२३
स्वामी माझा ब्रम्हचारी । मातेसमान अवघ्या नारी ॥१॥
उपजतां बाळपणीं । गिळूं पाहे वासरमणि ॥२॥
आंगीं शेंदुराची उटी । स्वयंभ सोन्याची कांसोटी ॥३॥
कानीं कुंडलें झळकती । मुक्तमाला विराजती ॥४॥
स्वामीकृपेची साउली । रामदासाची माउली ॥५॥
२४
नवल अवचित देखीलें । फळ म्हणुनी झेंपावलें । मंडळ सूर्याचें गिळिलें । बाळपणीं ॥१॥
सेना उदंड मारिली । लंका जाळुनि होळी केली । शुद्धि सीतेची आणिली । ख्याति जाली ॥२॥
धन्य मारुति निधान । लक्ष्मणा जीवदान । सकळिकांचें समाधान । हें महिमान ॥३॥
कटीं सोन्याची कांसोटी । घंटा घागरियांची दाटी । घेतो उड्डाण जगजेठी । चारी कोटी ॥४॥
द्रोणगिरी उत्पाटिला । लागवेगें झेंपावला । प्राण सकळांचा राखिला । धन्य जाला ॥५॥
गिरीवरें गर्व केला । पर्वत मैनाक वाढला । शून्य मंडळ भेदुनि गेला । तो मारुति ॥६॥
रघुनाथाला सोडविलें । पाताळदेवतें मारिलें । सिंधुर सर्वांगीं चर्चिले । तैंपासोनी ॥७॥
हा तों ईश्वरी अवतार । भीम सकळांसी आधार । रामध्यानीं निरंतर । भक्तराज ॥८॥
मुहुर्त रावणें पाहिलें । रघुनाथाला पाचारिलें । अरिष्ट स्वामीचें घेतलें । आपणांवरी ॥९॥
राम गेले वैकुंठासी । तैं निरविलें हनुमंतासी । तुवां माझिया भक्तांसी । सांभाळावें ॥१०॥
रामदासाचा सारथी । विघ्नें चळचळां कांपती । पावे संकटीं मारुति । भरंवशानें ॥११॥
२५
काय सांगों मी या मारुतीचें बळ । गिळिलें मंडळ मार्तंडाचें ॥१॥
मार्तंड गिळिला येणें बाळपणीं । देवादिकां रणीं पिटियेलें ॥२॥
पिटिले राक्षस विध्वंसिलें बन । लंकेचें दहन क्षणमात्रें ॥३॥
क्षणमात्रें आला जानकी शोधुनी । सिंधु वोलांडुनी अवलीळा ॥४॥
अवलीळा जेणें द्रोणाद्रि आणिला । राक्षस वधिला काळनेमी ॥५॥
काळनेमी आणि मारिली विवसी । उद्धार तयेसी जीवदान ॥६॥
जीवदान दिलें तया लक्षुमणा । आणि कपिगणां सकळिकां ॥७॥
सकळिकां कपिकुळाचें मंडण । वांचविले प्राण बहुतांचे ॥८॥
बहुतांमधुनी तया राघवासी । नेलें पातळांसी निशाचरीं ॥९॥
निशाचरीं राम पाताळासी नेला । मागें धाविन्नला हनुमंत ॥१०॥
हनुमंतें उडी घातली संकटीं । सोडिलें सेवटीं स्वामियासी ॥११॥
स्वामियासी सोडी धन्य तो सेवक । कीर्ति अलोलिक मारुतीची ॥१२॥
मारुतीनें तये जानकीकारणें । नगरचि नेणें उचलोनी ॥१३॥
उचलोनी माथां तये जानकीसी । वाटे कुंभकासी वधावया ॥१४॥
वधुनीयां कुंभकर्णांचा नंदनु । पुन्हां बिभीषणु राज्यीं बैसे ॥१५॥
बैसला मारुति तये सिंधुतीरीं । हुंडारिलें दुरी गरुडासी ॥१६॥
गरुडाची हांव सर्वही यादव । फेडियेला गर्व एकसरां ॥१७॥
एकसरां नामेंरुपें पालटिला । मग रक्षियेला कृष्णनाथ ॥१८॥
कृष्णनाथ रुपें जहाला ब्राह्मण । वांचवीले प्राण अर्जुनाचे ॥१९॥
अर्जुनाचें सैन्य रोमावळी अंत । महानदी प्रांत उत्तरींलें ॥२०॥
उत्तरीलें येणें अर्जुनादिकांतें । गेले दुंदुभीतें वधावया ॥२१॥
वधावया गेले तेणें हुंडारिलें । सागरीं राखिलें मारुतीनें ॥२२॥
मारुतीचें बळ वर्णितां सबळ । वाचा हे विबळ होत आहे ॥२३॥
होत आहे साना होत आहे थोर ॥ कोण जाणे पार स्वरुपाचा ॥२४॥
रुप वज्रदेही पुच्छ वज्र तें हि । रामदासीं नाहीं जन्ममृत्य ॥२५॥