एका गावाहून दोन सरकारी बैलगाड्या निघाल्या. एका बैलगाडीत सोन्याची नाणी असलेल्या पिशव्या होत्या, आणि दुसर्या गाडीत बांधकामाचे दगड होते. सबंध दिवसभर प्रवास करुन त्या बैलगाड्या तालुक्याच्या ठिकाणी पोहोचल्यावर गाडीवानांनी गाड्या सोडल्या, सोने आणि दगड अधिकार्यांच्या हवाली केले आणि दोन्ही गाड्यांच्या बैलांना कडबाच घातला. तसे, भगवंताच्या दृष्टीने, विद्वान आणि अडाणी दोघेही सारखेच. सुंदर विचारांचा भार डोक्यात वागवला म्हणजे विद्वानाला भगवंत जवळ होतो असे मुळीच नव्हे. विद्वान काय किंवा अडाणी काय, दोघांनाही बुडविण्याइतका अभिमान प्रत्येकाजवळ असतो; विद्वानाला अभिमान जास्त मारक होतो, इतकेच. विद्येला जगात किंमत आहे; पण ती साधनरुप आहे, साध्यरुप नाही. विद्या ही भगवंताची दासी बनली पाहिजे. पुष्कळ वेळा विद्वान लोक व्यर्थ चिकित्सेने आपल्या आयुष्याचा नाश करुन घेतात. साधेभोळे अडाणी लोक भगवंताचे नाम घेऊन मजेने तरुन जातात, पण हे विद्वान लोक, भगवंत कसा आहे, त्याचे गुण काय आहेत, त्याचा आणि आपला संबंध काय आहे, त्याचे नाम त्याच्यापर्यंत पोहोचते की नाही, नामाची सुरुवात केव्हापासून झाली, नाम कोणत्या वाणीने घ्यावे, इत्यादि गोष्टींची चिकित्सा करीत बसतात; आणि ती इतकी करतात की, शेवटी आयुष्याचा अंतकाल येतो, आणि नामाची चिकित्सा तेवढी पदरात पडते, नाम घेण्याचा आनंद मिळत नाही. म्हणून शहाण्या विद्वानाने, चिकित्सा करायचीच तर नाम घेत करावी.
ज्याच्या अंगी मीपणा आहे, त्याने चूक केली तर भगवंत त्याचे प्रायश्चित देतो; पण ज्याच्या अंगी मीपणा नाही त्याच्या हातून चूक घडली तर भगवंत ती सांभाळून घेतो. समजा आज आपल्या हातून चूक झाली-अगदी जाणतेपणाने झाली, तरी आपण जर पश्चाताप पावून भगवंताला शरण गेलो तर खात्रीने तो क्षमा करतो. आपण आपले मागले घडलेले सर्व भगवंताला अर्पण करावे, मग पुढची जबाबदारी त्याच्यावर पडते.
प्रत्येक भक्ताने साधनाचे कष्ट स्वतःच सोसले पाहिजेत. कितीही मोठा गुरु असला तरी त्या बाबतीत तो काही करु शकत नाही; फार तर त्या कष्टाची त्याला जाणीव होऊ देणार नाही. आपले मन आपणच आवरले पाहिजे, आणि आपल्या वृत्तीला आपणच वळविले पाहिजे. साधन करीत असताना येणार्या अवस्था आपण शांतपणे सोसल्याच पाहिजेत. भगवंताकडे जायची साधने पुष्कळ आहेत. इतर साधनांचे कष्ट करुन जे साधते तेच थोडे नाम घेतल्याने साधते. पण नामावर तशी श्रद्धा मात्र पाहिजे. प्रत्येक साधनाचे मर्म म्हणजे भगवंताचे स्मरण होय. त्याचा पूर्णपणे समावेश भगवंताच्या नामात आहे. म्हणून ज्याला लवकर भगवंत गाठायचा आहे त्याने एका नामाची कास धरावी.