भगवंत - ऑक्टोबर १५

ब्रह्मचैतन्य महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे. तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा, म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल.


नामस्मरण करायचे ते अभिमान टाकून करीत जावे. परमेश्वराला अनन्यशरण जाऊनच त्याचे नाम घेत जावे. पुष्कळ वेळा, आपण साधन करु लागलो म्हणजे आपल्याला अभिमान चढू लागतो, आणि त्यामुळे साधन व्यर्थ होते. संताकडे जाताना आपण मनामध्ये काही एक बरोबर घेऊन जाऊ नये; किंवा काही नेलेच तर भगवंताचे प्रेम न्यावे. आपण प्रपंचाचे प्रेम आणि अभिमान बरोबर घेऊन जातो आणि मग, एकावर एक लिहिलेले जसे वाचता येत नाही तशी अवस्था होते. एखादी वस्तू आपल्याला हवी असे वाटल्यावर आपण तिच्या प्राप्तीविषयी विचार करु लागतो. म्हणूनच पहिल्याने, भगवंत हवा असे आपल्याला वाटले पाहिजे. त्यानंतर त्याच्या प्राप्तीच्या साधनांचा अभ्यास करायला पाहिजे. हा अभ्यास मनाच्या कष्टाचा आहे. क्रोधाला बाहेर येऊ देण्यापेक्षा, क्रोध गिळणे यात जास्त श्रम आहेत. असे करण्यामध्ये आज कष्ट आहेत हे खरे, पण पुढे मात्र सुख आहे हे निश्चित. वागण्यात, बोलण्यात आणि चालण्यात आपण सावधगिरी बाळगावी; नको ते टाळावे.
अनन्यतेला पैसा लागत नाही, विद्या लागत नाही; त्याला फक्त आपली अभिमानवृत्ती बाजूला ठेवावी लागते. भगवंताचे होण्यासाठी अंगी लीनता आलीच पाहिजे. लीन माणसाला भगवंत लवकर साधेल. लीनतेमध्ये बाकीच विसर पडून भगवंत तेवढा शिल्लक राहतो. जो वृत्तीने लहान आहे त्याला भगवंत लवकर वश होतो. मनुष्य मोठा असून लहानासारखा वागला तर ते फार चांगले असते. मनाने मात्र आपण बळकट बनले पाहिजे. आपण स्वतःशी चोवीस तास उघडा व्यवहार करावा. भगवंताने आपल्याला केव्हाही जरी पाहिले तरी आपल्याला लाज वाटता कामा नये. आपले वागणे असे असावे की भगवंताची आस मनामध्ये वाढत जाऊन, तिचे पर्यवसान ध्यासामध्ये व्हावे. रात्री जे स्वप्न पडावेसे वाटते ते दिवसभर करावे. यासाठी आपली वृत्ती नामामध्ये गुंतवून ठेवावी. ‘ असावे सर्वांत पण नसावे कोणाचे ’ अशा वृत्तीने जो राहील त्याला लवकर परमार्थ साधेल.
देहाच्या उपचारांना जो भुलतो तो भगवंताला अगदी विसरलेला असतो. पण ज्याचे अनुसंधान मजबूत असते त्याला जगातल्या ऐश्वर्याची किंमत नसते. पैशाची वासना आणि लौकिकाची लालसा माणसाला भगवंतापासून दूर नेतात. त्यांच्या तावडीत सापडता कामा नये. लोकेषणा आणि धनेच्छा या दोन्ही गोष्टींचा संबंध प्रपंचात वावरत असताना येणारच. तो टाळता येणे कठीण आहे. पण ज्याला भगवंताचे प्रेम पाहिजे आहे त्याने त्यांचा गुणधर्म ओळखून त्यांना वापरावे, म्हणजे त्यांच्यापासून उत्पन्न होणारे दोष त्याला बाधणार नाहीत.

N/A

References : N/A
Last Updated : October 17, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP