अध्याय एकतीसावा - श्लोक १ ते ५०

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते .


श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

जो रणरंगधीर रघुवीर ॥ रविकुळमंडण राजीवनेत्र ॥ रजनीचरांतक ॥ रमणीयगात्र ॥ राजेश्वर रमापति ॥१॥

आत्माराम अयोध्यानाथ ॥ आनंदरूप अक्षय अव्यक्त ॥ परात्पर अमल नित्य ॥ आद्य अनंत अनादि जो ॥२॥

जो कर्ममोचक कैवल्यदानी ॥ करुणासमुद्र कार्मुकपाणी ॥ बंधच्छेदक कल्मष जाळूनी ॥ करी कल्याण भक्तांचें ॥३॥

परमानंदा पुराणपुरुषा ॥ पद्मजातजनका पयोनिधिवासा ॥ पंकजनेत्रा परमहंसा ॥ पशुपतिहृदयजीवना ॥४॥

मनमोहना मंगलधामा मंगलधामा ॥ मुनिजनहृदया मेघश्यामा ॥ मायातीता मनविश्रामा ॥ मानववेषधारका ॥५॥

दीनदयाळा दशरथनंदना ॥ दशमुखांतका दुष्ट दलना ॥ दानवरिपुदरिद्रच्छेदना ॥ दशावतारवेषधारका ॥६॥

तिसावे अध्यायीं अनुसंधान ॥ सुलोचना प्रवेशली अग्न ॥ यावरी विंशतिनयन ॥ चिंताक्रांत शोक करी ॥७॥

बंधु पुत्र पडिले रणीं ॥ आतां पाठिराखा न दिसे कोणी ॥ तों विद्युज्जिव्ह ते क्षणीं ॥ प्रधान बोलता जाहला ॥८॥

म्हणे अहिरावण महिरावण ॥ पाताळीं राहती दोघेजण ॥ ते कापट्यविद्येंकरून ॥ राम सौमित्रां नेतील ॥९॥

कालिकापुढें तत्काळीं ॥ समर्पितील दोघांचे बळी ॥ ऐसें ऐकतां दशमौळी ॥ परम संतोष पावला ॥१०॥

रावणें पत्र पाठविलें लिहून ॥ तत्काळ प्रकटले दोघेजण ॥ कीं ते कामक्रोधचि येऊन ॥ अहंकारासी भेटले ॥११॥

त्या दोघांसी अलिंगून ॥ मयजापति करी रुदन ॥ इंद्रजिताचें वर्तमान ॥ दोघांप्रति निवेदिलें ॥१२॥

यावरी ते दोघे बोलत ॥ आतां गत शोक ते बहु असोत ॥ सौमित्र आणि रघुनाथ ॥ रजनीमाजी नेऊं तयां ॥१३॥

मग वरकड सेनेचा संहार ॥ करावया तुम्हां काय उशीर ॥ ऐकतां दशकद्वयनेत्र ॥ परम संतोष पावला ॥१४॥

तों बिभीषणाचे दोघे प्रधान ॥ गुप्तरूपें गोष्टी ऐकून ॥ तिहीं पवनवेगें जाऊन ॥ कथिलें रावणानुजासी ॥१५॥

तेणें नळ नीळ जांबुवंत ॥ मारुतीयांसी केलें श्रुत ॥ हनुमंतें पुच्छदुर्ग अद्भुत ॥ सेनेभोंवतां रचियेला ॥१६॥

वेढियावरी वेढे घालूनी ॥ वज्रदुर्ग उंचविला गगनीं ॥ वरी ठायीं ठायीं द्रुमपाणी ॥ गात बैसले सावध ॥१७॥

निशा गहन ते काळीं ॥ कीं काळपुरुषाची कांबळी ॥ कीं जगावरी खोळ घातली ॥ अज्ञानाची अविद्येनें ॥१८॥

निशीमाजी पक्षी बहुत ॥ वृक्षीं नानाशब्द करित ॥ रिसें वडवाघुळें तेथ ॥ लोळकंबती शाखेवरी ॥१९॥

भूतें आणि यक्षिणी ॥ गोंधळ घालिती महावनीं ॥ महाज्वाळरूप दावूनी ॥ गुप्त होती अप्सरा ॥२२॥

स्मशानीं मातले प्रेतगण ॥ भयानक रूपें दारुण ॥ छळिती अपवित्रालागोन ॥ पवित्र देखोनि पळती ते ॥२१॥

पिंगळे थोर किलबिलती ॥ भालवा दिवाभीतें बोभाती ॥ चक्रवाकांचे शब्द उमटती ॥ टिटवे बोलती ते वनीं ॥२२॥

कुमुदीं मिलिंद मिळती सवेग ॥ मस्तकमणी निघती उरग ॥ निधानें प्रकटली सांग ॥ येऊं म्हणती सभाग्या ॥२३॥

असो ऐसी निशा दाटली थोर ॥ तों पातले दोघे असुर ॥ दुर्गावरी गर्जती वानर ॥ मार्ग अणुमात्र दिसेना ॥२४॥

असुरकरीं तीक्ष्ण शूळ ॥ फोडू पाहती दुर्ग सबळ ॥ तों शूळ मोडले तत्काळ ॥ कोट अचळ वज्राहूनी ॥२५॥

मग ते ऊर्ध्वपंथे उडोनी ॥ दुर्गमर्यादा ओलांडूनी ॥ जेथें निजले लक्ष्मण कोदंडपाणी ॥ उतरले तेथें अकस्मात ॥२६॥

तों कनकहरिणचर्मावरी ॥ निद्रिस्थ दोघे लीलावतारी ॥ कीं शिव आणि विष्णु शेजारीं ॥ अवनीवरी निजेले ॥२७॥

आधींच निद्रासुख घन ॥ वरी राक्षसें घातलें मौन ॥ शय्येसहित उचलोन ॥ मस्तकीं घेऊन चालिले ॥२८॥

तेथेंच कोरिलें विवर ॥ लांब योजनें सप्त सहस्र ॥ सप्त घटिकेत यामिनीचर ॥ घेऊन गेले दोघांसी ॥२९॥

पुढें तेरा सहस्र योजन ॥ दधिसमुद्र ओलांडून ॥ तेथें महिकावती नगर पूर्ण ॥ लंकेहूनि विशेष ॥३०॥

काम क्रोध दोघेजण ॥ आत्मयासी घालिती आवरण ॥ तैसे निशाचरीं रामलक्ष्मण ॥ सदनीं दृढ रक्षिले ॥३१॥

नगरमध्यभागीं देऊळ ॥ एकवीस योजनें उंच सबळ ॥ तें भद्रकालीचें मुख्य स्थळ ॥ महाविशाळ भयानक ॥३२॥

असो दधिसमुद्रतीरीं जाण ॥ वीस कोटि पिशिताशन ॥ मकरध्वज बलाढ्य पूर्ण ॥ दृढ रक्षणा ठेविला ॥३३॥

महिकावतींत रामलक्ष्मण ॥ निद्रिस्थ आणि वरी मोहन ॥ त्यावरी नागपाशीं बांधोन ॥ बैसती रक्षण अहिमही ॥३४॥

असो हकडे सुवेळेसी जाण ॥ काय जाहलें वर्तमान ॥ निशी संपतां चंडकिरण ॥ उदयाचळा पातला ॥३५॥

घ्यावया रघुनाथदर्शन ॥ समस्त पावले वानरगण ॥ तों शय्येसहित पूर्ण ॥ दोन्ही निधानें न दिसती ॥३६॥

तंव देखिलें भयानक विवर ॥ घाबरे पाहती वानर ॥ सुग्रीवादिक कपी समग्र ॥ गजबजिले देखोनियां ॥३७॥

मग पाहती वानर ॥ तों द्वादश गांवें पाय थोर ॥ असुरांचे उमटले भयंकर ॥ रघुवीर भक्त पाहती ॥३८॥

या चराचराचें जीवन ॥ जें कमलोद्भवाचें देवतार्चन ॥चोरीं चोरिलें म्हणोन ॥ हृदय पिटी सुग्रीव ॥३९॥

सकळ वानर तैं आक्रंदती ॥ धरणीवरी अंगें घालिती ॥ एक नाम घेऊनि हाका फोडिती ॥ धांव रघुपते म्हणोनियां ॥४०॥

जगद्वंद्या राजीवनेत्रा ॥ कां उबगलासी आम्हां वानरां ॥ तूं परात्पर आदिसोयरा ॥ कोठें गेलासी उपेक्षोनि ॥४१॥

तों बिभीषण आला धांवोन ॥ म्हणे स्थिर असा अवघे जण ॥ ही गोष्ट जातां बाहेर पूर्ण ॥ येईल रावण युद्धासी ॥४२॥

रामाविण सेना समग्र ॥ जैसें प्राणाविण शरीर ॥ तरी फुटों न द्यावा समाचार पुढें विचार करा आतां ॥४३॥

पिंडब्रह्मांड तत्त्वांसहित ॥ शोधी जैसा सद्रुरुनाथ ॥ मग वस्तु निवडी शाश्वत ॥ सीताकांत शोधा तैसा ॥४४॥

कीं धुळींत हारपलें मुक्त ॥ झारी निवडी सावचित्त ॥ कीं वेदांतींचा अर्थ पंडित ॥ उकलोनियां काढी जेवीं ॥४५॥

कीं समुद्रीं पडले वेद ॥ ते मत्स्यरूपें शोधी मुकुंद ॥ तैसा सीताहृदयाब्जमिलिंद ॥ शोधोनियां काढावा ॥४६॥

तुम्हीं रघुपतीचे प्राणमित्र ॥ भगीरथप्रयत्न करूनि थोर ॥ तुमचा प्रतापरोहिणीवर ॥ निष्कलंक उदय पावूं द्या ॥४७॥

तुमचे भाग्यासी नाहीं पार ॥ सुखरूप आहे वायुकुमर ॥ तो क्षणमात्रें रघुवीर ॥ काढील आतां शोधूनियां ॥४८॥

मग मारुतीपुढें वानर ॥ घालिती कित्येक नमस्कार ॥ म्हणती तुजविण रघुवीर ॥ ठायीं न पडे सर्वथा ॥४९॥

रामप्राप्तीसी कारण ॥ तूं सद्रुरु आम्हांसी पूर्ण ॥ कामक्रोध अहिमही निवटून ॥ आत्माराम दाखवीं ॥५०॥

N/A

References : N/A
Last Updated : June 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP