भूपाळी - भाग ४

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे .


८९

उंच सिंहासन मृदु मृदासन । सुखें सिंहासन रे देवराया ॥१॥

हाटक मंडप मोहट्या रत्नदीप । किरणें फाकती अमूप वर्णवेना ॥२॥

कोंदण जडित नवरत्नखचित । प्रभा सुंदर फांकत भूमंडळीं ॥३॥

मुक्ताचे चांदवे तेजें हेलावे धांवे । घोंस लोंबती बरवे ते शुभ्रवर्ण ॥४॥

ऐसा उत्तम ठाव वरी देवाधिदेव । कोण गणील वैभव तुळणा नाहीं ॥५॥

दास तेथें आला नमस्कार केला । जळें सारिलें स्नानाला देवराया ॥६॥

९०

नाना सुगंधें तेलें आसन घातलें । मग आरंभिलें मर्दन स्वयें ॥१॥

केशर कस्तुरी उटण्या भीतरीं । मळी आंगावरी ते आढळेना ॥२॥

नेमस्त उदक घातलें नेमक । वस्त्रें ते अनेक आणविलीं ॥३॥

अंग पुसिलें बरें मग दिव्यांबर । सुगंध केशर नाना गंध ॥४॥

केशराचा रंग अक्षता सुरंग । पुष्पमाळा त्या मग बहुविधा ॥५॥

नाना पुष्पमाळा सुगंध मुक्तमाळा । अलंकारीं त्या किळा फांकताती ॥६॥

नाना अलंकार उत्तम सुंदर । दास नमस्कार घालीतसे ॥७॥

९१

धूपाचा तो वास दशांग सुवास । दीप सावकाश ते आणविले ॥१॥

दीपें ओवाळिलें नैवेद्य ही जाले । भोजनासी बैसले ते देवराय ॥२॥

शाका कोशिंबिरी ओदन सुवास क्षीरी । पंचभक्ष्य वरी तूप साय ॥३॥

नाना प्रकारींच्या सिकर्णी आणिल्या । शर्करा वाढिल्या त्या सावकाशें ॥४॥

सुगंध कथिका दहीं दूध ताका । नैवेद्य नेमका तो सांग जाला ॥५॥

देव आंचवले बैसले सुढाळें । पुढें विविध फळें ठेवियेलीं ॥६॥

विडे सांगोपांग आणिली दक्षिणा । मंत्रपुष्प सुमना समर्पिलीं ॥७॥

सांगोपांग पूजा केला नमस्कार । दास म्हणे हे थोर भक्ति आहे ॥८॥

९२

आतां लावा रे पंचारती । राम लक्ष्मण सीता मारुती ॥ध्रु०॥

समदृष्टीनें राम पहा । नीट सन्मुख उभे रहा । राम होउनी राम तुम्हीं पहा ॥१॥

ध्यान आव्हान आसन जाण । पाद्य अर्घ्य आचमन । कांहीं नेणें मी रामावीण ॥२॥

स्नान परिधान उपविति गंध । केशर कस्तुरी सुमन सुगंध । कांहीं नेणें मी मतिमंद ॥३॥

धूपदीप नैवेद्य जाण । वीडा दक्षण नीरांजन । कांहीं नेणे मी रामावीण ॥४॥

मंत्रपुष्पादि प्रदक्षण । पंचभूतादि पांचहि प्राण । करा रामासी समर्पण । कांहीं० ॥५॥

राम लक्ष्मण सीताबाई । राम कल्याण नित्य गाई । राम व्यापक सर्वां ठायीं । कांहीं० ॥६॥

रामीरामदास म्हणे रामाविण मी कांहीं नेणें । राम माझा जीव प्राण । कांहीं० ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP