सव्य अपसव्य हस्तेंकरूनि ॥ स्वाहा करीत रुद्ररूपिणी ॥ जैसा दवाग्नि चेतला वनीं ॥ तो नाना -काष्टें भक्षीत ॥१॥
पंचभक्ष्य परमान्न ॥ बहुत रंगाचें ओदन ॥ शाखा लवण शाखा आणोन ॥ असंख्यात रिचविती ॥२॥
दधि दुग्ध घृत नवनीत ॥ यांचे पाट सोडिले बहुत ॥ जैशा वर्षाकाळीं सरिता धांवत ॥ समुद्रासी भेटावया ॥३॥
पुजारे लोहदंडें घेउनी ॥ मोकळी करिती तेव्हां नाहाणी ॥ प्रसाद बाहेर यावा म्हणोनी ॥ प्रयत्न करिती बहुसाल ॥४॥
तंव तेथें देवी बैसली भयभीत ॥ तिजवरी लोहदंड आदळत ॥ ती म्हणे संकट बहुत ॥ मज येथें ओढवलें ॥५॥
असुरीं आणिले दशरथसुत ॥ नैवेद्य ग्रासितो हनुमंत ॥ मज ताडण होय येथ ॥ कोणासी अनर्थ सांगा हा ॥६॥
असो नाहाणी मोकळी करिती असुर ॥ परी कांहींच नये बाहेर ॥ म्हणती आजि देवीनें समग्र ॥ ग्रासिलें हाचि निर्धार पैं ॥७॥
वृद्ध वृद्ध असुर बोलत ॥ कैंची देवी मांडिला अनर्थ ॥ इहीं चोरूनि आणिला रघुनाथ ॥ बरवा अर्थ दिसेना ॥८॥
रावणें चोरिली सीता सुंदर ॥ तेथें अकस्मात आला एक वानर ॥ तेणें नगर जाळूनि समग्र ॥ केला संहार बहूतांचा ॥९॥
तैसेंच मांडले येथ ॥ ऐसें बोलोनि बुद्धिवंत ॥ निजस्थानासी त्वरित ॥ जाते जाहले ते काळीं ॥११०॥
असो इकडे अन्नाचे पर्वत ॥ ओतितां असुर भागले समस्त ॥ परी देवी नव्हेच तृप्त ॥ पुरे न म्हणे सर्वथा ॥११॥
मग घातलें शुद्ध जळ ॥ सवेंचि अर्पिले तांबूल ॥ तेव्हां हाक फोडूनि प्रबळ ॥ रुद्ररूपिणी बोलतसे ॥१२॥
म्हणे मी तुष्टल्यें आजि पूर्ण ॥ तुम्हांसी अक्षयपद देईन ॥ तुम्ही आणि लंकापति रावण ॥ करीन समान दोहींचें ॥१३॥
माझी प्रसन्नता लवलाह्या ॥ आतांच येईल प्रत्यया ॥ ऐसे शब्द देवीचे परिसोनियां ॥ शहाणे चालिले गृहासी ॥१४॥
देवी म्हणे याउपरी ॥ राम सौमित्र आणा झडकरी ॥ सगळेचि घाला देवळाभीतरीं ॥ याउपरी कौतुक पहा ॥१५॥
सच्चिदानंद रघुवीर ॥ ज्याचिया स्वरूपा नाहीं पार ॥ जो वेदशास्त्रांसी अगोचर ॥ त्यास गिळीन सगळाचि ॥१६॥
ऐसे शब्द देवीचे ऐकोन ॥ हर्षले अहि मही दोघेजण ॥ वीस असुर चालिले घेऊन ॥ रामलक्ष्मण आणावया ॥१७॥
रविकुळींचीं निधानें दोन्ही ॥ ठेविलीं नागपाशीं आकर्षूनी ॥ तीं सोडोनियां ते क्षणीं ॥ रथासी दृढ बांधिले ॥१८॥
मग काढिलें मोहनास्त्र ॥ सावध जाहले रामसौमित्र ॥ राजीवाक्ष उघडी नेत्र ॥ तों सभोंवते असुर दाटले ॥१९॥
श्रीराम सौमित्रासी बोले ॥ बा रे शत्रूंनीं आपणांसी आणिलें ॥ आमचें धनुष्य बाण हिरोनी नेलें ॥ रथीं बांधिलें दृढ आम्हां ॥१२०॥
जानकीसारिखें चिद्रत्न ॥ गेलें दुःखसागरी बुडोन ॥ भरत त्यागील आतां प्राण ॥ हें वर्तमान जातांचि ॥२१॥
कौसल्या सुमित्रा दोघीजणी ॥ प्राण देतील ऐकतांक्षणीं ॥ वसिष्ठादि महामुनी ॥ दुःखचक्रीं पडतील ॥२२॥
बिभीषण सुग्रीव हनुमंत ॥ नळ नीळ अंगद जांबुवंत ॥ माझे प्राणसखे समस्त ॥ प्राण देतील ऐकतां ॥२३॥
देव समस्त बंदीं पडले ॥ त्यांचे धैर्यदुर्ग आजि खचले ॥ क्षुधित पात्रावरूनि उठविलें ॥ तैसें झालें देवांसी ॥२४॥
आतां असावें धैर्य धरून ॥ जरी संकटीं पावेल उमारमण ॥ तरी हें क्षणमात्रें विघ्न ॥ निरसोनि जाईल सौमित्रा ॥२५॥
जो साक्षात रुद्रवतार ॥ तो आमुचा हनुमंत साचार ॥ येथें जरी पातला सत्वर ॥ तरी असुर संहरितां ॥२६॥
साक्षात शेष नारायण ॥ अवतारी पुरुष रामलक्ष्मण ॥ समयासारिखें वर्तमान ॥ दाविती खूण जाणिजे ॥२७॥
असो राक्षसीं रामसौमित्र ॥ रथीं बांधिले दृढ सत्वर ॥ सिंधूरवर्ण पुष्पहार ॥ गळां घातले तेधवां ॥२८॥
वरी उधळिती शेंदूर ॥ पुढें होतसे वाद्यांचा गजर ॥ नग्न शस्त्रें करून समग्र ॥ असुर हांका फोडिती ॥२९॥
चालविले तेव्हां मिरवत ॥ तंव नगरलोक आले समस्त ॥ पहावया श्रीरघुनाथ ॥ एक चढती गोपुरी ॥१३०॥
देखतां दोघे सुकुमार ॥ लोकांसी न धरवे गहिंवर ॥ नेत्रीं स्रवों लागलें नीर ॥ हाहाकार जाहला ॥३१॥
नरनारी आक्रंदत ॥ एकचि वर्तला आकांत ॥ चरचर जीव समस्त ॥ पाहूनि रघुनाथ शोक करिती ॥३२॥
तीन प्रदक्षिणा करून ॥ देउळीं आणिले दोघेजण ॥ देवीचीं कपाटें उघडून ॥ आंत लोटोनि दीधले ॥३३॥
कपाटें देऊन पुढती ॥ राक्षस गोंधळ घालिती ॥ हातीं दिवट्या घेऊनि नाचती ॥ मद्य प्राशिती उन्मत्त ॥३४॥
इकडे देउळांत रामलक्ष्मण ॥ पाहाती देवीसी विलोकून ॥ तंव तिणें पसरिलें वदन ॥ मुख जैसे काळाचें ॥३५॥
हाक दिधली भयंकर ॥ म्हणे तुम्ही दोघे राजपुत्र ॥ तुम्हांसी गिळिन सत्वर ॥ तरी स्मरण करा कुळदैवत ॥३६॥
तुमचा प्राणसखा असेल पाहीं ॥ त्यासी चिंतावें देहांतसमयीं ॥ यावरी तो जनकजांवई ॥ काय बोलता जाहला ॥३७॥
जरी अनर्थी पडिले भक्त ॥ तरी माझें स्मरण करीत ॥ तो मी आजि रघुनाथ ॥ संकटीं स्मरूं कोणासी ॥३८॥
तरी माझिया प्राणांचा प्राण ॥ जिवलग सखा वायुनंदन ॥ तो असतां तरी विघ्न ॥ कदा न लागतें आम्हांसी ॥३९॥
आतां मारुतिऐसा स्नेहें विशेष ॥ माये तूंचि करी कां आम्हांस ॥ कीं जननी पाळी बाळकांस ॥ प्रीति बहुत धरूनियां ॥१४०॥
ऐकतां रघुपतीचें वचन ॥ कपीचे नेत्रीं लोटलें जीवन ॥ स्फुंदस्फुंदोनि वायुनंदन ॥ धरी चरण रामाचे ॥४१॥
तेणें नयनोदकेंकरून ॥ प्रक्षाळिले रामचरण ॥ मग तो सीताशोकहरण ॥ रूप आपुलें प्रकट करी ॥४२॥
दृष्टीं देखतां हनुमंत ॥ प्रेमें दाटला रघुनाथ ॥ उठोनि हृहयीं आलिंगित ॥ काय दृष्टांत देऊं येथें ॥४३॥
कवींनी तर्क केले बहुत ॥ परी त्या सुखास नाही दृष्टांत ॥ पाठिराखा कैवारी भक्त ॥ मारुतीऐसा नव्हेचि ॥४४॥
मारुतीस म्हणे रघुवीर ॥ म्यां घेतले अनंत अवतार ॥ तुझे न विसरे उपकार ॥ कल्पांतींही हनुमंता ॥४५॥
तुझिया उपकारा नाहीं भिती ॥ काय काय आठवूं मारुती ॥ असो यावरी उर्मिलापती ॥ हनुमंतासी भेटला ॥४६॥
श्रीराम म्हणे हनुमंता ॥ कैसा शत्रु वधावें आतां ॥ येरू म्हणे तुम्ही चिंता ॥ न करावी कांही मानसी ॥४७॥
तुम्ही मागें असा लपोन ॥ एकेक असुर बोलावून ॥ तयांचीं शिरें छेदून ॥ करीन चूर्ण येथेंचि ॥४८॥
राम म्हणे माझे धनुष्यबाण जरी देशील आणून ॥ तरी हे असुर संहारीन ॥ क्षणमात्र न लागतां ॥४९॥
तंव बोले वायुनंदन ॥ मी मारीन अहिरावण ॥ मग कपाटें उघडोन ॥ महिरावण वधा तुम्ही ॥१५०॥