१
ओंवीचे आरंभीं वंदूं विनायक । बुद्धिचा दायक लोकांमध्यें ॥१॥
लोकांमध्यें बुद्धीविण कामानये । बुद्धीचा उपाय सर्वत्रांसी ॥२॥
सर्वत्रांसी बुद्धि देतो गणनाथ । करीतो सनाथ अनाथांसी ॥३॥
अनाथांचा नाथ कळे जयाचेनी ॥ तो हा धरा मनीं लंबोदर ॥४॥
लंबोदर विद्यावैभवें पूरता । दास म्हणे माता सरस्वती ॥५॥
२
नमो गणपति माता सरस्वती । गाऊं सीतापती सर्वकाळ ॥१॥
सर्वकाळ मज संतांची संगती । तेणें माझी मती वाढवेल ॥ध्रु०॥
वाढवेल मती चुके अधोगती । रामदास गति संतसंगें ॥२॥
३
नमस्कार आतां देवा गणनाथा । चरणकमळीं माथा ठेवूनियां ॥१॥
शारदा सुंदरी ते ब्रम्हकुमारी । राजहंसावरी शोभतसे ॥२॥
उमा महेश्वर शंभूचें शिखर । येती निरंतर विश्वजन ॥३॥
विश्वासी आधार सूर्यनारायण । तया पंचप्राण ओंवाळीन ॥४॥
स्तंभ फोडुनियां आला गडगडीत । भक्तांसी रक्षीत नरहरि ॥५॥
नाना पूजा नाना नैवेद्य विळास । नांदे त्रिमलेश वेंकटेश ॥६॥
कटावरि कर उभा निरंतर । भक्तांसी आधार पांडुरंग ॥७॥
तुळजापुरी माझें कुळींचें दैवत । तुळजा विख्यात भूमंडळीं ॥८॥
काशीपूरीमध्यें विश्वनाथ राजा । अंतकाळीं वोजा रक्षितसे ॥९॥
न करी अव्हेरु कृपेचा सागरु । जानकीचा वरु रामराजा ॥१०॥
द्वारकेचा कृष्ण पांडवांचा सखा । बंधु पाठीराखा द्रौपदीचा ॥११॥
उधळलें भंडार पाली पेंबरीस । नित्य मल्लारीस हळदी लागे ॥१२॥
साठीपत्र शाखा होय शाखांबरी । ते बनशंकरी भक्तमाता ॥१३॥
आउंदीं यमाई मातापुरा गेली । चंडिका देखिली सप्तश्रृंगीं ॥१४॥
रासीनीं रासाई आंबा जोगेश्वरी । नांदे कोल्हापुरीं माहालक्षूमी ॥१५॥
स्वामीयांचे यात्रे विश्वजन जाती । सप्तजन्म होती भाग्यवंत ॥१६॥
पंचवटिकेसी रामसीतापति । देव हा मारुति जेथें तेथें ॥१७॥
कावेरीचे तीरीं नांदे रंगनाथ । वोड्या जगन्नाथ पूर्वभागीं ॥१८॥
उडुपेचा कृष्ण बद्रिनारायण । भगवंत आपण बारसीचा ॥१९॥
वैकुंठिंचा विष्णू कैलासीं शंकर । मुख्य निराकार परब्रह्म ॥२०॥