सिद्धारुढस्वामी - प्रकरण २८

प्रस्तुत ग्रंथ श्री कबीरदासस्वामी यांनी रचिला आहे . श्री सिद्धारूढस्वामी हे खरे सद्‍गुरू आहेत .


मंदाक्रांता

पायीं घाली त्रिगुणसमुहां षड्रिपूला हि जैसे ।

पंचक्लेशा निरसुनि करा षड्भ्रमा दूर तैसे ॥

सारी तापत्रय भय दुरी नाशि लोकत्रयातें ।

सिद्धारुढा झडकरि करी मुक्त यांतून मातें ॥५६॥

या प्रमाणे काळ घालवीत असता एके दिवशी काही मुले फणस चोरुन जात होती तेव्हा तेथे अवधूतास पाहून मालकाने त्यास दोन तडाखे दिले . योगी कर्मपाशापासून मुक्त होतो तसे फणसाचा मालक जो चांभार त्याने सोडले तर आपण मोकळा होईन असे वाटून ते भयभीत झाले . इतक्यात चांभाराने सोडिलेही . तेव्हा गोपाळाबरोबर चिदघनानंद स्वामीच्या समाधिरथानी येऊन त्यांनी विश्रांती घेतली . नंतर मनात म्हणाले ; मृत्युलोकवासी जो त्या मजवर चोरीचा आळ आला तर आश्चर्य कसले ; वैकुंठवासी कृष्णावर सुद्धा स्यमंतक मणी चोरल्याचा आळा आला व त्यामुळेच त्याचे जांबुवतीबरोबर लग्न झाले . त्याप्रमाणे लग्नाची तरी पीडा माझ्या मागे लागली नाही , हे एक बरेच . असे म्हणून ते शांतचित्ताने येऊन बसले आहेत तो अनेक भक्त व लिंगायत लोक येऊन नमस्कार करु लागले .

अशा रीतीने अगदी एकीकडे असताही आलेले लोकाच्या शंकांचे समाधान करावे लागे व त्यामुळे त्याची चोहोकडे कीर्ती झाली . ती सहन न होऊन एका लिंगायताने मत्सरयुद्धाने एके दिवशी रात्री चिद्वनानंदस्वामीच्या समाधीत अवधूत निजले असता तेथे येऊन आत कोण आहे असे विचारिले . तेव्हा जबाब आला नाही म्हणून आत शिरुन त्यांना बाहेर आणून म्हणाला की तू लिंगायत असून लिंग न बांधता भवी होऊन लिंगायताकडून नमस्कार कसा करवून घेतोस ? याकरिता तुला योग्य शिक्षा देतो . असे म्हणून स्वामीस खुबे धरुन डोक्याइतके उंच उचलून खाली आपटले व मारु लागला . इतक्यात गडगड असा ध्वनी येऊ लागला . तो ऐकून तो पळून गेला . गुडघा दुखावला व कोपराचे रक्त निघाले . पाठीवर जोराचे तडाखे बसल्यामुळे उठलेल्या वळात रक्त साखळले होते . कोपराचे रक्त पुसून रांगतरांगत समाधीत येऊन एकक्षण विश्रांती घेऊन दुसर्‍याच्या शरीराबद्दल असा आपल्याला अभिमान नसतो तसा आपल्याही शरीराचा अभिमान न बाळगता निरभिमानपणाने जीवन्मुक्तिसुखात संलग्नचित होऊन ते निजानंदात निमग्न झाले . दुसरे दिवशी हन्यार्ड मठाचे स्वामी रोजच्याप्रमाणे सकाळीच आले , तो स्वामीच्या वस्त्रावर रक्याचे डाग दिसले . म्हणून त्यांनी अंगावरील वस्त्र काढून पाहिले तो बराच मार बसला आहे . मग स्वामीस काय झाले म्हणून विचारिले असता स्वामी म्हणाले , प्रारब्धभोग भोगिला . आता त्याचा क्षय होऊन ब्रह्मरुप विदेह कैवल्य जवळ झाले . हन्यार्ड मठाच्या स्वामींनी ह्या जखमा तशाच सोडल्या तर फारच त्रास होईल म्हणून गुरुपादप्पालकुंडी संगाप्पायरगल्ल , बसाप्पायरगल्ल इत्यादी भक्तांना बोलावून आणून अवधूताला आपल्या मठात नेऊन काही दिवस तेथेच ठेवून घेऊन उपचार केले . जखमा बर्‍या झाल्याबरोबर स्वामी पुनः त्या समाधीजवळ येऊन चदरंग , इस्पेट , सोंगट्या , वाघशेळ्या , चेंडू , गोट्या इत्यादी खेळ गुराखीमुलांबरोबर दिवसा खेळत व रात्री शास्त्र चर्चा करीत तीन वर्षे त्या मठात काळ घालवून स्वच्छंदाने रहात असता मूर्खाला त्यांची ही स्थिती सहन झाली नाही . यांचा जीव घ्यावा म्हणून त्यांनी ओसाड विहिरीत टाकले तेथे आंगात काटे मोडले , दगडावर आंग ठेचले , असा त्यांना अत्यंत ताप झाला . तथापि मरण आले नाही . पुढे काही जण स्वामींस ओसाड देवालयात कोंडून बाहेरुन दरवाजा बंद करुन घेऊन चालते झाले . देवालयात वस्ती नसल्यामुळे तेथे घुंघर्टी , डांस , मिरचीकिडे , वगैरे प्राण्यांपासून त्यांना अत्यंत ताप झाला . तथापि निर्विकल्प समाधीत चित्ताचा लय करुन स्वामी बसले असता तीन दिवसांनी परमात्म्याने येऊन ऊठ , जागा हो , तू दुःखी होऊ नको , असे म्हणून अंगावर हात फिरविला . त्यायोगाने स्वामींचे सर्व श्रम परिहार झाले . याप्रमाणे परमात्म्याची कृपा पूर्ण असल्यामुळे असली अनेक अमोघ संकटे आली तरी त्यांना काहीएक अपाय झाला नाही .

पुढे काही लिंगायत लोकांनी सभा करुन ठरविले की , या भवीला जो लिंगायत नमस्कार करील त्याने प्रायश्चित घेतले पाहिजे , तरी मुमुक्षू लोक ही भीती न मानिता परमार्थसाधनाकरिता येतच होते . काही दिवसांनी हंदरय्या नावाचा एक इसम पहाटे ३ वाजता एका हातात एक सोटा व एका हातात एक पायताण घेऊन आला व पायताण स्वामीच्या डोक्यावर ठेवून जर हे पडले तर मरेमरेतो मारीन असे म्हणाला . स्वामी एक तासपर्यंत तसे ताठ बसले , पुढे शरीरधर्माप्रमाणे थोडेसे हालले , तो पायताण खाली पडले . हंदरय्या शिंदी प्याला होता , व त्याचा अंमल चढल्यामुळे त्यानी हातातील सोट्याने चार तडाखे स्वामींस लगावले व म्हणाला की , अरे तू आरुढ झाला आहेस तर शिंदी का पीत नाहीस , जर तू शिंदी , दारु वगैरे प्यालास तर मात्र भेदभावरहित आरुढ खरा . नाही तर कसला आरुढ ! असे म्हणून लाथाबुक्क्यांनी वाटेल तसे मारु लागला . इतक्यात उजाडले व बशट्टीअप्पा , मेयाशीनकायी वगैरे गृहस्थ येत होते , त्यांना पाहून आरुढ स्वामी म्हणाले , बाबा , आतापर्यंत कोणी नव्हते . तुला वाटेल ते करिता आले . आता भक्त लोक येऊ लागले , त्यांनी पाहिले तर तुला चौपट प्रायश्चित मिळेल . याकरिता चालता हो . तेव्हा तो पळून गेला .

नंतर त्या भक्तांनी येऊन नमस्कार करुन पाहिले , तो सर्वांग ठेचले आहे . यावरुन रात्री येथे कोणी तरी आला होता व त्याने मारले असावे असे समजून अंगावरुन हात फिरवून विचारिले की , कोणी मारिले त्याचे नाव सांगा म्हणजे त्याला धरुन आणून योग्य प्रायश्चित देऊ . तेव्हा आरुढ स्वामी म्हणाले , " यदभवितव्यं तदभवति " या वाक्याप्रमाणे प्रारब्धात असलेले सुखदुःख भोगून कर्माचा नाश होतो . त्याबद्दल प्रयत्न करु नये . कारण ते शिल्लक राहून जन्माला कारण होते . योग्यता पावलेल्याने आपल्यास दुसर्‍यांनी दोष दिला तरी किंवा चांगले म्हटले तरी दोन्ही आपल्या पूर्वकर्माप्रमाणे आहेत असे समजून शांतचित्त असावे . हे ऐकून आपल्या क्रोधवृत्ती आवरुन त्या दिवशी पुष्कळ वेळ बसून भक्त निघून गेले . नंतर काही दिवसांनी एक मूर्ख आला व त्याने स्वामीचे नवीन धोतर चोरुन नेले . असा स्वामींस बराच त्रास होत होता .

गावातील एक लिंगायत पौर्णिमेचे दिवशी दोनप्रहरी शेताकडे अन्नाची पाटी घेऊन , हातातून पेटलेल्या गोवरीचा विस्तव घेऊन जात असता स्वामी हेग्गीरीच्या जवळच्या चुनेगच्ची कट्ट्यावर बसले होते . त्यांस पाहून हा लिंगायत म्हणाला हा साधू म्हणवून घेऊन मुका बस्तो याची परीक्षा पाहूया . नंतर जवळ येउन हातात्ली जळकी शेणी स्वामींच्या डोक्यावर ठेवून चालता झाला . तेव्हा महाराज म्हणाले एकदा लहानपणी एका नागाने माझ्या डोक्यावर फणा धरिली होती , त्यावेळी तो महादेवाचा अलंकार आपल्याला मिळाला असे समजत होतो . तसेच आताही त्याचा तिसरा डोळा आपल्या डोक्यावर ठेविला आहे , असे समजून स्वस्थ बसले . इतक्यात दुसरा एक मनुष्य येऊन त्याने काठीने तो विस्तव खाली पाडिला व त्याला म्हणाला , मूर्खा माहात्म्याचे डोक्यावर विस्तव ठेवितोस , तुझा परिणाम काय होईल ? असे म्हणून तोही आपल्या वाटेने गेला . पुढे तीन महिन्यांचे आत शेणी ठेवणारा त्याच्या हातास एक करट होऊन त्यात किडे पडून तो मेला व त्याची बायको मरुन नष्टांश झाला . बहुतकरुन त्याला यमराजाने तापलेल्या लोहरसाच्या वैतरणी नदीत टाकले असावे .

याप्रमाणे ज्यांनी ज्यांनी त्रास दिला त्यांना देवाने त्याच वेळी योग्य प्रायश्चित दिले . हे असो . भीमप्पा उज्जणवर या नावाच्या मनुष्याला मूल होत नव्हते , म्हणून तो अन्नदान , अतिथी अभ्यागत यांची सेवा वगैरे पुण्यकर्मे करीत असे , पुढे तोही ह्या महात्म्याची सेवा करु लागला व मला मूल नाही , तुमच्या कृपेने मला मूल व्हावे अशी प्रार्थना करु लागला . तेव्हा दोन्ही कुलांचा उद्धार करणारा ज्ञानी पुत्र पाहिजे किंवा संसारी राहून ताप सोसणारा पुत्र पाहिजे असे स्वामींनी विचारले . तेव्हा त्याचे अंतःकरण निर्विकल्प असल्यामुळे याने सागराप्रमाणे विषम न बोलता ज्ञानपुत्र पाहिजे म्हणून सांगितले . तेव्हा अवश्य असे म्हणून मीच तुझा पुत्र , माझ्यावर ममता कर असे स्वामी म्हणाले , आणि पुत्राच्या पालनाने जे सुख तुम्हाला होणार तेच या सेवेने होईल , तेव्हापासून आतापर्यंत त्याचे वंशज स्वामीची सेवा करतात . भीमप्पाच्या इच्छेप्रमाणे स्वामीही त्याच्या घरी राहून बालक्रीडा करु लागले . सदभक्त म्हणतात की , पूर्वी ओम्यवा नवाच्या आईच्या घरात परमेश्वर बालक होऊन खेळत होते असे ऐकितो , ती गोष्ट आता खरी झाली . काही बापांना यांचा हा आनंदातिशय आवडत नसे . ते त्यांना शिव्या देऊन व शरीर क्लेश देऊन दुःख देतच होते . श्रियाळाचे सत्त्वाची परीक्षा केल्याप्रमाणे हे चालले आहे , असे समजून भीमप्पा वगैरेंची भक्ती चालली होती . त्यात अंतर पडले नाही .

पृथ्वी

तुला बघुनियां मला स्तुति सुचे नही ध्यानही ।

पदा तव सदा न मी बघतसें मुखाब्जास ही ॥

सदगद सुकंठ हो सुपूर येइ प्रेमाश्रुला ।

न भान स्मरण्या उरे मजहि सिद्ध योग्या तुला ॥५७॥

N/A

References : N/A
Last Updated : August 29, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP