समाधान - ऑगस्ट २९

महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे . तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा , म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल .


द्वैत आणि अद्वैत ही काय भानगड आहे ? भगवंतापासूनच सर्व झाले . एकापासून दोन झाले . आपण मूळ स्वरुपापासून बाजूला झालो म्हणून द्वैत आले . मायेमध्ये सापडले नाही म्हणजे अद्वैतात राहता येईल . माया कल्पनेचीच झाली ; तिला कल्पनेनेच मारावी . एकच करावे ; अद्वैतात जे राहिले त्यांच्या नादी आपण राहावे . भगवंताचे होण्याकरिता , ज्याने मी वेगळा झालो ते सोडावे . ज्याच्यापासून माया निर्माण झाली , त्यालाच शरण जावे . माया तरी भगवंतामुळेच झाली . जो भगवंताचा होतो , त्याला माया नाही बाधत . मायेचा जोर संकल्प -विकल्पात आहे . अखंड स्मरणात राहावे म्हणजे नाही माया बाधत . भगवंताचे नाम हे स्थिर आहे , पण रुप मात्र सारखे बदलते . प्रत्यक्ष साकाररुप हेच काही रुप नव्हे ; जे जे आपल्या कल्पनेमध्ये येऊ शकेल ते ते सर्व रुपच होय . भगवंताच्या नामात मोबदल्याची अपेक्षा नाही , म्हणून ते पूर्ण आहे . समाधान हा पूर्णत्वाचा स्वभाव होय . म्हणूनच , जे पूर्ण नाही ते असमाधान . भगवंताकडून येणारी शांती हेच समाधान होय , आणि हेच पूर्णपण आहे . जे शास्त्र समाधान देते तेच शास्त्र खरे होय , आणि ज्याने शांती आणि समाधानाचा लाभ होतो तोच खरा धर्म होय . धर्म म्हणजे नीती आणि अध्यात्म यांचा संयोगच .

जो दुसर्‍याच्या हिताकडे न पाहता आपल्या हिताकडेच पाहतो तो स्वार्थीच होय . सुख व्हावे ही मनुष्याला इच्छा असल्यामुळे अस्वस्थपणा येतो . या अस्वस्थतेमधून तळमळ निर्माण होते . या तळमळीमुळे जगाच्या सर्व सुधारणा बाहेर पडतात . पण ह्या सुधारणा जितक्या जास्त होतात , तितके मनुष्याला दुःख जास्तच होते . जी विद्या केवळ नोकरीचे साधन आहे , ती अपूर्णच असते . असली विद्या पोटापुरतीच समजावी . ती समाधान देऊ शकणार नाही . समाधान देणारी विद्या निराळीच आहे . म्हणून लौकिक विद्येला फार महत्त्व देऊ नये . एखादे वेळी आपल्याला असा संशय येतो की , जगात कुठे सुख , समाधान , आणि आनंद आहे का ? पण तो संशय बरोबर नाही . कारण ज्या गोष्टी जगात नाहीत त्यांचे नावच कसे निघेल ? असमाधान याचा अर्थच ‘ समाधान नाही ते . ’ यावरुन असे स्पष्ट दिसते की , आधी समाधान असलेच पाहिजे . दिवाळीमध्ये , सुखाचे जे असेल ते आज करतो आणि दुःखाचे जे असेल ते आपण उद्यावर टाकतो . ह्याचा अर्थ असा की , आपली काळजी नाहीशी झालेली नसूनही आपण आजचा दिवस चांगला म्हणजे काळजीविरहित घालवितो . उद्या पुन्हा काळजी आहेच ! पण जो भगवंताचे स्मरण ठेवील त्याला काळजी केव्हाच नसते .

N/A

References : N/A
Last Updated : September 29, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP