भगवंत - ऑक्टोबर २६

ब्रह्मचैतन्य महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे . तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा , म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल .


कोणतेही बी पेरताना ते अत्यंत शुद्ध असावे ; म्हणजे किडलेले किंवा सडलेले नसावे . भगवंताशिवाय दुसर्‍या कोणत्याही फळाच्या हेतूने केलेली भक्ती ही सडलेल्या बीजासारखी आहे . आता , सुरुवातीलाच उत्तम बी पैदा होईल असे नाही , परंतु प्रयत्नाने ते साधता येते . पुष्कळ वेळा काही तरी ऐहिक सुखाच्या इच्छेने मनुष्य भक्ती करायला लागतो ; म्हणजे त्यावेळी तो सडके बी पेरीत असतो . प्रारंभी अशा तर्‍हेचे काही तरी निमित्त होतच असते , परंतु थोड्याशा विचाराने , शुद्ध बीजाची पेरणी होणे जरुर आहे असे चित्ताला पटते . भगवंताची तशी अनन्य भावाने प्रार्थना करावी . पाऊस पडणे वा न पडणे ही गोष्ट सर्वस्वी भगवंताच्या स्वाधीन आहे , आणि तो यथाकाळ पाडतोही . असे पाहा की , एखादे शेत खोलात असले की त्यात पाणी इतके साचते की , ते जर बाहेर काढून लावले नाही तर सबंध पीक कुजून जाते . त्याच अर्थाने भगवंताच्या कृपेचा लोंढा जर जोराचा असेला तर बंधारा फोडून तो बाहेर सोडणेच जरुर असते . असे करण्यात दोन्हींकडून फायदा असतो . एक म्हणजे शेतात जास्त झालेले पाणी बाहेर काढून लावल्याने शेतातले पीक न कुजता शेत उत्तम वाढते ; आणि दुसरे म्हणजे , हे बाहेर घालविलेले पाणी आजूबाजूच्या शेतात पसरुन तिथलेही पीक वाढवायला मदत होते . बंधारा फोडून पाणी बाहेर लावणे याचेच नाव परोपकार . साधकाची जशी प्रगती होत जाईल त्याप्रमाणे मध्यंतरी सिद्धी प्राप्त होऊन , बोललेले खरे होणे , दुसर्‍याच्या मनातले समजणे , एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी अदृश्य गतीने जाणे , इत्यादि प्रकार घडू लागतात . अशा वेळी मोहाला बळी न पडता , त्यांचा उपयोग स्वार्थाकडे न होईल अशी खबरदारी घेणे जरुर असते . उपयोग करायचाच झाला तर दुसर्‍याचे काम करण्यात , परोपकारांत व्हावा ; यालाच बांध फोडून पाणी बाहेर लावणे असे म्हणता येईल .

शहाण्या माणसाने आपले सुख बाहेरच्या वस्तूवर अवलंबून न ठेवण्याचा अभ्यास करावा . बाहेरची वस्तू सुटली तरी मनाला दुसरी वस्तू देणे अवश्य असते . अशी वस्तू म्हणजे भगवंत होय . भगवंत हा नेहमी राहणारा , स्वयंपूर्ण , आणि आनंदमय असल्यामुळे त्याचे चिंतन करता करता मनामध्ये ते गुण उतरतात . अर्थात मन भगवंताच्या चिंतनाने आनंदमय बनल्यावर त्या माणसाला जीवन किती रसमय होत असेल याची कल्पना करावी . मी त्याचा आहे आणि हे सर्व त्याचे आहे अशी सारखी जाणीव पाहिजे . किती आनंद आहे त्यात !

N/A

References : N/A
Last Updated : October 25, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP