भगवंत - ऑक्टोबर ३

ब्रह्मचैतन्य महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे. तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा, म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल.


देवाला आपण जाणू म्हणून तो जाणला जाईल का? मला ब्रह्म कळले म्हणून शब्दाने सांगितले तर ब्रह्म कळले असे होत नाही. जो ब्रह्म कळले असे म्हणतो, त्याला खरे म्हणजे काहीच कळले नाही असे होते. ते कळून घेऊ म्हणून कळत नाही; ते न कळतच कळते, आणि मग ‘ मला कळले ’ ही भावनाच तिथे राहात नाही. मी ब्रह्माला ओळखीन असे म्हणून जो देवाजवळ गेला, त्याला काहीच प्राप्ती होणार नाही. मीपणाने जो देवाला पाहू जातो, त्याला देवाची प्राप्ती होत नाही. आपला अहंकारच देवाच्या प्राप्तीच्या आड येतो; आणि तो बरोबर घेऊनच जर आपण देवाला शोधू लागलो तर तो कसा सापडेल? आपल्या आणि देवाच्यामध्ये आपल्या अहंकाराचा पातळ पडदा असतो, आणि तो असल्यामुळे आपल्याला देव दिसत नाही. तो दूर करा म्हणजे देव दिसू लागेल.
व्यापार चांगला चालला नाही म्हणजे मग विचारायला येता की, तुम्ही व्यापार करायला सांगितला पण चांगला चालत नाही; पण त्याचबरोबर नामस्मरण करायला सांगितले होते आणि ते करीत नाही, हे मात्र सांगायचे नाही ! नामस्मरण केल्याने व्यापारात बिघाड येईल का? तुम्ही म्हणाल की, आमच्या संसारात तुम्ही बिघाड करायला सांगता; परंतु मी बिघाड करायला सांगत नसून, माझ्या सांगण्यावरुन तुम्ही नामस्मरण केले तर उलट तो चांगलाच होईल. काळजी न करता संसार करा. रामाला जे करायचे, ते तुम्ही काही केले तरी करायला तो चुकत नाही. मग काळजी करुन तरी काय होणार आहे? जे भोगायचे ते कष्टाने भोगण्यापेक्षा आनंदाने भोगलेले काय वाईट? जे जे आघात होतील ते त्याचे म्हणून त्याच्याकडे पाठवावेत. आपल्याला त्यांच्याशी कर्तव्य नाही असे समजत जावे. आपल्याला नवस करायचा असेल तर असा करावा की, “ मला तू ज्या स्थितीत ठेवशील त्या स्थितीत आनंद दे, म्हणजे आपल्याला त्याचे होऊन राहता येईल. मनुष्याची शांती बिघडायला जगामध्ये दोनच कारणे आहेत. एक म्हणजे आपल्याला हवे ते न येणे, आणि दुसरे म्हणजे आपल्याला नको ते येणे. या दोन्हीपैकी आपल्या हातामध्ये एकही नाही; मग आपण दुःख का करावे? भगवंताच्या नामाची एकदा गोडी लागली ना, की सर्व काही साधते. नाम अभिमानाचा नाश करते. नामाने हवे-नको-पणाची बुद्धी होत नाही. साधुसंतांनी आवर्जून सांगितलेले हेच नाम तुम्ही सतत घेऊन समाधानाचा शाश्वत ठेवा मिळवा.

N/A

References : N/A
Last Updated : October 17, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP