भगवंत - डिसेंबर १८

ब्रह्मचैतन्य महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे. तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा, म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल.


आपण असे पाहातो की, आज जे दुःखाचे वाटते तेच पुढे सुखाचे होते, आणि जे सुखाचे आहे असे आज वाटते तेच पुढे दुःखाला कारणीभूत होते. तुम्हांला जे सुखदुःख येते ते भगवंतापासून येते म्हटले, तर दुःखाचे कारण काय? जोपर्यंत परक्याने दिलेले दुःख भगवंतानेच दिले असे वाटत नाही, तोपर्यंत आपण भगवंताचे झालो नाही. आपण घाबरतो केव्हा, तर आपला आधार सुटला म्हणजे. जे जे होते ते रामाच्या इच्छेने होते असे समजावे. संकटे देवाने आणली तर ती सोसण्याची शक्तीही तोच देतो. समर्थांचे होऊन असे भ्यावे का? समर्थांचे जे झाले त्यांनी परिस्थितीला नाही डगमगू. प्रत्यक्ष संकटाचे निवारण जर करता येते, तर मग भीती कशाची धरावी? मुळात जी भीती नाही ती तुम्ही मनाने निर्माण करता याला काय म्हणावे? खेळातली सोंगटी मेली म्हणजे त्याचे सुख-दुःख कुणी करतो का? तसे व्यवहारात आपण वागावे. सुखाने हुरळून जाऊ नये आणि दुःखाने अस्वस्थ होऊ नये. असे व्हायला आपले मन शांत राहाणे जरुर असते. जोपर्यंत ‘ मी कर्ता आहे ’ अशी भावना असते, तोपर्यंत सुखदुःखाचे हेलकावे मनाला बसतात. म्हणून कर्तेपण रामाकडे द्यावे, आणि देहाने कर्तव्यात राहून मन शांत ठेवावे. ‘ परिस्थितीचा परिणाम माझ्या मनावर घडू देऊ नको, देवा, ’ असे म्हणावे, ‘ परिस्थितीच बदल ’ असे देवाला म्हणू नये.
ज्याप्रमाणे एखादे विष रक्तात मिसळावे, त्याप्रमाणे काळजी आपल्या अंगात भिनली आहे. त्याला वरुन औषध लावले तर उपयोगात होत नाही. ह्यासाठी भगवंताच्या अनुसंधानाचे इंजेक्शनच पाहिजे. जे दुर्गुण भगवंताचा विसर पाडायला कारण होतात, त्या सर्वांचा संग्रह म्हणजे काळजी होय. काळजी हा फार मोठा रोग आहे. पोटात रोग वाढला आणि त्यानेच पोट भरले की रोग्याला अन्न जात नाही. त्याचप्रमाणे, ज्याला काळजी फार, त्याच्या ह्रदयात आनंद जाऊच शकत नाही. या काळजीचे आईबाप तरी कोण? देहबुद्धीमुळे आपल्याला काळजी लागते. देहबुद्धी म्हणजे वासना. वासना आणि अहंकार हे काळजीचे आईबाप आहेत. अशा और स्वभावाचे आईबाप असल्यावर पोर असे विचित्र असायचेच ! भगवंताचे स्मरण करीत गेल्याने आईचा आणि मुलीचा मृत्यू बरोबर घडून येतो; वासना आणि काळजी दोघीजणी एकदम मरतात. खरे म्हणजे, एकच स्थिती कधी कायम राहात नाही म्हणून आपल्याला भीती वाटते, आणि तिच्यातून काळजी उत्पन्न होते. काळजी जितकी आपल्याला मारते, तितकेच नाम आपल्याला तारते. तरीसुद्धा आपण काळजीलाच पकडून बसतो, याला काय म्हणावे? आपला जेवढा वेळ काळजीत गेला तेवढा वाया गेला असे समजावे. काळजी करायचीच असेल तर अनुसंधान कसे टिकेल याची करा.

N/A

References : N/A
Last Updated : February 15, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP