पदे , आरत्या वगैरे
आरुढ , सत्पदारुढ , तमोमयमूढ , जगी जन भरला ।
त्या मुक्त कराया सांबचि जणु अवतरला ॥धृ॥
जरी रोड आकृति गोड , पाहता कोड , पुरत नेत्राचे ॥
तदभाषण वाटे सार ब्रह्मसूत्रांचे ॥
मनि शांति , मुखावरि कांति , घालवी भ्रांति , प्रणत लोकांची ॥
या अल्पमुखे मी स्तुति केवि करु त्यांची ॥
॥चाल॥ कुणि म्हणती जातिचा वाणी त्याजला ॥
कुणि म्हणती कोष्टिकुलवंशी जन्मला ॥
परि अधिक द्विजहुनि वाटे तो मला ॥
समदृष्टि , सदा संतुष्टि , असो तो कोष्टि , विप्र की वाणी ॥
तो वंद्यचि मजला चिद्रत्नाची खाणी ॥ आरुढ ॥१॥
बहु दिवस , असा सहवास , कराया नवस , चित्त करि माझे ॥
तो योग आणिला सहजचि सदगुरुराजे ॥
संगति , ज्याचि सदगती , देउनी मती , शुद्ध करि खाशी ॥
हा राहुनि येथे हुब्बाळिची करि काशी ॥
॥चाल॥ असतील शेकडो ज्ञानी महिवरी ॥
जाहले मुक्त स्वज्ञाने ते जरी ॥
उपकारी क्वचितची होती या परी ॥
शिशुपरी , खेळ कुणि करी , वदत वैखरी , पिशापरि कोणी ॥
कुणि वसति मुक्यांपरि स्तंभुनि आपुली वाणी ॥
ही माय , दूभती गाय , वंदिता पाय , ज्ञानपय देई ॥
गुण , अंग , जाति , वय , काळ , वेळ , नच पाही ॥
जन भरति , ऐकुनी कीर्ति , पहाया मूर्ति , रथावरि यांची ॥
दर वर्षि भरे ती जत्रा कशि मौजेची ॥
॥चाल॥ प्रार्थना जनांनो आता आयका ॥
कल्पतरु तुम्हाला लाधे हा फुका ॥
संधि ही हातातुनि जाऊ देऊ नका ॥
जा शरण , धरा तच्चरण , व्हावया तरण भवांबुधिमाजी ॥
ही कृष्णसुताची विनंति ऐकुनी घ्या जी ॥ आरुढ ॥३॥
पद २ चाल - ( म्हातारा इतुका न )
स्वामिन जयजयकार । करिती दास तुम्हा जोहार । करणे दिनोद्धार ॥धृ॥
दैवगतीने खाली पडलो नव्हता मज आधार ।
नरक मूत्र मी सेवन करिता सुटलो त्यातुनि पार ॥१॥
बाळपणी मी अजाण केवळ नकळे मज सुविचार ।
तरुणपणी मज जिंकू आला कामरिपू अनिवार ॥२॥
विद्ध कराया करितो मजवर बाणांचा भडिमार ।
बनलो त्याचा गुलाम बंदा होऊन मी लाचार ॥३॥
घालुनि माझ्या पदी शृंखला बहु जड हे सुतदार ।
संसारी मज लोटुनि दिधले भोगी कारागार ॥४॥
इतुक्याने नच भोग संपला दुसरा साथीदार ।
क्रोध येउनी भाजी आंगा लावुनियां अंगार ॥५॥
लोभ मोह हें चांडालद्वय राखी तेथें द्वार ।
स्वस्थ झोंपही देत न घेउनी फिरविति वारंवार ॥६॥
त्यांचा नायक मद आला जो त्याहुनि दुष्ट अपार ।
लीलेने मम नेत्र फोडिले अंधहि झालों ठार ॥७॥
पाहुनि मजला दुर्बल जाची मत्सर त्यास कुमार ।
त्याचे संगें वेडा झालों पडलों मी बेमार ॥८॥
अशा स्थितीतुनि दीनाला या मुक्त कोण करणार ।
सदगुरु तुमचा आठव केला पाहुनियां अधिकार ॥९॥
[ ३ ]
अगम्य लीला सदगुरु घरची वर्णवेना मजसी ।
धाडुनिया मुळ घेउनि जावें शांति माहेरासी ॥धृ॥
संसारासी बहुतचि विटले सौख्य नाहिं मजला ।
भवभय भीति अतिशय जाची जीव तेथ श्रमला ॥
धरोनि वांछा परमार्थाची नमितें चरणासी ॥ अगम्य०॥१॥
पतितपावन ने मज ऐकुनि धरिं ही येउनि ।
ठेवुनियां शिरि हस्त कृपेचा पावन मज करुनी ॥
विमल ज्ञान देई मजला अखंड स्मरणासी ॥ अगम्य०॥२॥
पतीतपावन नाम ऐकुनि धावुनियां आले ।
ठेवुनी शिरीं हस्त कृपेचा पावन मज केलें ॥
विमल ज्ञान दिधलें मजला अखंड स्मरणासी ॥ अगम्य०॥३॥
श्रीगुरुपदाब्ज पडतां दृष्टी हर्ष बहू झाला ।
सांडुनियां लौकीक लज्जा वास पदीं केला ॥
भक्ताभिमानी अससि दयाळा मजला राखीसी ॥ अगम्य०॥४॥
परब्रह्म हें रुप खरोखर सदगुरुचें खास ।
वर्णन करितां मुका राहिला सहस्त्रमुखी शेष ॥
अद्वैताची साधुनि जोडी विनवितसे दासी ॥ अगम्य॥५॥
[ ४ ]
दीनदयाळा भक्तवत्सला दाखवि पाऊलें ।
हातीं आरति घेउनि द्वारीं तिष्ठत मी बसले ॥धृ०॥
लक्ष चौर्यांशी फेरे फिरुनी श्रम बहु जाहलें ।
न देहासी येउनि आता नेत्र उघडीले ॥
सार्थक कांहीं व्हावें म्हणूनि गुरुशी वंदियलें ॥ दीन०॥
सदगुरुरायें ज्ञानांजना नेत्रीं घालविलें ।
द्वेष सर्व जाईल विलया ऐसें बोधियलें ॥
ब्रह्मरुप हें एक असें तूं आम्हां दाखविलें ॥ दीनदया०॥२॥
ज्ञानाग्नि हा सिद्ध करुनी उजळीली ज्योत ।
मी माझें हें समुळ काढुनि ओतियलें घृत ॥
सोहंभाव चरणी अर्पुनि स्वरुपिं लीन झालें ॥ दीन०॥३॥
अंतःकरणीं अनुहातध्वनि घणाघणा चाले ।
अणूरेणूपासुनि सारें ब्रह्मरुप भरलें ॥
स्वरुपिं विरतां सावित्रीचें सुखदुःख हरलें ॥ दीन०॥४॥
आतां येणें जाणें नलगे सहजचि हें झालें ।
जिवाशिवाचें ऐंक्य करोनी मौनी राहियलें ॥ दीन०॥५॥
[ ५ ]
श्री सिद्धारुढराया मन्मन हें विमल करी ॥धृ०॥
जडलें प्रपंचि त्यांतुनि काढी तें । जडवि तत्क्षणीं तव पदिं आधीं तें ॥
तव पादामृत पाजुनि त्यातें । दुस्तर हा भवसिंधु तराया श्रीसिद्धा० ॥१॥
मिथ्या प्रपंच किं सत्य गणावा । त्यामधिं कैसा जीव तरावा ॥
बैध किं मोक्ष हा स्पष्ट कळावा । ऐसें ज्ञान तुं देई दिना या ॥ श्रीसिद्धा०॥२॥
कोण्या देवालागिं भजावें । ज्ञानें किं भावे त्या अळवावे ॥
ब्रह्म कसें तें न पडे ठावें । अन्य न तुजसम हें विवराया ॥ श्रीसिद्धा ॥३॥
इच्छित इतुकें हें पुरवावें । चंचल मन हें स्थीर करावें ॥
तव पदकमली भावें रिझावें । ध्यान करी तव लक्ष्मीतनया ॥
श्रीसिद्धा॥४॥
[ ६ ]
हुब्बळि ग्रामा धन्यचि केलें ; सिद्धारुढाख्या धरुनी ।
सदगुरुरत्नहि भलें लाभलें , भावें घ्यावें उमजोनी ॥धृ॥
सन्मुद्रा ती पाहुनि प्रेमळ , ज्ञानरवीचा उदय जनीं ।
अज्ञानातें दूर कराया , झालां ऐसें गमत मनीं ॥१॥
म्हणुनि मनाची ओढ लागली , गुरुचरणीं त्या रात्रदिनीं ।
भवोदधींतुनि तारिसि भक्तां , शिवनामामृत पाजोनी ॥२॥
चिद्रुप चिन्मय मूर्ति मनोहर , म्हणती भजती हो ज्ञानी ।
सदगुरुमहिमा अगाध आहे , वर्णु कशी त्यालागोनी ॥३॥
मंदमती परी वंदन माझें आरुढचरणा दृढ धरुनी ।
तारिं तारिं मज सदगुरुनाथा , कृपाकटाक्षें पाहोनी ॥४॥
भवसिंधूतुनि पार पडावा , नाव नसे त्वतकृपेहुनी ।
पैलतिरासी कधीं नेशिल बा , लक्ष्मीतनुजा चिंती मनीं ॥५॥
[ ७ ]
किती गोड ध्यान तें श्रीसदगुरुचें । ह्रन्नयनिं पाहतां चित्सुख साचें ॥घृ ॥
नेत्र सफल हे श्रीमुख पाहुनी । विमल शीर्ष हें त्वत्पद वंदुनी ॥
श्रवण पुनित तव स्तुति ऐकोनी । त्वत्स्मरण करितसे पुनितचि वाचे ॥१॥
हस्त शुची तव सेवा अर्चनीं । पाद शुची तव सन्निध तिष्टुनी ॥
अनन्यभावें शरण रिघोनीं । रक्षण करु मज रज तव पदिंचे ॥ किती ॥२॥
सिद्ध ब्रह्मानंदाऽभिधानी । भूलत गौरीपुर वसवोनी ॥
दीनोद्धारक ब्रिद समजोनी । ध्यान असो मनिं मातनयेचे ॥ किती० ॥३॥
[ ८ ]
इस दुनयेका पालनवाला भगवत दीन दयाल कहो ।
सदा उसीका ध्यान लगाकर परब्रह्ममें सुखी रहो ॥धृ०॥
अजब तडाखा जमका लडका चूकर तुमने देखा है ।
पलख घडीमें निकल जायेगा जान घडीका सवदा है ॥
कोन तुमारे भाई बेटा कोन तुमारी माता है ।
कोन तुमारे जोरु लडके भगवतकी सब माया है ॥१॥
गाडी घोडा महाल बगीचा मेरा मेरा तूं कहता ।
ना हो तेरा ना हो मेरा भूलनकी हे है बाता ॥
पैसा पैसा करके कैसा नंगे फिरता तूं जाता ।
कोन तुमारे साथ चलेगा धरम अकेलाही आता ॥२॥
बेटा तेरा वदन एक दिन मट्टि बराबर मिल जाता ।
मट्टिका तो मिसल बनाया मट्टिबराबर हो जाता ॥
खाना पीना भोग बिछाना चमन उडाना सब दिन है ।
भगवत का कुछ ध्यान घडीभर करना तुझकू मुष्किल है ॥३॥
दास सखीका सवाल सुनिये भाई मनमे शोच करो ॥
गुणिजन पालन भगवत गावन घडी घडीका प्रेम धरो ॥४॥
[ ९ ]
गुरुरायचरण नमितां हो । भिड काय तुम्ही धरितां हो ॥
मोक्षचि हा जवळी असतां सोडुनि कां जातां ॥१॥
किति प्रपंचासि तुम्ही जपतां । त्यांत काय मिळालें हातां ॥
व्यर्थचि त्या मोहजळामधिं काय तुम्ही पडतां ॥२॥
किति एक मुलाचे आशे । किती विषयाचे अभिलाषे ॥
जमताति बकध्यानी पैर मैद । जसे खांसे ॥३॥
सुख वाटे परि तें खोटें । किति दुःख सांगु मज मोठें ॥
श्रीगुरुच्या चरणीं लागा । परमानंद साठे ॥४॥
सकलांसि विनंती माझी । गुरुचरण नमा आजी ॥
प्रार्थितसे दासचि घ्या तुह्मी सार यांतलें जी ॥५॥
[ १० ]
शिव शिव शंकर हरहर शंकर अर्धांगी नटला ।
नमि दास हा पदीं ठेवुनी शिर कमला ॥वृ०॥
गुण गाऊं शिव ध्याऊं भक्तसमूह जमला , मज भक्त समूह मिळला ।
ब्रह्मानंदे डुलूनि जातां भ्रांतिमधे पडला ॥१॥
ते देखोनी अवचित गुरुने कर माझा धरिला , गुरुने कर माझा धरिला ।
भ्रांती पडदा दूर करोनी वरद हस्त दिधला ॥२॥
प्रसन्न होउनि कृपा दृष्टिने अवलोकिले मजला , गुरुने अवलोकिले मजला ।
स्वस्वरुपी व्यापुनि भिन्न भाव नाही उरला ॥३॥
पुनरपि जनना पुनरपि मरणा भीत नाहि त्याला , गुरु हा भीत
नाहि त्याला ।
शिव शिव तुजला हेच मागणे विसर न नामाला ॥४॥
[ ११ ]
उठ उठा तुम्हि गुरुच्या स्मरणा । घेउनि दर्शन नमुया चरणा ॥१॥
का मनि वाहता ही भवचिंता । जाऊं गुरुशी शरणचि आता ॥२॥
सर्वंहि मायिक मिथ्या वदता । विश्वासा तुम्ही मग का धरिता ॥३॥
या फेर्यातुनी तरुनी जाया । नामचि हे तरी श्रेष्ठे खरी या ॥४॥
संतसमागम नित्य असावा । त्यांच्या कायीं देह झिजावा ॥५॥
भ्रम टाकुनिया कर सुविचारा । गुरुवांचोनी देव न दुसरा ॥६॥
दासाची या विनति तुम्हाला । विसरु नका त्या गुरुचरणाला ॥७॥
[ १२ ]
स्वामी राया हुबळीवीसा । सुख निद्रा केव्हा घेसी ॥
भक्तासाठी शिणलासी । प्रार्थी बालक चरणापासी ॥१॥
ब्रह्मा विष्णु महादेवा । सुरगण करिती तुझी सेवा ॥
तूचि स्वानंदाचा ठेवा । विश्वपती देवाधिदेवा ॥२॥
प्राणीमात्रा जन्म देसी । सृष्टिस्थितिलया करिसी ॥
सर्वहि तीर्थें तुजपाशी । गोकुळ मथुरा माया काशी ॥३॥
कलानिधे ते जोराशी । विद्यासृष्टीपती होसी ॥
शरणागता उद्धरीसी । गुरुमूर्ती तू संन्यासी ॥४॥
स्वामी अद्वय परमानंद । निर्गुण आनंदाचा कंद ॥
जिकडे तिकडे कीर्तीगंध । भक्त सेवुन घेती छंद ॥५॥
करवीरक्षेत्रीचा निवासी । अर्पी भावे सर्वस्वासी ॥
सेवासुख द्यावे त्यासी । विनवी प्रेमे दासानुदासी ॥६॥
[ १३ ]
माझी देवपुजा देवपुजा । पाय तुझे गुरुराजा ॥धृ०॥
गुरुचरणाची माती । तेचि माझी भागीरथी ॥ माझी देव॥१॥
गुरुचरणाचा बिंदु । र्ताचि माझा क्षीरसिंधु ॥ माझी देव॥२॥
गुरुचरणाचे ध्यान । तेचि माझ संध्यास्नान ॥ माझी देव॥३॥
शिवदिन केसरि पायी । सदगुरुवाचुनि दैवत नाही ॥ माझी०॥४॥
[ १४ ]
धन्य धन्य हे प्रदक्षिणा सदगुरुरायाची ॥
झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ॥धृ॥
गुरुभजनाचा महिमा नकळे आगमा निगमासी ॥
अनुभविते जाणती जे गुरुपदिचे अभिलाषी ॥१॥
पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी ॥
सर्व तीर्थे घडली आम्हा आदिकरुनि काशी ॥२॥
मृदंग टाळ घोळ भक्त भावार्थे गाती ॥
नाम संकीर्तने नित्यानंदे नाचती ॥३॥
कोटि ब्रह्महत्या हरती करिता दंडवत ॥
लोटांगण घालता मोक्ष लोळे पायात ॥४॥
प्रदक्षिणा करुनि देह भावे वाहीला ॥
श्रीरंगात्मज विठ्ठल पुढे उभा राहिला ॥५॥
[ १५ ]
आरती .
जयदेव जयदेव जयचिन्मयमूत ।
सिद्धारुढस्वामिन सच्चित्सुखपूर्ते ॥धृ०॥
साधनचतुष्क साधुनि कर्मविलय करिसी ॥
शोधुनि सदगुरु हंसाश्रित जन उद्धरिसी ॥
परमात्मा तू समजुनि शरण आलियासी ॥
सुखोपदेशे सहजे स्वस्वरुपी नेसी ॥ जयदेव जयदेव ॥१॥
आगमवाक्यज्ञान प्रमुदित निजह्रदया ॥
योगाचार्या योगीवृंदसमपर्या ॥
शंकर निष्ठित भाव प्रतिशंकरवर्या ॥
जीवन्मुक्तानंता ओवाळू सदया ॥ जयदेव जयदेव ॥२॥
आंतरब्राह्मी समता दंभातीतमत्ता ॥
ब्रह्मज्ञाने शाश्वत ब्रह्मानंदि रता ॥
मुनिजनमानसहंसा प्रकृतिगुणातीता ॥
जलबिंद्वंभो निधिवत परमात्मी निरता ॥ जयदेव ॥३॥
भेदाभेद त्यागुनि नास्तिक संहरसी ॥
श्रितजनरक्षण करुनी सौख्यपदा नेसी ॥
धर्मावनति दूर कराया सिद्ध सदा अससी ॥
भवभयसंहाराया शिव अवतरलासी ॥ जयदेव ॥४॥
[ १६ ]
आरती करा हो सज्जना द्वैतभाव टाकुनी ॥ आरती करा हो० ॥
विवेक सदबुद्धि , सदबुद्धि , लक्ष ठेवुनी पदी । अंतःकरण हो ॥
मनबुद्धि देहातीत तुम्हि शोधी ॥ आरती करा ॥१॥
इडा पिंगला सुषुम्ना मार्ग आहे कठीण ॥ त्रिकुटसंगमा ॥
मज्जना महालिंगदर्शना ॥ आरती करा हो ॥२॥
चिन्मय गुरुमूर्ति गुरुमूर्ति अणूरेणू भासती ॥ बुद्धि ध्यास ती ॥
निजज्योती गुरुपुत्र जाणति ॥ आरती करा हो ॥३॥
[ १७ ]
ज्याच्या कृपेने निज लाभ झाला । देहत्रयाचा जडभार गेला ॥
निरामय ऐसा मज बोध केला । विसरु कसा मी गुरुपादुकाला ॥१॥
स्वरुप माझे मज दाखविले । भावाअभावविरहीत केले ॥
उपकार ज्याने मम पूर्ण केला । विसरु कसा मी गुरुपादुकाला ॥२॥
स्वानंदडोही मन कालविले । हाती धरोनी निज लेवविले ॥
हा बोध ज्याने मज पूर्ण केला । विसरु ॥३॥
प्रसादकाळी मति शुद्ध झाली । दुर्बुद्धि माझी विसरुनी गेली ॥
संसार ज्याने स्मशान केला । विसरु ॥४॥
जन्मांतरेही बहु चूकविले । जिवा शिवाशी पदमावळीले ॥
सखाचि म्यांहो गुरुपूर्ण केला । विसरु ॥५॥
आत्माचि माझा मज दाखविला । सोहं प्रकाशे मज भेटविला ॥
जिव शिव तेथे विरोनि गेला । विसरु ॥६॥
धरोनि माते निवांत केले । ठेवोनि पोटी परिवार नेले ॥
सांगोनि वाक्ये उपदेश केला । विसरु ॥७॥
अखंड माझे ह्रदयी रहावे । स्वभावदृष्टी परिपूर्ण पहावे ॥
टाकोनि माते दुर नाहि गेला । विसरु ॥८॥
[ १८ ] विनवणी अभंग .
विनवणी माझी स्वामी गुरुराया । कर जोडोनिया पायापाशी ॥१॥
नसे भाव भक्ति असे ज्ञानावीण । मंद मी अज्ञान दास तूझा ॥२॥
काम क्रोध मद षड्रिपू झोंबती । होतसे फजिती अनिवार ॥३॥
क्षमा दया शांती वसे तुझ्या अंगी । तूच वीतरागी स्वामी माझा ॥४॥
सेवा तुझी देवा नित्य मज घडो । नामामृत पडो मुखी माझ्या ॥५॥
अनन्यभावाने शरण मी आलो । मायेत बुडालो वर काढी ॥६॥
कन्या पुत्र बंधु आणिक सोयरे । तुजवीण खरे कोणी नाही ॥७॥
तूचि मातापिता तूचि ज्येष्ठ भ्राता । तुझी सर्व सत्ता चहूकडे ॥८॥
तुझिया सत्तेने सर्व काही घडे । धाव मजकडे सिद्धराया ॥९॥
उदार दयाळू कोमल मनाचा । सुकाळ कृपेचा करी आता ॥१०॥
नाही शक्ति मज तूज वर्णावया । वर्णन कराया तूचि योग्य ॥११॥
बालकासी आता धीर धरवेना । दीनाची करुणा येऊ द्यावी ॥१२॥
[ १९ ] विडा .
विडा घ्या हो स्वामी गुरुराया । तूचि विश्रांतीची छाया ॥
अर्पितसे स्वीकार कराया । समर्थ तू योगीराया ॥धृ०॥
देह हें पिकलें पान । त्यांत घालोनी सामान ॥
त्रयोदशगुणी पूर्ण । विडा झाला प्रेमळ भजन ॥१॥
केशर कस्तुरी विवेक । वैराग्याचा त्यांत कात ॥
चुना भक्ति ही सुपारी । पत्रि ही भूतदया ॥२॥
शांती हा वेलदोडा । समाधान जायफळा ॥
बदाम खोबरें कंकोळ । क्षमा लवंग सत्क्रिया ॥३॥
बालक दासाचा हा दास । प्रसादाची करी आस ॥४॥
[ २० ]
आतां स्वामी सुखें निद्रा करा अवधूता । सिद्धा अवधूता ॥
चिन्मय सुखस्वामी जाउनि पहुडा एकांता ॥
वैराग्याचा कुंचा घेउनी चौक झाडीला ।
तयावरी सत्प्रेमाचा शिडकावा केला ॥१॥
पायघड्या घातलिया सुंदर नवविधा भक्ती ॥
स्वामी नवविधा भक्ती ॥
ज्ञानाच्या समया उजळोनी लावियेल्या ज्योति ॥२॥
भावार्थाचा मंचक ह्रदयाकाशीं टांगला । ह्रदयाकाशीं टांगला ॥
मनाचीं सुमनें करुनी केले शेजेला ॥३॥
द्वैताचे कपाट लावुनी एकिकरण केलें । एकीकरण केलें ॥
दुर्बुद्धीच्या गांठी सोडुनी पडदे सोडीले ॥४॥
आता तृष्णा कल्पनेचा सांडुनि गलबला । स्वामी सांडुनि गलबला ॥
क्षमा दया शांती उभ्या सेवेला ॥५॥
अलक्ष हा उन्मनी घेउनि नाजुक हा शेला । स्वामी नाजुक हा शेला ॥
निरंजन सदगुरु माझा स्वामी निजला शेजेला ॥ ॥
[ २ ]
चैतन्यं शाश्वतं शांतं , व्योमातीतं निरंजनं ॥
नादबिंदुकालातीतं , तस्मै श्रीगुरुवे नमः ॥१॥
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ॥
गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः ॥२॥