पुर्वीं सीताशुद्धि केली पाहीं ॥ आतां रामासी पाडीं ठायीं ॥ ऐसें ऐकतां ते समयीं ॥ राघवप्रिय बोलत ॥५१॥
म्हणे न लागतां एक क्षण ॥ विरिंचिगोळ हा शोधीन ॥ बंधुसहित सीतारमण ॥ सुवेळेसी आणितों ॥५२॥
मग म्हणे सुग्रीवा बिभीषणा ॥ तुम्ही रक्षावी कपिसेना ॥ विजयश्रियेसी अयोध्याराणा ॥ असुर निवटूनि आणितों ॥५३॥
नळ नीळ अंगद जांबुवंत ॥ घेऊनि प्रवेशे विवरांत ॥ सात सहस्र योजनें तेथ ॥ अंधकार घोर पैं ॥५४॥
चौघे कासाविस होऊन ॥ मार्गीं पडिले मूर्च्छा येऊन ॥ मग ते मारुतीनें बांधोन ॥ आणिले उचलोनि बाहेरी ॥५५॥
लागतांचि शीतळ पवन ॥ सावध झाले चौघेजण ॥ प्रकाश देखोनियां नयन ॥ उघडिते जाहले ते काळीं ॥५६॥
तंव वीस कोटी राक्षस घेऊन ॥ मकरध्वज बैसला रक्षण ॥ मग पांचही वेष पालटून ॥ कावडी होऊनि चालिले ॥५७॥
तंव दटाविती असुर तयांतें ॥ कोठें रे जातां येणेंपंथें ॥ येरू म्हणती जातों तीर्थातें ॥ महिकावती पाहावया ॥५८॥
अंतरिक्ष करोनि उड्डाण ॥ घेऊं कालिकेचें दर्शन ॥ ऐसें ऐकतांचि वचन ॥ सर्व राक्षस क्षोभले ॥५९॥
सबळ दंड उचलून ॥ कपींसी करिती ताडण ॥ मग हनुमंतें पायीं धरून ॥ मारिलें आपटून तत्काळीं ॥६०॥
ऐसें देखतां विपरीत ॥ राक्षस धांवले समस्त ॥ प्रतापरुद्र हनुमंत ॥ जैसा कृतांत क्षोभला ॥६१॥
असंख्यात कुंजरभारीं ॥ प्रवेशती पांच केसरी ॥ तैसे पांचांनीं ते अवसरीं ॥ राक्षस सर्व मारिले ॥६२॥
वीस कोटी पिशिताशन ॥ पांच वीरीं भारे बांधोन ॥ पृथ्वीवरी आपटून ॥ समुद्रांत भिरकाविले ॥६३॥
तो मकरध्वज धांवोन ॥ भिडला मारुतीसीं येऊन ॥ मुष्टिप्रहारें करून ॥ एकमेकांसीं ताडिती ॥६४॥
सप्त पाताळें दणाणत ॥ परम क्षोभला हनुमंत ॥ हृदयीं देऊनि मुष्टिघात ॥ मकरध्वज पाडिला ॥६५॥
वक्षस्थळीं मारुती बैसोन ॥ म्हणे तुज आतां सोडवील कोण ॥ येरु म्हणे अंजनीनंदन ॥ जवळी नाहीं ये काळीं ॥६६॥
तो जरी येतां धांवोन ॥ तरी तुज करता शतचूर्ण ॥ तोचि माझा पिता जाण ॥ ऐकोनि मारुती शंकला ॥६७॥
मग तयासी हातीं धरून ॥ म्हणे सांग कैसें वर्तमान ॥ ब्रह्मचारी हनुमंत पूर्ण ॥ तूं सुत कैसा जाहलासी ॥६८॥
मीच हनुमंत रुद्रावतार ॥ तूं म्हणवितोसी माझा कुमर ॥ सांगाती हांसती साचार ॥ सांग प्रकार कैसा तो ॥६९॥
येरू म्हणे लंकादहन ॥ करून येतां वायुनंदन ॥ स्वेदें शरीर संपूर्ण ॥ ओलावलें ते काळीं ॥७०॥
तो स्वेद निपटोन ॥ कपाळींचा टाकिला जाण ॥ तो समुद्रीं पडतां मगरीनें ॥ गिळिला तोचि मी जन्मलो ॥७१॥
ऐसा वृतांत सांगूनी ॥ पुत्रें मस्तक ठेविला चरणीं ॥ तों मगरी आली धांवोनी ॥ वल्लभासी पहावया ॥७२॥
म्हणे स्वरूप दिसतें लहान ॥ जेव्हां केलें लंकादहन ॥ त्याकाळींचे स्वरूप पूर्ण ॥ प्रकटून संशय फेडावा ॥७३॥
मग भीमरूप धरिलें ते क्षणीं ॥ मगरी लागली दृढ चरणीं ॥ म्हणे चिंता न करावी मनीं ॥ अयोध्यानाथ सुखी असे ॥७४॥
अहिमही कपटी दोघेजण ॥ घेऊनि आले रामलक्ष्मण ॥ उदयीक देवीपुढें नेऊन ॥ बळी समर्पितील दोनप्रहरां ॥७५॥
आपण देऊळांत जाऊन ॥ बैसावें गुप्तरूपेंकरून ॥ ते स्थळीं रामलक्ष्मण ॥ भेटतील तुम्हांसी ॥७६॥
ऐसें ऐकतां सीताशोकहरण ॥ बोलता जाहला संतोषोन ॥ म्हणे असुरांतें बधोन ॥ तुझा नंदन स्थापीन त्या स्थळीं ॥७७॥
येरी म्हणे महिकावती ॥ नगर ॥ त्रयोदश सहस्र योजनें दूर ॥ आडवा समुद्र दुस्तर ॥ तरी विचार माझा एक ऐका ॥७८॥
तुम्ही पांचही बलवंत ॥ बसावें माझे वदननौकेंत ॥ महिकावतीस नेऊन त्वरित ॥ पुढती आणीन या स्थळीं ॥७९॥
नळ नीळ अंगद जांबुवंत ॥ ऐकतां जाहले भयभीत ॥ म्हणती मगरमिठी अद्भुत ॥ भक्षील उदकांत नेऊनियां ॥८०॥
तरी मारुति ऐके वचन ॥ आम्हीं रक्षितो हें स्थान ॥ तुजवांचोनि सिंधुलंघन ॥ सर्वथा नव्हे कोणासी ॥८१॥
मग तेथें उभा राहोन ॥ हनुमंतें चिंतिले श्रीरामचरण ॥ जय यशस्वी श्रीराम म्हणोन ॥ अकस्मात उडाला ॥८२॥
मनोवेगें हनुमंत ॥ आला तेव्हां महिकावतींत ॥ एकवीस दुर्गे रक्षकांसहित ॥ कोणासी नकळत ओलांडिलीं ॥८३॥
अणुरेणूहूनि लहान ॥ जाहला सीताशोकहरण ॥ भद्रकालींचे देवालय देखोन ॥ आंत संचरला ते काळीं ॥८४॥
कापट्य अनुष्ठानें बहुत ॥ राक्षस करिती देउळांत ॥ मद्य मांस विप्रप्रेत ॥ पूजनासी ठेविलें ॥८५॥
भ्रष्ट शास्त्रें काढिती ॥ एकासी एक वचन देती ॥ ऐसें करितां मोक्षप्राप्ती ॥ प्रमाण ग्रंथी लिहिलें असे ॥८६॥
ऐसें ऐकतां रामभक्त ॥ म्हणे यांसी कैसा मोक्ष प्राप्त ॥ आतां कपाळमोक्ष त्वरित ॥ पावती हस्तें माझिया ॥८७॥
असो देवालयीं जाऊनि महारुद्र ॥ देवी उचलोनि सत्वर ॥ नाहाणींत टाकूनि द्वार ॥ दृढ झांकिलें हनुमंते ॥८८॥
वज्रकपाटें देऊनी ॥ आपण बैसला देवीस्थानीं ॥ सर्वांग शेंदूर चर्चूनी ॥ जाहला भवानी हनुमंत ॥८९॥
देवी मारुतीकडे पाहात ॥ तो भयानक रूप दिसे बहुत ॥ जैसा हरिणीचे गृहांत ॥ महाव्याघ्र प्रवेशला ॥९०॥
तों येरीकडे असुर बहुत ॥ षड्ररस अन्नांचे पर्वत ॥ पूजासामुग्री अद्भुत ॥ घेऊनि अहिमही तेथें पातले ॥९१॥
तों वज्रकपाटें दिधली ॥ ती न उघडती कदाकाळीं ॥ एक म्हणती देवी क्षोभली ॥ म्हणूनि स्तुति करिताती ॥९२॥
ऐसा लोटला एक मुहूर्त ॥ तों रुद्ररूपिणी आंत बोलत ॥ म्हणे धन्य तुम्ही भक्त ॥ बळीसी रघुनाथ आणिला ॥९३॥
लंकेपुढें बहुतांचे प्राण ॥ मींच घेतले सत्यवचन ॥ तुमचें करावया भोजन ॥ येथें साक्षेपें पातलें ॥९४॥
माझें रूप बहुत तीव्र ॥ पाहतां जातील तुमचे नेत्र ॥ तरी पाडूनि गवाक्षद्वार ॥ पूजा आधीं समर्पा ॥९५॥
ऐसें देवी बोले आंतूनी ॥ अहिमही हर्षले ते क्षणीं ॥ म्हणती धन्य आम्हीं त्रिभुवनीं ॥ भक्तशिरोमणी दोघेही ॥९६॥
मग देउळमस्तकी विशाळ ॥ गवाक्ष पाडिलें तत्काळ ॥ पंचामृताचे घट सजळ ॥ स्नानालागीं ओतिले ॥९७॥
तों मुख पसरूनि हनुमंत ॥ घटघटां प्राशी पंचामृत ॥ पाठीं शुद्धोदक ओतीत ॥ प्रक्षाळिलें मुख तेणें ॥९८॥
धूप दीप वास ते समयीं ॥ देवीस म्हणे हे तूं घेईं ॥ सवेंच म्हणे भक्तां लवलाहीं ॥ नैवेद्य झडकरी येऊं द्या ॥९९॥
मग भरोनि विशाळ पात्रें ॥ अन्न ओतिती एकसरें ॥ जय जय देवी म्हणोनि गजरे ॥ असुर सर्व गर्जती ॥१००॥