मनुष्य चूक करतो , आणि ‘ देवा , क्षमा कर ’ म्हणतो ; पण पुन्हा पुन्हा चुका करीतच रहातो . हे काही योग्य नव्हे . अशाने काही त्याला देव क्षमा करणार नाही . ‘ देवा , क्षमा कर ’ हे म्हणणे इतके सहज होऊन बसले आहे , की त्याचा अर्थच आपल्या ध्यानात येत नाही . तो जर ध्यानात येत असता तर मनुष्य त्या चुका पुन्हा पुन्हा न करता . अशा रीतीने आपण आपल्या बुद्धीच्या बळावर परमेश्वराला फसवू शकणार नाही . बुद्धीच्या जोरावर जर आपण माणसालाही फसवू शकत नाही तर परमेश्वर कसा फसेल ? आपण आपल्या बुद्धीच्या जोरावर परमेश्वराची प्राप्ती करुन घेऊ , असे म्हणणे कदापीही योग्य होणार नाही . तेव्हा शरणागतीशिवाय मार्ग नाही . ते तुम्ही करा .
समाधान काही परिस्थितीवर अवलंबून नाही . कितीही पुराणे वाचली , ग्रंथ मुखोदगत केले , प्रवचने ऐकली , तरी मनाला समाधान लाभणार नाही . त्याप्रमाणे थोडे तरी आचरण केले पाहिजे . नामात राहिले पाहिजे . नामाशिवाय इतर कोणत्याही गोष्टीने पूर्तता येऊ शकत नाही . नामाशिवाय खरे समाधान मिळणार नाही . तेव्हा तुम्ही भगवंताला अनन्यभावाने शरण जाऊन , त्याचे नाम आवडीने आणि सतत घ्या .
एक गरीब वारकरी पंढरपूरला चालला होता . मोठ्या कष्टाने तो पायी चालला होता . वाटेत एक रेल्वेचे फाटक लागले , ते बंद होते म्हणून तो थांबला . इतक्यात तिथे एक मोटार येऊन उभी राहिली . आत एक मोठा श्रीमंत माणुस बसला होता . तोही पंढरपूरला चालला होता . वारकर्याच्या मनात आले , ‘ देवा , तुझी एवढी निस्सीम भक्ती मी करतो , परंतु माझी ही दशा ; आणि हा लबाड व्यापारी , याला मात्र तू सर्व ऐश्वर्य देऊन आरामात पंढरपूरची यात्रा घडवतोस . काय तुझा हा न्याय ! ’ एवढ्यात मोटारीचे दार उघडून दोन नोकरांनी त्या श्रीमंत माणसाचे हात आपल्या खांद्यावर घेऊन त्याला खाली उतरविले . तो पांगळा होता ! वारकर्याने विचार केला , पांगळा होऊन आरामात पंढरपूरला जाण्यापेक्षा गरिबीत पायी जाणे बरे . आपल्याजवळ जे नाही ते ज्याच्यापाशी आहे तो सुखी असला पाहिजे , हे आपण धरुन चालतो , पण तसा तो नसतो . त्याचे दुःख आपल्याला माहीत नसते . आणि तो स्वतःला जर सुखी समजत असेल , तर तो दारुच्या मदाप्रमाणे मद समजावा . आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानणे हाच विषयाची पकड ढिली करायचा उपाय आहे . आपली परिस्थिती ही परमात्म्याच्या इच्छेने आली आहे असे आपण म्हणू या . असे जर आपण केले तर दुःखाचा आणि सुखाचा आवेग कमी होईल .