ब्राह्मणांचे कसब - चाल सहावी
हिंदुस्थानात ब्राह्मण सत्ताधारी होण्यापूर्वी या पुण्यक्षेत्री परशुरामाने महारांना महाअरीत पाताळी कसे घातले याविषयी हा पोवाडा.
ब्राह्यण शूद्राच्या घरीं पोथी वाचायाचे निमित्तानें शिरुन त्याच्या संसार खटल्यांत हात घालून त्यास कसा बुडवितो याविषयीं.
पवाडा
बामनी कावा ॥ समजुनी घ्यावा ॥
आहेत आकलेचे खबरदार ॥
शहाणे ठक आरपार ॥
ऋषिमंडळ ॥ धर्मांचे बळ ॥ वेद सबळ ॥
कडक बिजलीं श्रापाचें घर ॥
देवा१ लाथ छातीवर ॥
शिपायी क्रूर ॥ लेखणिस धार ॥
दास बा केले महावीर ॥
ब्रह्यम्या मुखु शिरावर ॥
रणीं रणशूर ॥ घुसे बेशीर ॥
तिराचा मार अनीवार ॥
परशरामाचें लष्कर ॥
विद्याहीन ॥ शुद्र पाहून ॥
हळूच कसा गांठितां त्याला
लागतो पोथ्या वाचायाला ॥
बोध करितो ॥ महत्व शिकवितो ॥
चुकेना नित्य नेमाला ॥
गरीबी दावी भोळ्याला ॥
अट्टल धूर्त ॥ पाहून मुहूर्त
समाप्ति दिवस नेमिला ॥
उपटी शालदुशाल्याला ॥
गोडी लावुन । होई कारकुन ॥
आटपी सर्व कारभार ॥
शहाणा ठक आरपार ॥१॥
उघडी दप्तर ॥ पाही सत्वर ॥
रोखे निवडी प्रतवार ॥
तगादे धाडी घरोघर ॥
पैसा उगवी ॥ नोक दाखवी ॥
हुशारी छाप धन्यावर ॥
अर्ज्या दांड कुळावर ॥
नि-या सोडिती ॥ फिरे कोडती१ ॥
माठला अर्जी वाचणार ॥
ठराव पाती बरोबर ॥
कुळा घरीं जाई ॥ सूचना देई ॥
अर्जी केली तुजवर ॥
सांगतो फेड उपकार ॥
माझी समजुत ॥ काढ एकांत ॥
घेवितो तुमची तकरार ॥
करवितो हप्ते मुकरर ॥
करुन फितुर ॥ मुठ केली गार ॥
धन्याची समजूत वरवर ॥
उभय्मता देई गाजर ॥
फिरुन भागला ॥ खरा श्रमला
झॊंप आली आंगी सुरसुर ॥
आंगमोडे देई वारंवार ॥
कामाचा नीर ॥ पोशिला धूर ॥
घराला जाई सूत्रधार ॥
शहाणा ठक आरपार ॥२॥
पाडवा गुढी ॥ ढाल फडफडी ॥
रामजन्माचा पसार ॥
काढी हनुमंत पाठीवर ॥
आषाढमासी ॥ एकादशी ॥
बाकी चार सोमवार ॥
पूजवितो बैल बेंदूर ॥
नागपंचमी ॥ कृष्ण अष्टमी ॥
ब्राह्यणभोजनाचा भार ॥
चंगील तूप पोळीबर ॥
पिंड मांडितो ॥ पाया पडवितो ॥
भादयी भट्टि व्यापार ॥
माजला तट्टू गुलजार ॥
विजय दशमीस ॥ पुजवी घोडयांस ॥
फराळ धनतेरस वर ॥
लक्षुमी-पूजन वहीवर ॥
तुळशी लग्नांत ॥ मकरसंक्रांत ॥
वाचितो वर्षफळ सार ॥
मजुरी घेतो हातावर ॥
पैसा उडाला ॥ शुद्र बुडाला ॥
उरला होळी संवस्कार ॥
मारवी बोंब आखेर ॥
मनीं कल्पिलें ॥ ग्रहण योजिलें ॥
दानधर्माचा भडिमार ॥
शहाणा ठक आरपार ॥३॥
हिशेबी घोळ ॥ सर्व गोंधळ ॥
वाढवी कर्ज डोईवर ॥
आतून होई सावकार ॥
पैशावर जीव ॥ येईना कींव ॥
अर्ज्या करवी धन्यावर ॥
पैसा देई गाहाणावर ॥
वेळ पाहून ॥ संधि साधून ॥
मागणी नेट त्याजवर ॥
तगादा धाडी पाठीवर ॥
दाम दुप्पट ॥ सर्व एकवट ॥
नोंदिती गहाणखतावर ॥
दुमाला पुस्त रजिष्टर ॥
संध्या सोवळें ॥ भस्म टळटळे ॥
कडकली मर्जी धन्यावर ॥
निंदितो खर्चिक हा फार ॥
वर्जिले घर ॥ घरीं व्यापार ॥
चालवी हात गाहणावर ॥
जाळितो पोट व्याजावर ॥
हातावर देई ॥ लेहून घेई ॥
वायदा आट स्टांपावर ॥
ठोकली अर्जी आखेर ॥
धन्यांवर जीव ॥ केली मोठी कींव ॥
बक्षिस बीनभाडे घर ॥
शहाणा ठक आरपार ॥४॥
घालुनी फासा ॥ कोंडिला खासा ॥
मोहरा हिमतीचा फार ॥
कपाळ टेंकी हातावर ॥
तडजोड केली ॥ खाती चढावेली ॥
बेदावा वतनावर ॥
केला शेवट उपकार ॥
उपाय खुंटला ॥ ताप पेटला ॥
झाला तुरंगी वतनदार ॥
स्त्रियेवर पडला संवसार ॥
घर नाहीं दार ॥ वाढला आहार ॥
आखेर पोट दळणावर ॥
भोंवती पोरें जोजार ॥
बाईस जाऊं द्या ॥ पोट भरुं द्या ॥
गाईन दुस-या मधीं सार ॥
टाळी देतो हातावर ॥
राणीबाई ॥ शोधून पाही ॥
पाप हें तुझ्या शिरावर ॥
काय ! तूं जबाब देणार? ॥
समज कांहीं धरीं ॥ उमज अंतरीं ॥
कर विद्येचा प्रसार ॥
सोडू नये कर्तव्य सार ॥
जोतीराव ॥ कसा देई डाव ॥
गवसुन राजनीती वर ॥
शहाणा ठक आरपार ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : January 18, 2012
TOP