं खिळियेले ॥८९॥

सुमुख दुर्मुख ज्योतिमुख ॥ यांवरी अवतारसंख्यासायक ॥ वरकड वानर जे असंख्य ॥ ते बाणसंख्यांनीं खिळियेले ॥९०॥

ऐसा करूनियां अनर्थ ॥ खालीं उतरे इंद्रजित ॥ जयवाद्यें वाजवित ॥ लंकेमाजी प्रवेशला ॥९१॥

परम हर्षयुक्त रावण ॥ पुत्रासी देत आलिंगन ॥ म्हणे माझा प्रताप वाढविला पूर्ण ॥ तुवां एकें पुत्रराया ॥९२॥

असो वानर पडिले सर्व ॥ परी दोघे उरले चिरंजीव ॥ बिभीषण हनुमंत बलार्णव ॥ प्रियप्राण राघवाचे ॥९३॥

दोघे अत्यंत म्लानवदन ॥ स्फुंदस्फुंदोनि करिती रुदन ॥ म्हणती काळ कैसा कठिण ॥ आतां विचार कोण करावा ॥९४॥

अस्ता गेला वासरमणी ॥ प्रर्वतली घोर रजनी ॥ मग चुडिया पाजळोनि ते क्षणीं ॥ रण शाधूं निघालें ॥९५॥

महावृक्ष उन्मळले ॥ तैसे ठायीं ठायीं वीर पडले ॥ रण घुमत असे ते वेळे ॥ दोघेजण देखती ॥९६॥

तंव तो वीर जांबुवंत ॥ पडलासे आरंबळत ॥ मग तया सांवरूनि हनुमंत ॥ बैसविता जाहला ॥९७॥

जांबुवंत बोले वचन ॥ या चराचराचा निजप्राण ॥ तो सुखी असे की रघुनंदन ॥ अनुजासहित सांग पां ॥९८॥

स्फुंदस्फुंदोनी सांगे बिभीषण ॥ निचेष्टित पडले रामलक्ष्मण ॥ त्याचपरी सकळ सैन्य ॥ प्राणहीन पडलें असे ॥९९॥

मग बोले ऋक्षपाळ ॥ कोणी आणील द्रोणाचळ ॥ तरी त्या वल्लीसुवासें सकळ ॥ वीर आतां उठतील ॥१००॥

N/A

References : N/A
Last Updated : June 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP