समाधान - ऑगस्ट ३०

महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे . तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा , म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल .


विषयीं गुंतले सर्व जन । चित्त मन तेथे केलें अर्पण । तेथें कोणास न येई समाधान । पावे सुखदुःख समसमान ॥ विषयाचा केला कंटाळा । परि मनावर बसला त्याचाच थारा ॥ पैका हातीं खेळवला । त्यानें हात काळा झाला । हा दोष नाहीं पैक्याला । आपण त्याला सत्य मानला ॥ एका मानापोटीं दुःखाचें मूळ । हें जाणती सर्व सकळ ॥ वैभव -संपत्तीचा सहवास । हाच दुःखास कारण खास ॥ व्यवहाराच्या चालीनें चालावें । वेळ प्रसंग पाहून वर्तावें । चित्तीं समाधान राखावें ॥ जोंवर जरुर व्यवहारांत राहणें । तोंवर त्याला जतन करणें ॥ ज्याचा घ्यावा वेष । तैसें वागणें आहे देख ॥ व्यवहारांत जैसें जगानें वागावें आपल्यापाशीं । तैसेंच वर्तन ठेवावें आपण दुसर्‍यापाशीं ॥ ज्याचा जो जो संबंध आला । तो तो पाहिजे रक्षण केला ॥ आपलेकडून कोणाचें न दुखवावें अंतःकरण । तरी व्यवहारांत जे करणें जरुर तें करावें आपण ॥

संगत धरावी पाहून । बाह्य भाषणावर न जावें भुलून ॥ मिष्ट भाषण वरिवरी । विष राहे अंतरीं । असल्याची संगत नसावी बरी ॥ ज्याचा त्यास द्यावा मान । लहानाचें राखावें समाधान । मोठ्याचेपुढें व्हावें लीन । वागत जावें जगीं सर्वांस ओळखून ॥ मनानें व्हावें श्रेष्ठ । बाह्यांगी राहावें कनिष्ठ ॥ न करावा कोणाचा उपमर्द । गोड भाषण असावें नित्य ॥ आळसाला न द्यावा थारा । सगळ्या जीवनाचा घात ज्यानें केला ॥ पराधीनता अत्यंत कठीण हें खरें असे । पण त्याच्याशिवाय जगतांत कोणी नसे ॥ तरी त्याची परिथिति ओळखून वागणें बरें ॥ मागें काय झालें हें न पाहावें । उद्यां काय होईल हें मनीं न आणावें । आज व्यवहारांत योग्य दिसेल तसें वागावें । प्रयत्नाचा कंटाळा न करावा ॥ आज जें मिळालें तें घ्यावें । पुढे जास्त मिळविण्याचा प्रयत्न करावा ॥ विना केले काम । न मिळत असे दाम ॥ धन संग्रहीं राखावें । सर्वच खर्चून न टाकावें ॥ थोडें थोडें लोकांचें देणें देत जावें । आणखी जास्त न करावें ॥ नोकरी ज्याची करणें जाण । त्याचें मानावें प्रमाण ॥ व्यवहारांत असावी दक्षता । अचूक प्रयत्न करावा सर्वथा ॥ प्रपंचांत असावें दक्ष । सत्याचा धरावा पक्ष ॥ जो जो प्रसंग येईल जैसा । प्रपंचांत वागेल तैसा । याचें नांव प्रपंचात दक्षता ॥ व्यवहार करावा ऐसा जपून । कोणाचें नुकसान न होऊं द्यावें चुकून ॥ भगवंताचे आहो आपण । ही मनीं ठेवावी ओळखण ॥ समाधानाचें स्थान । एका रामावांचून नाहीं जाण ॥ म्हणून राम ठेवील त्यांत मानावें समाधान । राखून नामाचें अनुसंधान ॥

N/A

References : N/A
Last Updated : September 29, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP