भगवंत - डिसेंबर ६

ब्रह्मचैतन्य महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे. तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा, म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल.


एखाद्याची सुरी असली, तिची लाकडी मूठ बदलून लोखंडाची केली; दुसर्‍याने चांदीची केली, कुणी सोन्याची केली; पण मारल्यानंतर परिणाम एकच ! तसा, प्रपंच चांगला असला, कसाही असला, तरी तो सुरीच आहे, त्याचा घात सगळीकडे सारखाच ! प्रपंचाची आसक्ती म्हणजे त्या सुरीची धार आहे. म्हणून, आपला धंदा, नोकरी, सगळे उत्तम करावे. त्यात मागेपुढे पाहू नये; पण त्यासाठी मी आहे असे नाही समजू कधी. नोकरी ही सुखाकरिता नसून पोट भरण्यासाठी आहे अशा वृत्तीने जो ती करील त्याला तिची आसक्ती आणि अभिमान राहणार नाही. सावधगिरीने वागावे, भगवंताचे स्मरण ठेवावे, त्याचे नाम घ्यावे; बाकीच्या सगळ्या गोष्टी प्रारब्धावर ठेवाव्या. यानेच समाधान मिळेल. भगवंताशिवाय समाधान मिळणे शक्य नाही. ‘ मी समाधान राखून चाललो ’ असे म्हणणारा तो जगात धन्य आहे खरा ! ही धन्यता यायला भगवंताची अत्यंत आवश्यकता आहे. रामाच्या इच्छेने सर्व चालले आहे, राम कर्ता आहे, ही भावना ठेवून आपण प्रपंच करु या. प्रयत्न आटोकाट करावा, पण फळ देणारा भगवंत आहे ही भावना ठेवून समाधान टिकवावे.
भगवंताची प्राप्ती व्हायला दुसरे काही नको, शरणागती पाहिजे. मी उपाधिरहित बनणे ही शरणागती आहे. माझेपणाची जी उपाधी आहे ती नाहीशी करायची असेल तर साधन तसेच पाहिजे. इतके उपाधिरहित साधन नामाशिवाय दुसरे कोणतेही नाही. ते साधन तुम्ही करा. भगवंताच्या नामाचे प्रेम यायचे असेल तर अंतःकरण शुद्ध पाहिजे; अंतःकरण द्वेषाने, मत्सराने, अभिमानाने भरलेले असू नये. एकमेकांवर प्रेम करा, घरातून सुरुवात करा. मुलगा आपल्याला सुख देतो म्हणून नाही, पण माझे कर्तव्य म्हणून मी त्याच्यावर प्रेम करीन. निःस्वार्थीपणाने प्रेम करणे हाच परमार्थ आहे खरा. त्यासाठी, राम दाता आहे, पाठीराखा भगवंत आहे, ही जाणीव ठेवून तुम्ही रहा. ही जाणीव निर्माण करण्याकरिता भगवंताच्या नामाची खरी गरज आहे. मनाची शांती मिळवायला हाच मार्ग आहे. दैन्यवाणे कधीच नसावे, अगदी राजाचे वैभव तुम्ही भोगा, पण त्या वैभवाने मी सुखी आहे असे न म्हणता, मी रामाचा आहे म्हणून सुखी आहे ही भावना ठेवून वागा. वैभव आज आहे, उद्या नाही; वैभवावर विश्वास ठेवू नका. मी रामाचा आहे या भावनेत तुम्ही रहा. त्यासाठी रामाचे नाम तुम्ही घ्या, राम कल्याण करील हा माझा भरवसा तुम्ही ठेवा.

N/A

References : N/A
Last Updated : November 07, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP