आर्या
त्वत्मायेने मोहित झालो मुकलो निजस्वरुपा की ॥
सिद्धारुढा तारी संसारार्णवि दया करुनि लोकी ॥४३॥
स्वामी मलयगिरी पर्वतावरुन खाली उतरत असता एका गुहेत सोमेश्वर नावाचा ब्राह्मण त्यांना भेटला . तो कुक्कुटनाथकल्प , पर्वतकल्प , वगैरे कल्पांतील मूलिकारसवाद , आकर्षण , स्तंभन , वगैरे गुटिकासिद्धि , पादुकासिद्धि , वश्याकर्षण , इत्यादि क्षुद्रसिद्धिदायक व्यभिचारकर्मे ह्या लोकी खर्या सुखासारखी पण परलोकी महदूःखदाय अशी क्षुद्रशास्त्रे , जाणणारा होता . त्याला पाहून अवधूत म्हणाले , हे काय करितोस ? तू ब्राह्मण असून अशी क्षुद्रशास्त्रे पहातोस ? आपला धर्म सोडून परधर्माची इच्छा करितोस ? यामुळे आपल्या धर्मापासून भ्रष्ट होशील ; लोकाची दुषणे मात्र तुला मिळतील ; या क्षुद्राच्या अध्ययनाने पूर्ण पुण्याई असलेल्या मनुष्यास सिद्धी साध्य होतात असे सांगितले आहे . याकरिता पुण्य करण्यात तत्पर असावे . ग्रंथाच्या भ्रांतीत पडू नये . शिवाय तुझ्या स्वधर्मात हरिनाम उच्चारण्याने सर्व फले प्राप्त होतात . असे आहे मग , हा खटाटोप करणे बरोबर नाही . त्याप्रमाणे श्रौत स्मार्त कर्माच्या फळाने परलोकी गेले रीत पुण्यक्षीण झाल्यावर मृत्युलोकी यावयाचेच . असली वेदोक्त कर्मे जर जीवांना जननमरणादी दुःखदायक होतात , तर तू करतोस ही क्षुद्र कर्मे किती दुःखदायक होतील ? याचा विचार कर . तेव्हा ब्राह्मण म्हणाला , या शास्त्राचे धर्म सांगणाराने अशा प्रकारचे दुःख प्राप्त होईल असे आम्हाला सांगितले नाही . म्हणून आम्ही हे शास्त्र शिकण्यास प्रवृत्त झालो . अवधूत म्हणाले , तू मार्ग न विचारता , आडमार्ग धरणार्या गुरुची परीक्षा न करता त्यास शरण गेलास ही तुझीच चूक , त्याची नव्हे . आता ह्या दोषाचा परिहार होण्याला उपाय कोणता ? असे त्याने विचारिले तेव्हा एका अक्षराला हजार याप्रमाणे चोवीस हजार गायत्री मंत्र जप केल्यास सर्वदोषपरिहार होऊन धर्मबुद्धी होऊन अंतःकरण शुद्धी होईल . असे सांगितल्यावर त्या ब्राह्मणाने ती पुस्तके टाकून दिली व स्वामीस नमस्कार करुन उभा राहताच स्वामींनी धन्य आहेस , असा त्यांस आशीर्वाद दिला .
तेथून निघून पुष्कळ गावे , शहरे , खेडी , नद्या वगैरे ओलांडून त्या त्या गावी मुलाबरोबर खेळत , प्राप्त झालेली दुःखे सहन करीत मध्यान्हीला येऊन डोंगरावर बाळेकोळ ( केळीकुंडा ) जवळ महासाधूंचा समुदाय होता , तेथे जाऊन तीन महिने ब्रह्मजिज्ञासा करुन तेथे असलेल्या सर्व मुमूक्षूस सर्व संशयापासून निवृत्त करुन , ज्ञान दृढीकरण करीत असता एक शिष्य म्हणाला , प्रत्यक्ष देह हाच मी अशी भावना असून देह आत्मा आम्हाला कसा समजावा . तेव्हा स्वामी म्हणाले , ऐक बाबा , " पंचात्मकं , पंचसुर्वमानां , षडाश्रयं , षडगुण योगयुक्तं , ॥ तं सप्तधातुं , त्रिमलं , त्रियोनि , चतुर्विधाहारमयं शरीरं ॥ " या प्रमाणावरुन याची सर्व तत्वे निराळी काढून पहा . चैतन्यात्मक ब्रह्म असे दिसेल , ते कसे म्हणशील , तर शरीराचा व्यवहार , पृथ्वी , आप , तेज , वायू , आणि आकार ही पंचतत्त्वे चालविताहेत . व ही परमात्म्याने एकेक भूताचे दोन दोन विभाग करुन त्यात एकेके भाग आश्रय म्हणून ठेवून उरलेले अर्ध भागाचे चार चार विभाग करुन आश्रय भागात आपापले सोडून दुसरे महाभागात मिळविले तर २५ तत्त्वे होतात . ही २५ तत्त्वे एके ठिकाणी मिळून स्थूल देह केल्या नंतर चलनरहित झाला . तेव्हा परमात्मा म्हणाला हा जड आहे . माझ्या शिवाय याचे कसे चालेल ? असे म्हणून कपालत्रय विदारुन जीवरुपाने प्रवेश करुन शरीराच्या अभिमानाने स्थूल भोग भोगून संस्कारयुक्त होऊन , स्वप्नात सूक्ष्म भोग अनुभवून स्थूल देहाचा संबंध कोठून आला ? शिष्य म्हणाला या स्थूलाचा संबंध केव्हा ? ऐक तर हे शिष्या " यत कठिनं तत पृथ्वी " या शरीरात जो द्रवांश असतो ते आप , उष्णता तेजांश , चलन वाय्वंश , पोकळी तो आकाशांश याप्रमाणे देह पंचभूताशी संबंधी झाला आहे . स्वरुपतः अभावरुप देह मी आहे असे म्हणणे , अन्यायाचे आहे की न्यायाचे आहे ? तेव्हा शिष्य म्हणाला तुमच्या प्रसादाने पंचवीस तत्त्वे निराळी करुन निराळे राहणारे चैतन्य मी असे समजून मी कृतार्थ झालो . असे म्हणून आनंदाश्रू ढाळीत , पुनःपुन्हा नमस्कार करुन स्वामींचा आशीर्वाद घेऊन तो गेला .
तेथेच एक कुष्ठरोगी होता , त्याने दीनवाणीने मागून घेतले की , गुरुमहाराज या शिष्याचा मनोरोग नाहीसा केलात त्याप्रमाणे माझे कुष्ठ नाहीसे करा असे म्हणून त्याने साष्टांग नमस्कार घातला . तेव्हा त्याला पंचाक्षरी मंत्र जपलास तर ब्रह्मस्वरुप होशील मग असला क्षुल्लक रोग त्या जपाने जाईल यात आश्चर्य नाही . असे सांगून त्याला पंचाक्षरी मंत्राचा उपदेश करुन पादोदकाने स्नान घालताच कुष्ठरोग नाहीसा झाला . याप्रमाणे तेथे फार लोकांची दाटी होऊ लागताच हे स्थळ सोडावे असे मनात आणून तूष्णीभाव निर्विकल्प समाधी असता काही भाव न दाखविता प्रारब्ध कर्म नावाच्या वायूने हा देह वाळलेल्या पिंपळाच्या पानासारखा उचलून ; मधली गावे , शहरे , खेडी वगैरे फिरवून विजापुरास उचलून आणला .
आर्या
विपुल मदा दूर करी ज्ञाननयन अमितरुप सिद्ध मुनी ॥
मायेपासुनि तारी , सहन करावयास शक्ति देई जनी ॥४४॥
शिखरिणी
अनन्याभक्ताचा करिसि लय संसार सदया ।
कुणा निंदीती हे ? जरि न भवमुक्ता हनन या ।
प्रपंचाच्या तापा दूर करुनि नामा सफल या ।
करी , निंदा होई न मग तव आरुढ सदया ॥४५॥